Maharashtra News LIVE : पुणे – हडपसर परिसरात रस्त्यांवर भले मोठे खड्डे, टेम्पोला अपघात
Maharashtra News LIVE : राज्यासह मुंबईत व उपनगरांत पावसाचा जोर वाढला आहे. अंधेरीमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून भुयारी मार्गात पाणी साचण्याची शक्यता आहे. राज्यातील महत्वाच्या घडामोडी, पावसाचे अपडेटस, क्रीडा, मनोरंज, राजकारण क्षेत्रातील महत्वाच्या बातम्यांचे लेटेस्ट अपडेट्स, तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील.

राज्यभरात पावसाचा जोर वाढला असून हवामान विभागातर्फे ठाणे जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. तसेच मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईतही पावसाचा जोर चांगलाच वाढला असून त्याचा परिणाम रेल्वे सेवेवरही दिसून आला. मध्य रेल्वेवरील ट्रेन 10 ते 12 मिनिटे उशीराने धावत आहेत. प्रशासन अलर्ट मोडवर असून राज्यातील अनेक नद्यांची पातळी वाढली आहे. दरम्यान सीएमओ कार्यालयाकडून हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आला आहे. नागरिकांनी या काळात सतर्क रहा, अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे. ठाणे, नवी मुंबईसह पालघर जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर दुसरीकडे पावसामुळे पुण्यातील सेनापती बापट रोडवरील मोठं झाड मध्यरात्री रस्त्यावरती पडलं. झाड पडून पार्किंग मध्ये असलेल्या चार चाकी वाहनाचे मोठं नुकसान झालं, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. यासह राज्यभरातील महत्वाच्या बातम्या, पावसाचे अपडेट्स, तसेच क्रीडा, मनोरंजन, राजकारण क्षेत्रातील महत्वाच्या बातम्यांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
LIVE NEWS & UPDATES
-
चांदवड-लासलगाव रोडवर स्विफ्टकारमधून १४.७४ लाखांचा ३२ किलो गांजा जप्त
चांदवड-लासलगाव रोडवर एलसीबीची धडक कारवाई करीत फिल्मी स्टाईल पाठलाग करून स्विफ्ट कार जप्त केली आहे. या कारमधून ३२ किलो गांजा जप्त केला असून त्याची किंमत १४.७४ लाख आहे. यात तिघांना अटक झाली असून याप्रकरणी चांदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
-
अमळनेर: संत सखाराम महाराज मंदिराला आमदार अनिल पाटील यांची भेट, नुकसानीचा घेतला आढावा
जळगावच्या अमळनेर येथील संत सखाराम महाराज मंदिरात भीषण आगीमुळे झालेल्या नुकसानाचे राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांनी मंदिराला भेट देत पाहणी केली आहे. यावेळी आमदार अनिल पाटील यांनी संत सखाराम महाराज मंदिराचे गादीपती संत प्रसाद महाराज यांची देखील भेट घेऊन चर्चा केली आहे.
-
-
खारघरमधील पांडवकडा धबधब्यावर दोन मुले बुडाली
पांडवकडा धबधब्यावर पर्यटकांना बंदी घातली असताना तरी देखील दोन मुलांनी चोर वाटेने प्रवेश केला. त्यात ही दोन मुले वाहून गेली आहेत. यातील एक मुलगा 19 वर्षाचा तर दुसरा 20 वर्षांचा असून अग्निशमन दलाच्या पथकांनी त्याचा शोध सुरु केला आहे. मात्र अंधार पडल्याने आणि पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने सध्या शोध मोहीम थांबविण्यात आली आहे. त्यातील एक मुलगा मुंबईचा तर दुसरा नवी मुंबईचा आहे.
-
पुणे – हडपसर परिसरात रस्त्यांवर भले मोठे खड्डे, टेम्पोला अपघात
पुणे पालिकेच्या कामाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. पहिल्याच पावसात येथील रस्त्यावर भले मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यात एका टेम्पोला अपघात झाला आहे. रस्त्याच्या कामावर त्यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. चार दिवसापुर्वी या रस्त्याचे डांबरीकरण झाले होते. हडपसर परिसरातील जामले वस्ती तडीगुट्टा परिसरात ही घटना घडली आहे.
-
राष्ट्रपतींनी पावसाळी अधिवेशन बोलावण्यास दिली मंजुरी
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले की, भारत सरकारच्या शिफारशीनुसार, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 2026 च्या पावसाळी अधिवेशनासाठी संसदेची दोन्ही सभागृहे बोलावण्यास मंजुरी दिली आहे. राष्ट्रीय महत्त्वाच्या विषयांवर अर्थपूर्ण वादविवाद, चर्चा आणि निर्णय घेण्यासाठी हे अधिवेशन 20 जुलै 2026 रोजी सुरू होऊन 13 ऑगस्ट 2026 पर्यंत चालेल. त्यांनी ही माहिती ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील एका पोस्टद्वारे दिली.
-
-
गंगा नदीवर बांधण्यात येत असलेल्या पुलाचा स्लॅब कोसळला
बिहारमधील समस्तीपूर येथे गंगा नदीवर बांधकाम सुरू असलेल्या पुलाचा एक स्लॅब कोसळल्याने चार कामगार जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
-
नितीशकुमार यांना भारतरत्न देण्याची मागणी
बिहारचे माजी मुख्यमंत्री नितीश कुमार यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान, भारतरत्न देण्याची मागणी होत आहे. पाटण्यातील जेडीयू कार्यालयाबाहेर नितीश कुमार यांना भारतरत्न देण्याची मागणी करणारे एक पोस्टर लावण्यात आले आहे.
-
दिल्ली दंगलीतील आरोपी उमर खालिद आणि शरजील इमाम यांचे जामीन अर्ज फेटाळले
दिल्लीतील करकरडूमा न्यायालयाने, बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) कायद्यांतर्गत (UAPA) नोंदवलेल्या दिल्ली दंगलीच्या मोठ्या कटातील आरोपी उमर खालिद आणि शरजील इमाम यांचे जामीन अर्ज फेटाळले आहेत. फेब्रुवारी 2020 मध्ये, ईशान्य दिल्लीत दंगली उसळल्या, ज्यात ५० हून अधिक लोकांचा बळी गेला. दिल्ली पोलिसांनी या मोठ्या कटाच्या संबंधात बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) कायद्यांतर्गत (UAPA) उमर खालिद आणि शरजील इमाम यांना अटक केली होती. हे दोघेही जवळपास सहा वर्षांपासून तुरुंगात आहेत.
-
महंत नृत्य गोपाल दास यांना रुग्णालयातून डिस्चार्ज
श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास यांना शुक्रवारी मेदांता रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यांच्या प्रकृतीत सातत्याने सुधारणा होत असल्याने डॉक्टरांनी त्यांना डिस्चार्ज देण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या रुग्णालयातून परतल्याने ट्रस्टच्या आगामी बैठकीबाबतही स्पष्टता आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ते ट्रस्टच्या या महत्त्वपूर्ण बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवतील.
