Mumbai Rain : छत्री सोबत ठेवलीय ना? आज मुंबईत मॉन्सूनपूर्व सरी बरसण्याचा अंदाज!

आता महाराष्ट्रातही मॉन्सूनपूर्व सरी लवकरच बरसतील, असाही विश्वास व्यक्त करण्यात आलाय.

Mumbai Rain : छत्री सोबत ठेवलीय ना? आज मुंबईत मॉन्सूनपूर्व सरी बरसण्याचा अंदाज!
आज पाऊस येणार?
Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: May 15, 2022 | 6:28 AM

मुंबई : मुंबईकरांना (Mumbai News) दिलासा देणारी बातमी आहे. वाढलेल्या तापमानामुळे घामाघूम झालेल्या मुंबईत पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे. मॉन्सून (Monsoon News) अपेक्षेपेक्षा लवकर बरसेल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. 26 मे रोजी केरळ आणि अंदमान-निकोबारमध्ये मॉन्सून दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या शक्यतेनंतर आता मॉन्सूनपूर्व सरीही लवकर बरसण्याची शक्यताय. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात मॉन्सून सक्रिय होईल, असं सांगण्यात आलंय. त्यानंतर आता आज (15 मे रोजी) मॉन्सूनपूर्व सरी बरसतील, अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. गेले अनेक वर्ष मुंबईमध्ये (Mumbai Rain Update) जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मॉन्सूनच्या सरी बरसल्याची नोंद करण्यात आलेली आहे. तर एक जून रोजी केरळसह अंदमान निकोबारमध्ये मॉन्सून दाखल होत असल्याचं पाहण्यात आलेलंय.

गेल्या काही वर्षांचा अंदाज

गेल्या पाच वर्षांचा विचार केला तर कोणत्या वर्षी केव्हा मॉन्सूनच्या सरी बरसण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता आणि नेमका मॉन्सूनचा पाऊस केव्हा सक्रिय झाला, याचीही आकडेवारी समोर आली आहे. मिड-डेनं दिलेल्या आकडेवारीनुसार 2017 पासून 2021 पर्यंतचा मॉन्सूनचा अनुमान आणि त्याची खरी सुरुवात यांच्या तारखाही देण्यात आल्या आहेत.

  1. 2017 – मॉन्सून 30 मे रोजी येण्याचा अंदाज, मॉन्सून सुरु झाला 30 मे रोजी
  2. 2018 – मॉन्सून 28 मे रोजी येण्याचा अंदाज, मॉन्सून सुरु झाला 8 जून रोजी
  3. 2019 – मॉन्सून 6 जून रोजी येण्याचा अंदाज, मॉन्सून सुरु झाला 8 जून रोजी
  4. 2020 – मॉन्सून 5 जून रोजी येण्याचा अंदाज, मॉन्सून सुरु झाला 1 जून रोजी
  5. 2021 – मॉन्सून 31 मे रोजी येण्याचा अंदाज, मॉन्सून सुरु झाला 3 जून रोजी

मॉन्सूल लवकर, मॉन्सूनपूर्व पाऊसही लवकर

खरंतर शनिवारपासूनच अंदमान निकोबारध्ये 14 मे पासून मॉन्सूनपूर्व सरी बरसण्याचा अंदाजही वर्तवण्यात आलाय. त्यामुळेच आता महाराष्ट्रातही मॉन्सूनपूर्व सरी लवकरच बरसतील, असाही विश्वास व्यक्त करण्यात आलाय.

गेल्या काही वर्षांत नोंदवलेल्या पावसापेक्षा यावर्षी जास्त पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तर कोकण रायगड, ठाणे आणि मुंबई भागात मॉन्सूनपूर्व पाऊस होण्यासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली असल्याचंही हवामान विभागानं म्हटलंय.