कलिंगड की बिर्याणी, कशामुळे चौघांचा मृत्यू? FDA च्या रिपोर्टमध्ये होणार मोठा खुलासा?

मुंबईतील पायधुनी परिसरात अन्नातील विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील झालेल्या चौघांच्या मृत्यूमागचं नेमकं कारण एफडीएच्या रिपोर्टमधून समजू शकेल. आज (बुधवार) हा रिपोर्ट येण्याची शक्यता आहे.

कलिंगड की बिर्याणी, कशामुळे चौघांचा मृत्यू? FDA च्या रिपोर्टमध्ये होणार मोठा खुलासा?
Biryani and watermelon
Image Credit source: Instagram
| Updated on: Apr 29, 2026 | 12:23 PM

मुंबईतील पायधुनी परिसरात फूड पॉइजनिंगमुळे (अन्नातील विषबाधा) झालेल्या एकाच कुटुंबातील चार सदस्यांच्या मृत्यूंमागील गूढ आज (बुधवार) पूर्णपणे उलगडण्याची शक्यता आहे. अन्न आणि औषध प्रशासन (FDA) अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, फळं, पुलाव-बिर्याणी, न शिजवलेला तांदूळ, मसाले आणि अर्धवट खाल्लेल्या खजुरांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्याचे निकाल आज येणार आहेत. 25 एप्रिल रोजी पायधुनी परिसरातील डोकाडिया कुटुंबीयांनी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास नातेवाईकांसह एकत्र जेवण केलं होतं. बिर्याणी खाऊन नातेवाईक आपल्या घरी परतले, त्यानंतर मध्यरात्री या चौघांनी कलिंगड खाल्लं होतं. त्यानंतर त्यांना पहाटेच्या सुमारास उलट्या, जुलाबचा त्रास झाला होता. अब्दुल्ला डोकाडिया, नसरीन डोकाडिया आणि त्यांच्या मुली आयशा, झैनब अशी मृतांची नावं आहेत.

एफडीएच्या अधिकाऱ्यांनी फळं, दालचिनी पावडर मिसळलेलं पाणी, पुलाव-बिर्याणी, कच्चे तांदूळ, मसाले, अर्धवट खाल्लेले खजूर या सर्वांचे नमुने तपासणीसाठी घेतलं होतं. याप्रकरणी पोलीस आणि फॉरेन्सिक टीम एकत्रितपणे काम करत आहेत. या नमुन्यांचे निकाल समोर आल्यानंतर मृत्यूचं कारण स्पष्ट होऊ शकेल. परंतु फॉरेन्सिक रिपोर्ट समोर येण्यास अधिक वेळ लागू शकतो. एफडीएच्या आणखी एका अधिकाऱ्याने सांगितलं की, अन्नाचे नमुने फॉरेन्सिक लॅबमध्ये देण्यात आले आहेत. एखादा पदार्थ विषारी आहे की नाही, हे फक्त फॉरेन्सिक रिपोर्टमधूनच स्पष्ट होऊ शकेल.

हा संपूर्ण तपास चार संस्थांमध्ये विभागण्यात आला आहे. कलिना इथलं फॉरेन्सिक विज्ञान प्रयोगशाळा संचालनालय, जे. जे मार्ग पोलीस, एफडीए आणि जे. जे. रुग्णालयातील पॅथॉलॉजी विभाग या चार संस्था याचा तपास करत आहेत. रुग्णालयातील एका वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितलं की, मूत्रपिंडाचं गंभीर नुकसान हे सहसा अन्नातील विषबाधेमुळे होतं, मात्र अशीच लक्षणं इतर पदार्थ खाल्ल्यानंतरही दिसू शकतात. रुग्णालय सध्या किडनीच्या नमुन्यांची तपासणी करत असून त्याचे निकाल येण्यासाठी काही आठवडे लागू शकतात.

नेमकं काय घडलं होतं.

शनिवारी 25 एप्रिल रोजी अब्दुल्ला डोकाडिया हे पत्नी आणि दोन मुलींसह बाहेर जेवायला गेले होते. रात्री साडेदहाच्या सुमारास त्यांनी बिर्याणी खाल्ली होती. त्यानंतर पावणे बाराच्या सुमारास ते घरी परतले. घरी परतल्यानंतर मुलांना भूक लागल्यामुळे रात्री एक-दीडच्या सुमारास अब्दुल्ला आणि नसरीन यांनी कलिंगड कापून खाल्लं होतं. कलिंगड खाल्ल्यानंतर काही तासांतच पहाटेच्या सुमारास चौघांनाही उलट्या आणि जुलाबचा त्रास होऊ लागला. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

Follow Us