-
जळगाव : चाळीसगाव तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपलं
जळगावच्या चाळीसगाव तालुक्याला जोरदार पाऊस आणि झोडपून काढले आहे. चाळीसगाव शहरात सुमारे दीड तास मुसळधार पाऊस पडल्याने शहरातील अनेक रस्ते जलमय झाले आहे. सखल भागात पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झासा आहे. काही काळापासून शहरातील जनजीवन विस्कळीत झाले असून हवामान खात्याकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
-
अंबरनाथ – शिवमंदिर ते रिलायन्सकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर साचलं पाणी
अंबरनाथच्या शिवमंदिर ते रिलायन्स कडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर पाणी साचलं आहे. पालिकेच्या दुर्लक्षामुळे मुख्य मार्ग जलमय झाल्याने वाहनचालक हैराण झाले आहेत. नवीन पुलावरच पाणी साचल्याने पालिकेच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
-
कल्याण : अडवली-ढोकाळी जलमय; घरांमध्ये शिरलं पाणी
कल्याण पूर्वेतील अडवली-ढोकाळी परिसरात सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुरासदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. नालेसफाई न झाल्याने मोठ्या नाल्यांमध्ये कचरा व गाळ साचल्यामुळे पावसाचे पाणी परिसरात घुसले आहे. अडवली-ढोकाळीसह आसपासच्या भागातील तळमजल्यावरील घरांमध्ये पाणी शिरल्याने घरगुती वस्तूंचे मोठे नुकसान झाले आहे.
-
पंढरपूर – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी वारकऱ्यांसोबत पंगतीत बसून घेतला महाप्रसाद
राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज पंढरपूर दौऱ्यादरम्यान आषाढी वारीच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी नवीन भक्त निवास इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमासही त्या उपस्थित होत्या. भक्तनिवास परिसरात आयोजित वारकऱ्यांच्या भक्ती पंगतीमध्ये वारकऱ्यांनी केलेल्या आग्रहाचा मान राखत सुनेत्रावहिनींनी त्यांच्यासोबत पंगतीत बसून महाप्रसादाचा लाभ घेतला. त्यांच्या या साधेपणाच्या आणि वारकरी परंपरेप्रती असलेल्या आदराच्या भावनेचे उपस्थित वारकऱ्यांनी स्वागत केले.
-
संभाजीनगरातील PES इंजिनिअरिंग कॉलेजच्या हॉस्टेल कॅन्टीनचा परवाना निलंबित
संभाजीनगरातील PES इंजिनिअरिंग कॉलेजच्या हॉस्टेल कॅन्टीनचा परवाना निलंबित. पोह्यात अळी, भातात झुरळ आढळल्याचं विद्यार्थ्याची तक्रार. FDA ला कॅन्टीनमध्ये मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता आढळली. मुदतबाह्य मसाले आणि इडली रव्याचा साठा जागेवरच नष्ट. खाद्यपदार्थांमध्ये बेकायदेशीर खाद्यरंगांचा वापरही उघड
-
मुंबई पालिकेचे दीड हजारहून अधिक अधिकारी, कर्मचारी चौकशीच्या फेऱ्यात
मुंबई पालिकेचे दीड हजारहून अधिक अधिकारी, कर्मचारी चौकशीच्या फेऱ्यात. पालिकेत 1 हजार 523 कर्मचाऱ्याविरोधात 537 विभागीय चौकशी प्रलंबित. निलंबित कर्मचाऱ्यांना नियमांनुसार मूळ पगाराच्या 50 टक्के निर्वाह भत्ता. मुंबईतील दोन घटनानंतर अधिकाऱ्यांना निलंबित करुन चौकशीचे आदेश
-
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची दमदार बॅटिंग सुरूच
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची दमदार बॅटिंग सुरूच. धरण क्षेत्रात देखील धुवाधार पाऊस. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ. पंचगंगा नदीची पाणी पातळी 19 फूट 10 इंचांवर. पंचगंगा नदीवरील दहा बंधारे गेले पाण्याखाली
-
सामाजिक कार्यकर्ते रमेश पाटलांचा अमित साटम यांना फोन
सामाजिक कार्यकर्ते रमेश पाटलांचा अमित साटम यांना फोन. रमेश पाटील आणि साटम यांच्या संवादाची ऑडिओ क्लिप व्हायरल. विधान भवनातल्या प्रकाराची रमेश पाटलांकडून विचारणा
-
नवी मुबंईतील सानपाडा रेल्वे भुयारी मार्गात गुडघाभर पाणी
नवी मुबंईतील सानपाडा रेल्वे भुयारी मार्गात गुडघाभर पाणी साचलं आहें. हा भुयारी मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. नवी मुबंई पालिकेने बॅरीकेटिंग टाकून हा सानपाडा भुयारी मार्ग सध्या बंद करण्यात आलाय. वाहतूकदार यांना देखील पालिकेचे कर्मचारी सांगत आहें भुयारी मार्ग बंद आहे. तसेच या भुयारी मार्गात कॅश वॅन अडकली आहे. हा भुयारी मार्ग बंद असल्याने वाहनधारक यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
-
घरासमोर उभ्या असलेल्या ट्रकचीच चोरी, CCTV समोर
जळगावच्या पारोळा तालुक्यातील करंजी बुद्रुक येथून घरासमोर उभ्या ट्रकची चोरी झाली आहे. ट्रकची चोरी करून घेऊन जाताना चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.
