‘महाराष्ट्राला बिहार-उत्तर प्रदेशमध्ये नेऊन ठेवलय का?’ भाऊबीजेला मुंबईतल्या रेल्वे स्टेशन्सवर जोरजोरात वाजली भोजपुरी गाणी, मराठी माणूस भडकला
Mumbai Railway stations Bhojpuri Songs : मुंबईच्या रेल्वे स्टेशन्सवर थेट छटपूजेची गाणी वाजण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यावर काही संघटनांनी आक्षेप घेतलाय. त्यांनी थेट रेल्वे अधिकाऱ्यांना जाब विचारला आहे. या प्रकाराची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.

महाराष्ट्रात भाऊबीजेचा सण साजरा होत असताना आंबिवली रेल्वे स्थानकावर मात्र भोजपुरी गाणी वाजवण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय. रेल्वे स्थानकावरील भोजपुरी गाण्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मराठी माणसाने संताप व्यक्त केलाय. महाराष्ट्रातील सण विसरून उत्तर प्रदेश आणि बिहारमधील गाण्यांचा आग्रह कशासाठी, असा सवाल उपस्थित केला जातोय.’आता महाराष्ट्राला चक्क बिहार-यूपीत नेऊन ठेवलं का, असा सवालही उपस्थित होतोय. दिवाळीचा सण आणि त्यात काल भाऊबीजेच्या निमित्ताने महाराष्ट्रभर आनंदाचं वातावरण असताना आंबिवली रेल्वे स्थानकावर मात्र भोजपुरी गाणी वाजवण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय. या गाण्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मराठी माणसाने नाराजी व्यक्त केली.
महाराष्ट्रातील रेल्वे स्थानकावर भाऊबीजेच्या दिवशी मराठी सणाशी संबंधित गाणी वाजवण्याऐवजी भोजपुरी गाणी का लावण्यात आली, असा सवाल उपस्थित होतोय. महाराष्ट्रातील सण आणि संस्कृतीला प्राधान्य देण्याऐवजी उत्तर प्रदेश आणि बिहारमधील गाण्यांना प्राधान्य दिलं जातंय का? अशी टीकाही केली जातेय. विशेष म्हणजे 12 वर्षांपूर्वी ‘कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?’ असा सवाल उपस्थित होत होतं आता पुन्हा ‘महाराष्ट्राला चक्क बिहार-यूपीत नेऊन ठेवलं का?’ असा सवाल विचारला जातोय. आंबिवली रेल्वे स्थानकावरील या प्रकारामुळे मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आलाय.
ठाकरेंच्या शिवसेनेने घेतला आक्षेप
वडाळा, नेरुळ रेल्वे स्थानकात वाजवण्यात आलेल्या भोजपुरी गाण्यावरून ठाकरे सेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी तक्रार केली. स्थानिक नगरसेविका माधुरी मांजरेकर यांनी तक्रार केली. मुंबई, नवी मुंबई रेल्वे स्थानकात भोजपुरी गाणी मोठ्या आवाजात वाजवली जात आहेत. येत्या रविवारी छठपूजा असून त्यानिमित्त मुंबईतील मध्य रेल्वे स्थानकांतील सीएसएमटीसह अन्य स्थानकांत अधूनमधून भोजपुरी गाणी वाजवली जात आहेत. यामध्ये वडाळा, सानपाडा, छत्रपती शिवाजी महाराज स्थानकासह इतर स्थानकांचा समावेश आहे.
वडाळा येथे वाजवण्यात आलेल्या गाण्यावरून ठाकरेंच्या सेनेने आक्षेप घेतला आहे. वडाळा येथील स्थानकावर वाजवण्यात आलेल्या गाण्यावरून ठाकरे सेनेच्या नगरसेवक माधुरी मांजरेकर यांनी आक्षेप घेतला आहे.