राष्ट्रवादी काँग्रेसचं विलीनीकरण झाल्यानंतर अजितदादा…; काँग्रेस नेत्याच्या विधानाने ट्विस्ट, नेमकं कोण काय म्हणालं?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चेवरून राजकीय जोरदार चर्चा सुरू झाल्या आहे. त्यातच काँग्रेस नेते अतुल लोंढे यांच्या विधानाने सस्पेन्स आणखी वाढला आहे.

राज्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. दोन्ही गटातील नेत्यांचे संवाद देखील सुरू झाले आहेत. त्यामुळे दोन्ही पक्ष एकत्र आल्यास इंडिया आघाडी की महायुतीत जाणार, यावरून सवाल उपस्थित केला जात आहे. त्याचदरम्यान अजित पवार महायुतीची साथ सोडणार होते, असं विधान काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनी म्हटलं. अतुल लोंढे यांच्या विधानाने मोठा ट्विस्ट निर्माण झालाय. त्यामुळे आता त्यांच्या विधानाची जोरदार चर्चा होऊ लागली आहे.
मागील काही दिवसांत दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनकरणाच्या चर्चांनी जोर धरलाय. खरंतर प्रफुल पटेल आणि शरद पवार यांच्या भेटीनंतर विलिनीकरणाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. अजित पवार हयात असताना देखील राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चा सुरू होत्या. त्यामुळे आता विलिनीकरण झाल्यास सगळ्या गोष्टी पुढे कशा न्यायच्या, यावरून सर्व बाबी रखडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादीतील ज्येष्ठ नेते मंडळी विलीनीकरणाबाबत आग्रही असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. याचदरम्यान खादार सुनील तटकरे यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांची दीड तास चर्चा झाली. त्यानंतर तटकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. या चर्चेनंतर जशी वेळ येईल, तशा गोष्टी आपल्याला कळतील, असं विधान सुनेत्रा पवारांनी केलं. सुनेत्रा पवारांच्या विधानाने राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा अधिक वाढल्याचे पाहायला मिळत आहे.
तत्पूर्वी, सध्या दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून संभ्रम निर्माण करणारी विधाने केली जात आहेत. त्यातच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सूचक वक्तव्य केलंय. ‘जशी वेळ येईल, तशा गोष्टी तुम्हाला कळतीलच, असे विधान सुनेत्रा पवार यांनी केल्याने सस्पेन्स आणखी वाढला आहे. त्यातच सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीतून 20 ते 22 आमदार बाहेर पडण्याच्या तयारीत असल्याचा दावा ठाकरे गटाच्या संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊतांच्या विधानानंतर भाजप नेते नवनाथ बन यांनी प्रतिक्रिया दिली. तर स्वत:च्या पक्षाचे 40 आमदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बाहेर पडले, त्यावेळी संजय राऊत यांना भविष्यवाणी करता आली नाही, असा सवाल नवनाथ बन यांना केला.