-
सोलापुरात 5 दिवसापासून अन्नत्याग आंदोलन सुरू
सोलापुरातील अवैध धंदे आणि पोलिसांच्या वसुलदाराविरोधात 5 दिवसापासून अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. याबाबत राष्ट्रवादी पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी सभागृहात हा विषय उचलल्याने पोलिसांचे धाबे दणाणलेत. त्यानंतर आंदोलनकर्त्या सुहास कदम विरोधात भाजप महिला कार्यकर्त्या साहेरा शेख यांनी गंभीर आरोप केले आहेत.
-
पवई जेवीएलआर रोडवर घुडगाभर पाणी
सध्या मुंबईत धो धो पाऊस कोसळत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. पवई जेवीएलआर रोडवर घुडगाभर पाणी साचले आहे. पाण्याचा निचरा होण्यासाठी जेसीबी मागवण्यात आले आहेत. चार ठिकाणी ट्रॅफिक पोलिसांनी डिवाईडर तोडले तरीही वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे.
-
पावसामुळे बाजारपेठ बंद
चेंबूर येथील नूर ए इलाही सेवा रस्ता, अंधेरी येथील वीरा देसाई रस्ता, महानगरपालिका बाजारपेठ रस्ता, अंधेरी येथील स्वामी विवेकानंद मार्ग, अंधेरी भुयारी मार्ग, विक्रोळी हुमा मॉल जंक्शन, गांधीनगर जंक्शन आणि परेश पार्क बाजारपेठ येथील रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. नागरिकांनी याची नोंद घेऊन या रस्त्यांवर प्रवास करणे टाळावे असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
-
मोगरा नाला खळखळला
अतिमुसळधार पावसामुळे मोगरा नाला तुडुंब भरून वाहत असून, मोगरा नाला प्रणालीशी जोडलेले लहान नालेदेखील वाहत आहेत. परिणामी, परिसरातील काही रस्त्यांवर पाणी साचल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे पाण्याचा निचरा होण्यासाठी विलंब होत आहे. तसेच, समुद्राला दुपारी २ वाजून ५० मिनिटांनी ४.२६ मीटर इतकी भरती येणार आहे.
-
नाशिकच्या सातपूरच्या कार्बन नाका परिसरात रस्ता खचला
नाशिकच्या सातपूरच्या कार्बन नाका परिसरात रस्ता खचला. १० ते १५ फूट खोल खड्डा पडला.शिवाजीनगर–कार्बन नाका मार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक काही काळासाठी बंद केला होता. सततच्या पावसामुळे रस्ता खचल्याचा प्राथमिक अंदाज आहे.अचानक रस्ता खचल्याने काही वाहने खड्ड्यात अडकली. अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेत वाहने सुरक्षित बाहेर काढली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही.
-
पालखी मार्गांवर वाखरी येथे अतिक्रमणांवर जेसीबीची धडक कारवाई
पंढरपूरमध्ये पालखी मार्गांवर वाखरी येथे अतिक्रमणांवर जेसीबीची धडक कारवाई केली. ५० हून अधिक अतिक्रमणे जमीनदोस्त केली. पोलीस बंदोबस्तात दिवसभर कारवाई करत यात्रा नियोजनासाठी दोन एकरांहून जागा मोकळी केली. जर्मन हँगर आणि वारकरी सुविधा केंद्रासाठी जागा उपलब्ध करुन देण्यात आली. बहुतांश अतिक्रमणधारकांनी स्वखुशीने अतिक्रमणे हटवली.
-
सामाजिक कार्यकर्ते संगम डोंगरे यांचे अनोखे आंदोलन
ठाण्यातील वंदना एसटी डेपोच्या बाहेर सखोल भागात साचलेल्या पाण्यामध्ये सामाजिक कार्यकर्ते संगम डोंगरे अक्षरशः महापालिकेला जाग आणण्यासाठी पाण्यामध्ये पोहत आहे. नालेसफाई फोलचा दावा ठाणेकर करत आहे.
-
ज्या पदासाठी थांबलो, ते आठ-दहा दिवसांत मिळणार – भरत गोगावले
रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत शिवसेना नेते भरत गोगावले यांनी पुन्हा एकदा सूचक विधान केले आहे. “आम्ही ज्या पदासाठी थांबलो, ते पद आम्हाला येत्या आठ ते दहा दिवसांत मिळणार आहे. सबुरीचं फळ गोड असतं,” असे वक्तव्य भरत गोगावले यांनी केले.
-
तुळजाभवानी संस्थानच्या जमीन घोटाळाप्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करा
तुळजाभवानी संस्थानच्या ४,१२१ एकर इनामी जमिनीच्या कथित गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजारी यांनी दिली आहे. महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट यांनी इनामी जमिनींच्या व्यवहारात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे निवेदन दिले होते. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, महसूल अधिकारी व इतरांच्या संगनमताने हजारो एकर इनामी जमीन बेकायदेशीररीत्या हस्तांतरित झाल्याचा आरोप मंदिर महासंघाने केला असून, संबंधितांवर गुन्हे दाखल करून अनधिकृत नोंदी रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.
-
मुंबईत दुपारच्या सत्रातील शाळांना सुट्टी जाहीर
मुंबईत नालासोपारा येथे रेल्वे रुळावर पाणी साचलं आहे. चेंबूर मध्ये श्रीदेवी हॉटेलसमोरील झाड कोसळलं. मनपाकडून झाड हटवण्याचे काम सुरू आहे. दोन गाड्यांचं नुकसान झालं आहे. मुंबईत दुपारच्या सत्रातील शाळांना सुट्टी जाहीर. पावसाचा जोर कायम आहे. गरज असेल तर घराबाहेर पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
-
बदलापूर शहर आणि परिसराला पावसाने झोडपून काढलं
गेल्या काही तासांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे बदलापूर शहर आणि परिसराला पावसाने झोडपून काढले आहे. या मुसळधार पावसामुळे कल्याण-कर्जत महामार्गावरील कात्रप भागातील घोरपडे चौकातील रस्त्याला अक्षरशः तळ्याचे स्वरूप आले आहे. मुख्य रस्त्यावरच पाणी साचल्यामुळे या मार्गावरील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून वाहनचालकांना पाण्यातून मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागत आहे. मात्र सध्या बदलापुरातील पावसाचा जोर ओसरला आहे.
-
सायन पनवेल हायवेवर वाहतूक संथ गतीने
सायन पनवेल हायवेवर नवी मुबंईतील तुर्भे याठिकाणी मुबंईला जाणाऱ्या लेनवरील वाहतूक संथ गतीने सुरु आहें. सायन पनवेल हायवेवर तुर्भेजवळ पाणी साचलं आहे. पावसाचा फटका हा सायन पनवेल हायवेला बसलाय. वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहें. सर्वत्र काळोख निर्माण झालाय.
-
तुळजाभवानी संस्थानच्या इनामी जमिनीच्या कथित गैरव्यवहाराची चौकशी
तुळजाभवानी संस्थानच्या ४,१२१ एकर इनामी जमिनीच्या कथित गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजारी यांनी दिली आहे.महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट यांनी इनामी जमिनींच्या व्यवहारात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे निवेदन दिले होते. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
-
रामाला आपलं समजणाऱ्यांनी आंदोलनात यावं – संजय राऊत
“आता आमचा संयम सुटला. आमचं काही राजकीय आंदोलन नाही. गझनवीने राम मंदिर लुटलेलं नाही. तुमच्या पक्षातल्या लोकांनी लुटलय. रामाला आपलं समजणाऱ्यांनी आंदोलनात यावं” असं संजय राऊत म्हणाले.
-
राम मंदिर ट्रस्ट पूर्णपणे बर्खास्त करा – संजय राऊत
राम मंदिर ट्रस्ट पूर्णपणे बर्खास्त केलं पाहिजे. उद्या मुंबईत शिवसेनेचं आंदोलन त्यानंतर हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात पसरणार. ठाकरेंची आंदोलनाची घोषणा केल्यानंतर RSS ला जाग आली. राम मंदिरात चोरी नव्हे तर दरोडा पडलाय. राम मंदिर ट्रस्ट हे भाजपचं ट्रस्ट झालय अशी बोचरी टीका संजय राऊत यांनी केली.
-
डोंबिवली पूर्व स्टेशन परिसर जलमय; प्रवाशांची पाण्यातून वाट काढत कसर
कल्याण डोंबिवली परिसरात सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. स्टेशनच्या परिसराकडे जाणारा मार्ग जलमय झाल्याने प्रवाशांना पाण्यातून मार्ग काढत जावे लागत आहे. पाण्याचा निचरा होत नसल्याने परिसरात जलसाठा वाढला असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. स्टेशन परिसरातील काही दुकानांमध्येही पाणी शिरल्याची माहिती समोर येत आहे.
-
मध्य रेल्वेच्या इगतपुरी रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळांवर साचले पाणी
मोठ्या नाल्याचे पाणी छोट्या नाल्यात वळविल्याने परिस्थिती उद्भवली आहे. इंग्रजकालीन बनविलेल्या मोठ्या नाल्यात पूर्वी पाणी जात होते, मात्र त्या नाल्याचा प्रवाह छोट्या नाल्यात वळविल्याने पाणी साचले. पावसाचा जोर ओसरल्याने रेल्वे रुळावरील पाणी सद्यस्थितीला झाले आहे. कमी मात्र पावसाचा जोर वाढल्यास रेल्वे रुळावर पाणी भरू शकते. पण रेल्वे वाहतुकीवर सध्या कोणताही परिणाम नाही, रेल्वे प्रशासनाने पाणी काढण्याचे काम आता सुरू केले.
-
अंबरनाथमध्ये मिनरल वॉटर कंपन्या वापरतायत टँकरचं पाणी?
अंबरनाथमध्ये मिनरल वॉटर कंपन्या टँकरचं पाणी वापरत असल्याची माहिती समोर आली आहे. क्लाउड 9, बिसलेरी कंपन्यांचे व्हिडीओ समोर आले आहे. एमआयडीसीत टँकरने पाणी घेण्यास परवानगी नाही… एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंनी लक्ष देण्याची मागणी केली आहे.
-
रमेश घुलेंच्या तक्रारीवरून खासदार सोनवणेंचे समर्थक बाळासाहेब पाथरकरांविरोधात केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
विलास घुले हत्या प्रकरणात रमेश घुलेंनी खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलावर गंभीर आरोप केले होते. मात्र पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सौरव सोनवणे यांच्या विरोधात कुठलाही पुरावा न आढळल्याने जबाब घेऊन त्यांना सोडून देण्यात आले. यानंतर रमेश घुले यांच्या विरोधात बीड जिल्ह्यात दाखल असलेल्या गुन्ह्यांबाबत दोन दिवसांपूर्वी बाळासाहेब पाथरकर यांनी वाच्यता करत रमेश घुलेंवर एमपीडीए अंतर्गत कारवाई करा अशी मागणी केली होती. यानंतर आपली बाळासाहेब पाथरकर यांनी बदनामी केल्याची तक्रार रमेश घुले यांनी दिली आहे. या तक्रारीवरून केज पोलीस ठाण्यात बाळासाहेब पाथरकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
वाशिम शहरात अन्न सुरक्षा प्रशासनाची धडक कारवाई..
शहरातील ३ हॉटेलांची तपासणी त्यापैकी साई ढाब्याचा अन्न सुरक्षा परवाना निलंबित.. तर हॉटेल गणेश आणि हॉटेल चिंतामणी या दोन हॉटेल ला सुधारणा करण्याची नोटीस. अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळल्याने केली कारवाई. स्वच्छ व सुरक्षित अन्नाबाबत प्रशासनाची कडक भूमिका. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेलांवर पुढेही कारवाई सुरू राहणार असल्याचा दिला इशारा…
-
जालना बीड महामार्गावर एसटी महामंडळाच्या दोन बसचा समोरासमोर धडकून अपघात
अंबड तालुक्यातील शहापूर येथे दोन एसटी बस चा अपघात अपघात घडल्याची घटना. एक बस विद्यार्थ्यांना घेऊन जात होती तर दुसरी बस काही प्रवाशांना घेऊन जात होती. प्रवासी आणि विद्यार्थी मिळून 30 ते 35 जण जखमी असल्याची प्राथमिक माहिती समोर..
-
मुंबई उपनगरात सकाळपासून सुरू असलेल्या पावसाचा परिणाम
अंधेरी पश्चिमेतील वीरा देसाई मार्ग पुन्हा एकदा जलमय झाला आहे. संपूर्ण रस्ता पाण्याखाली गेला असून येथे पूरस्थिती निर्माण झाली आहे. सध्या पावसाचा जोर थोडा कमी आहे, मात्र पाऊस वाढल्यास परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते. फक्त वीरा देसाई रोडच नाही, तर आजूबाजूच्या सोसायट्यांमध्येही मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. सोसायटीपासून रस्त्यापर्यंत सर्वत्र पाणीच पाणी दिसत आहे. त्यामुळे येथील रहिवासी त्रस्त झाले आहेत आणि घराबाहेर पडू शकत नाहीत.
-
मुसळधार पावसाने पुजारीटोला धरण भरले
गोंदिया जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे…. पाणीपातळी वाढल्याने पुजारीटोला धरणाचे चार दरवाजे प्रत्येकी एक फूट उघडण्यात आले आहेत…. त्यामुळे नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू असून, प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे…. सलग चार दिवसांच्या जोरदार पावसामुळे पुजारीटोला धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढला. यामुळे धरणाचे चार दरवाजे प्रत्येकी एक फूट उघडून पाण्याचा नियंत्रित विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
-
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी पावसाची हजेरी
सकाळपासून शहरात दमदार पावसाला सुरुवात. गेल्या अनेक दिवसांपासून नाशिककरांना होती पावसाची प्रतीक्षा. शहरासह जिल्हा देखील काही भागात दमदार पावसाला सुरुवात
-
छत्रपती संभाजीनगरमध्ये सकाळपासून रिमझिम पावसाला सुरुवात
छत्रपती संभाजीनगरमध्ये सकाळपासून रिमझिम पावसाला सुरुवात झाली. सकाळपासून जिल्ह्यात सर्व दूर पाऊस असून आता पेरणीच्या कामाला वेग येणार.
जिल्ह्यात तीन जुलै पर्यंत केवळ 33% पेरण्यांची काम पूर्ण झाली आहेत. जुलै महिन्यापर्यंत सरासरीच्या 21% पाऊस पडला आहे.
-
एफडीएची नाशिक विभागात मोठी धडक कारवाई, ७ नामांकित हॉटेल-रेस्टॉरंटचे परवाने निलंबित
एफडीएने नाशिक विभागात मोठी धडक कारवाई केली. दोन दिवसांत 20 हॉटेल, आणि रेस्टॉरंट मधील खाद्य पदार्थांची तपासणी. अन्न सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन आढळल्याने ७ नामांकित हॉटेल-रेस्टॉरंटचे परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले. सुधारणा नोटीसचे पालन न करणाऱ्या आणखी रेस्टॉरंट वर देखील निलंबनाची कारवाई होणार .
तपासणीत स्वयंपाकघरात अस्वच्छता, अन्नपदार्थ उघड्यावर ठेवल्याचे आढळलं. कर्मचाऱ्यांकडून स्वच्छतेच्या नियमांचे पालन न झाल्याचेही निदर्शनास आलं.
-
अंबरनाथच्या रॉयल पार्कच्या पार्किंगमध्ये भीषण आगीत अनेक वाहनं जळून खाक
अंबरनाथच्या रॉयल पार्क गृहसंकुलाच्या पार्किंगमध्ये भीषण आग लागल्याने अनेक दुचाकी-चारचाकी जळून खाक झाल्या. आगीचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
शुक्रवारी रात्री बाराच्या सुमारास ही घटना घडली. मात्रअग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत आग विझवली. आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही,मात्र वाहनांचं मोठं नुकसान झालं.
-
जळगावच्या अमळनेर मध्ये वेश्या व्यवसाय करण्यासाठी पतीची पत्नीला बेदम मारहाण
जळगावच्या अमळनेर मध्ये वेश्या व्यवसाय करण्यासाठी पत्नीला पतीने बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. पत्नीला जबरदस्तीने दारू व गांजा पाजून वेश्या व्यवसाय करण्यासाठी पतीकडून मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार उघड झाला. याप्रकरणी पती व इतर दोन अशा तीन जणांविरोधात अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला .
-
ठाण्यात मुसळधार पावसाचा थैमान, आज ठाणे जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’
ठाण्यात मुसळधार पावसाचा थैमान सुरू असून आज ठाणे जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. गेल्या २४ तासात ७७.१८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
गेल्या 4 दिवसांत ठाण्यात मुसळधार पावसामुळे ५० झाडं कोसळली, तर ४९ झाडांच्या फांद्या कोसळण्याची घटना. यामध्ये जीविहानी झालेली नाही, पण काही दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे नुकसान झालं.
-
पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विलंबाने
सातत्याने कोसळणाऱ्या पावसाचा फटका मध्य रेल्वेच्या वाहतुकीलाही बसला आहे. मध्य रेल्वेची लोकल सेवा 10 ते 12 मिनिटे उशीराने सुरू आहे. त्यामुळे सकाळी कामावर निघालेल्या नागरिकांचं वेळापत्रक कोलमडलं आहे.
-
कल्याण- शीळ मार्गावरून नेवाळी तो परिसरात रस्त्यावरून गुडघाभर पाणी
सकाळपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कल्याण-बदलापूर रोडवरील शीळ रोड ते नेवाळी चौक परिसरात जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. कल्याण वरून अंबरनाथ कडे जाणाऱ्या मार्गावर गुडघाभर पाणी साचल्याने वाहनचालकांना पाण्यातून मार्ग काढत प्रवास करावा लागत आहे. रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला असून काही ठिकाणी वाहतूक कोंडीही झाली आहे.
-
ठाण्यात पावसाला सुरुवात, रेड अलर्टमुळे शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
ठाण्यात पावसाला सुरुवात झाली आहे. काल रात्रीपासून आतापर्यंत 58 मि मी पावसाची नोंद झाली आहे. सकाळपासून ढगाळ वातावरण दिसून येत आहे. रेड अलर्टमुळे शाळा, महाविद्यालयांना ठाणे जिल्हाधिकारी यांच्याकडून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
Published On - Jul 04,2026 8:57 AM
