BEST Employee Strike : बेस्टच्या बेमुदत संपाचा मुंबईकरांना मोठा फटका, काय स्थिती आहे?

BEST Employee Strike : मुंबईत दररोज लाखो लोक बेस्ट बसने प्रवास करतात. आजच्या संपामुळे विद्युत पुरवठा आणि वाहतुकीला फटका बसणार आहे. बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने हा संप पुकारला आहे.

BEST Employee Strike : बेस्टच्या बेमुदत संपाचा मुंबईकरांना मोठा फटका, काय स्थिती आहे?
Best Strike
| Updated on: Jun 19, 2026 | 9:22 AM

बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि वाहतून कर्मचाऱ्यांच्या संयुक्त कृती समितीने मध्यरात्रीपासून संप पुकारला आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी अनिश्चित काळासाठी हा संप पुकारण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईच्या रस्त्यावर बेस्ट बसेस धावताना दिसत नाहीयत. परिणाम सकाळी कामावर निघालेल्या नोकरदारांचे हाल होत आहेत. बेस्ट बंदचा प्रवाशांना फटका बसतो आहे. दादर रेल्वे स्थानकाच्या बाहेर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. आज बेस्ट बंद असल्याने प्रवाशांची टॅक्सीने जाण्यासाठी मोठी लाईन लागली आहे. दादर रेल्वे स्थानकाच्या बाहेर टॅक्सी साठी प्रवाशांची मोठी लाईन लागली आहे. टॅक्सी, रिक्षाला आज जास्त भाव येणार आहे. आधीच सर्वसामान्य महागाईमध्ये होरपळत असताना टॅक्सी, रिक्षासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.

मुंबईत दररोज लाखो लोक बेस्ट बसने प्रवास करतात. आजच्या संपामुळे विद्युत पुरवठा आणि वाहतुकीला फटका बसणार आहे. बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने हा संप पुकारला असून त्यात कर्मचाऱ्यांच्या 12 युनियनचा समावेश आहे. आमच्या बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेल्या मागण्या मान्य करण्यासाठी प्रशासनाला मुदत दिली होती. पण त्या मागण्यांवर काहीही निर्णय झाला नाही, म्हणून संपाची हाक द्यावी लागली असं बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने म्हटलं आहे.

बस रिकामी करण्यात आल्या

घाटकोपरमध्ये 382 नंबरची देवनारला जाणारी प्रवाशांनी भरलेली बस खाली करण्यात आली. आज सकाळ पासून बेस्ट कर्मचाऱ्यांनी मुंबईत 100 टक्के बेस्ट बंदची हाक दिली आहे. आज सकाळी काही बस डेपो मधून बस गाड्या बाहेर निघाल्या होत्या. त्या खाली करण्यात आल्या. सध्या मुंबईतील रस्त्यावर एकही बस धावताना दिसत नाहीय.

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या काय?

बेस्टचा अर्थसंकल्प मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करावा आणि एकदाच निवृत्त कर्मचाऱ्यांची सर्व देणी देऊन टाकावीत या संपकरी बेस्ट कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. 2016 ते 2026 या कालावधीसाठी सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीची अमलबजावणी करावी, वाहतूक आणि विद्युत विभागातील कामाची कंत्राटी पद्धत रद्द करावी या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत. रिक्त जागा भराव्यात अशी सुद्धा समितीची मागणी आहे. योग्य कर्मचाऱ्यांना पदोन्नती द्यावी, खासगीकरणाचं PPP मॉडल संपवून टाकावं या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मुख्य मागण्या आहेत.

बेस्ट बसने दररोज किती लाख लोक प्रवास करतात?

उपनगरीय रेल्वेनंतर मुंबईत बेस्ट सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचं दुसरं सर्वात मोठं साधन आहे. बस सेवेशिवाय बेस्टकडून विद्युत पुरवठाही केला जातो. बेस्टचे 10 लाख विद्युत पुरवठा ग्राहक आहेत. दरदिवशी 25 लाख लोक बेस्ट बसने प्रवास करतात.

 

Follow Us