
गेल्या दोन दिवसांपासून सातत्याने मुंबई आणि उपनगरांत जोरदार पाऊस पाहायला मिळाला. आज मुंबईतील पावसाने विश्रांती घेतल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. रविवारी सकाळपासून सोमवारी सकाळपर्यंत २४ तासांच्या कालावधीत अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला. पालिकेच्या स्वयंचलित केंद्रांवर झालेल्या नोंदीनुसार मुंबईतील वडाळ्यात सर्वाधिक १६१.४ मिमी पावसाची नोंद झाली. रात्रीपासून पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. सध्या मुंबईत ढगाळ वातावरण आहे. मात्र मुंबईकरांची तहान भागवणाऱ्या धरणक्षेत्रात अद्यापही पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
गेले दोन दिवस पावसाला पोषक वातावरण निर्माण झाल्यामुळे मुंबईत पावसाने हजेरी लावली. शनिवार आणि रविवारी शहर तसेच उपनगरात पावसाचा जोर होता. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील प्रमुख ठिकाणांवरील पावसाची नोंद करण्यात आली आहे. यानुसार वडाळ्यात १६१.४ मिमी इतका सर्वाधिक पाऊस झाला. त्यापाठोपाठ माटुंगा १४७.५५ मिमी, लोअर परळ: १४३.४६ मिमी, वरळी अग्निशमन केंद्र १४०.७३ मिमी, वांद्रे (पश्चिम उपनगर): १३४.५९ मिमी, वांद्रे कुर्ला संकुल (अग्निशमन केंद्र): १०३.४ मिमी, चेंबूर (पूर्व उपनगर): १११ मिमी, कुर्ला एल वॉर्ड ऑफिस, पवईतील पासपोली आणि चेंबूर अग्निशमन केंद्र: ८१.७४ मिमी ते ८६.५३ मिमी दरम्यान पावसाची नोंद करण्यात आली.
मुंबईतील कुलाबा वेधशाळेत ८६ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. तर सांताक्रूझ वेधशाळेत १०० मिमी पाऊस झाला. मुंबईत मुसळधार पाऊस पडत असला तरी, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात मात्र अद्याप पावसाने जोर धरलेला नाही. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये सध्या फक्त ८.६० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत असून, उर्ध्व वैतरणा धरणातील राखीव साठा वापरण्यास सुरुवात झाली आहे. सोमवारी पडलेल्या पावसामुळे मध्य वैतरणा धरणातील पाण्याच्या पातळीत किंचित वाढ झाल्याचे दिसून आले.
दरम्यान अंधेरी पश्चिम परिसरात येत्या गुरुवारी १९ जून रोजी ११ तासांसाठी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. गोपाळकृष्ण गोखले पुलाखालील वांद्रे जलवाहिनीवरील १,३५० मिलीमीटर व्यासाचे प्रवाह नियंत्रण झडप (फ्लो कंट्रोल वॉल्व्ह) दुरुस्त करणे आणि वेसावे जलवाहिनीवरील १०० मिलीमीटर व्यासाचे फुलपाखरू झडप (बटरफ्लाय वॉल्व्ह) बदलण्याची कामे हाती घेण्यात येणार आहेत. हे काम गुरुवार १९ जून रोजी दुपारी २ वाजल्यापासून शुक्रवार २० जून रोजी मध्यरात्री १ वाजेपर्यंत एकूण ११ तास चालणार आहे. या कालावधीत संपूर्ण जलवाहिनीचा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने के-पश्चिम विभाग कार्यालयाच्या हद्दीतील काही भागांमध्ये पाणीपुरवठा होणार नाही. पालिका प्रशासनाने नागरिकांना या काळात पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे.