ऑनलाईन पैसे भरले पण खुन्नस काढलीच…; मुंबईतील दुकानदारासोबत ग्राहकाने जे केलं ते पाहून तुमचाही थरकाप उडेल!

मुंबईतील दिंडोशी भागात समोसा महाग असल्याच्या वादातून एका ग्राहकाने विक्रेत्याचे बोट चावून तोडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

ऑनलाईन पैसे भरले पण खुन्नस काढलीच...; मुंबईतील दुकानदारासोबत ग्राहकाने जे केलं ते पाहून तुमचाही थरकाप उडेल!
mumbai
| Updated on: Apr 01, 2026 | 8:23 AM

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत माणुसकीला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. किरकोळ पैशांच्या वादातून एका ग्राहकाने समोसा विक्रेत्यावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. एका ग्राहकाने संतापाच्या भरात विक्रेत्याच्या हाताचे बोट चावून थेट वेगळे केले. दिंडोशी परिसरात घडलेल्या या विचित्र आणि हिंसक घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित रणजीत सिंग हे दिंडोशी परिसरात छोटेसे फास्ट फूडचे दुकान चालवतात. २८ मार्च रोजी आरोपी लक्ष्मीधर मलिक हा त्यांच्या दुकानात समोसे आणि कटलेट्स खाण्यासाठी आला होता. खाऊन झाल्यानंतर जेव्हा बिल देण्याची वेळ आली, तेव्हा पदार्थांच्या किंमतीवरुन दोघांमध्ये बाचाबाची सुरू झाली. समोसे आणि कटलेट्सचे दर खूप जास्त आहेत, असा आरोप करत लक्ष्मीधर मलिकने केला. यानंतर त्याने रणजीत सिंग यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

ऑनलाईन पेमेंटनंतरही वाद कायम

या घटनेनंतर उपस्थित नागरिकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपीचा राग शांत होत नव्हता. मलिकने ऑनलाईन पद्धतीने पैसे भरले खरे, पण त्यानंतरही त्याचे समाधान झाले नाही. दुकानदाराने त्याला शांत राहून तिथून निघून जाण्यास सांगितले. पण त्यानंतर त्याचा पारा अधिकच चढला. समोसे एवढे महाग का? असे ओरडत त्याने रणजीत सिंग यांच्यावर शारीरिक हल्ला केला. या झटापटीत मलिकने त्यांच्या हाताच्या बोटाला जोरात चावा घेतला की बोट तुटून जमिनीवर पडले.

हा भयंकर प्रकार घडल्यानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. या गोंधळाचा फायदा घेत आरोपी लक्ष्मीधर मलिक घटनास्थळावरून पसार झाला. रक्ताच्या थारोळ्यात असलेल्या रणजीत सिंग यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, बोटाची दुखापत गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दिंडोशी पोलिसांनी या प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. तसेच सध्या सीसीटीव्ही फुटेज आणि ऑनलाईन पेमेंटच्या तपशिलावरून आरोपीचा माग काढला जात असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

दरम्यान मुंबईतील या घटनेमुळे समाजातील ढासळत्या मानसिकतेचे दाहक वास्तव समोर आणते. अवघ्या काही रुपयांच्या वादातून एका कष्टकरी विक्रेत्यासोबत ही धक्कादायक घटना घडणं, ही बाब माणुसकीला लाजवणारी आहे. अशा प्रवृत्तींना वेळीच चाप लावण्यासाठी प्रशासनाने आरोपीचा तातडीने शोध घेऊन त्याला कठोर शिक्षा देणे गरजेचे आहे, जेणेकरून समाजात कायद्याचा धाक निर्माण होईल आणि कष्टकरी वर्गाला सुरक्षितपणे आपला व्यवसाय करता येईल, अशी भावना व्यक्त केली जात आहे.

Follow Us