मुंबईकरांनो पुढील 3 तास धोक्याचे, हवामान विभागाकडून रेडअलर्ट जारी

मुंबई आणि आसपासच्या परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. हवामान खात्याने पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. मुंबई, नवी मुंबई आणि रायगडमध्ये जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्याचा अंदाज आहे.

मुंबईकरांनो पुढील 3 तास धोक्याचे, हवामान विभागाकडून रेडअलर्ट जारी
mumbai sea storm
| Updated on: Jun 07, 2025 | 3:46 PM

गेल्या तासाभरापासून मुंबई आणि आसपासच्या परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. मुंबई शहर आणि उपनगरांत जोरदार पाऊस सुरु आहे. मुंबईतील लोअर परळ, दादर, वरळी, चर्चगेट, सायन, कुर्ला, घाटकोपर, पवई आणि भांडूप या भागांमध्ये पावसाचा जास्त जोर पाहायला मिळत आहे. तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडत आहे. त्यातच आता हवामान विभागाकडून पुढील ३ तासांसाठी मुंबईला रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईकरांनो गरज असेल तरच घराबाहेर पडा, असा सल्ला मुंबई महापालिकेने दिले आहे.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील ३ तासांसाठी मुंबईला रेड अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईत पुढील ३ तासांत मुसळधार पाऊस कोसळेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या काळात ताशी ४० ते ५० किमी वेगाने सोसाट्याचा वारा वाहू शकतो. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असा सल्ला हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

गरज असल्यासच घराबाहेर पडावे

मुंबईत होणाऱ्या जोरदार पावसामुळे अनेक सखल भागांत पाणी साचू शकते. चर्चगेट, परळ, महालक्ष्मी, मुंबई सेंट्रल, दादर, माटुंगा आणि फोर्ट यांसारख्या भागांमध्ये पावसाचा जोर अधिक असेल, अस अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाने नागरिकांना गरज असल्यासच घराबाहेर पडावे असे आवाहन केले आहे. कोणतीही अडचण आल्यास किंवा मदतीची गरज भासल्यास बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नियंत्रण कक्षाच्या १९१६ या क्रमांकावर संपर्क साधा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबईत काही दिवसांपूर्वीच मान्सून दाखल झाला. पण त्यानंतर काही दिवसांनी पाऊस कमी झाला. आता पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे. पुढील काही तासांत पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. आज ७ जून २०२५ रोजी मुंबई शहर आणि उपनगरात ढगाळ आकाश पाहायला मिळत आहे. तसेच काही ठिकाणी सकाळपासूनच पावसाच्या सरी कोसळत आहे. काही तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस पडत आहे.

नवी मुंबई आणि रायगडसाठी इशारा

मुंबईसोबतच नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यांसाठीही हवामान विभागाने मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पुढील काही तासांत या भागांमध्येही पावसाचा जोर वाढेल आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडेल. नवी मुंबईतील नेरुळ, वाशी, बेलापूर या भागांमध्ये सकाळपासूनच जोरदार पाऊस पडत आहे.

कल्याण-डोंबिवलीत पाऊस

कल्याण डोंबिवली परिसरात गेल्या काही दिवसांपासून पावसाची सुरू होती. मात्र आज सकाळीपासूनच जोरदार पाऊस सुरु आहे. काही तासांच्या विश्रांतीनंतर दुपारी पुन्हा तासभर जोरदार पाऊस कोसळला. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे या तासाभराच्या पावसाने केडीएमसीच्या नालेसफाईच्या दाव्याची मात्र चांगलीच पोल-खोल केली आहे. डोंबिवली पश्चिमेकडील एच वर्ड शेजारील रस्त्यावर जवळपास गुडघ्यावर पाणी साचल्याचे पाहायला मिळत आहे. या रस्त्यावर दरवर्षी पावसात मोठ्या प्रमाणात पाणी साचते. मात्र केडीएमसीकडून या रस्त्याबाबत कोणतीही उपाययोजना केली जात नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे