
मुंबई | 10 जानेवारी 2024 : शिवसेना आमदार अपात्रतेबाबत आज निकाल येणार आहे. या आधी शिंदे गटाच्या नेत्याने सर्वात मोठा दावा केला आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी अपात्रतेच्या निकालाबाबत दावा केला आहे. विधानसभा अध्यक्ष यांनी जाहीर केलं आहे की, आज संध्याकाळी 5 साडे पाच वाजेपर्यंत निकाल येईल, असं शिरसाट म्हणाले आहेत. आमचाच विजय असेल, असा दावाही संजय शिरसाट यांनी केला आहे.
16 आमदार पात्र की आपत्र हा विषय सुप्रीम कोर्टात गेलेला होता. त्यांनी अध्यक्षांकडे दिलेला होता. एकनाथ शिंदे आणि आम्ही केलेल्या उठाव केला. त्याला यांनी चॅलेंज दिलं आहे. याबाबत कायदेशीर बाबी आम्ही विधानसभा अध्यक्षांसमोर मांडल्या. त्यांना कायदेशीर बाजू मांडता आली नाही. हा निकाल महाराष्ट्रत नाही तर देशभरात अशी घटना घडली तरी हा मार्गदर्शक ठरेल, असं शिरसाट म्हणालेत.
आमदार अपात्रता प्रकरणाचा हा विषय सुप्रीम कोर्टापर्यंत गेला आणि पुन्हा विधानसभा अध्यक्षांकडे आला. आज या प्रकरणी निकाल येण्याची अपेक्षा आहे. जो आम्ही उठाव केला त्याला दिलेलं हे एक चॅलेंज आहे. पण आम्ही केलेला उठाव हा कायद्याच्या चौकटीत बसणारा उठाव आहे. हा निकाल महाराष्ट्रपुरता सिमित नाही. याचा परिणाम देशपातळीवर होणार आहे. निश्चितपणे विजय आमचा होईल, असं संजय शिरसाट म्हणाले.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. आमदार अपात्रतेच्या निकालाआधी ही भेट झाल्याने ठाकरे गटासह विरोधकांनी टीका केली. यावरही शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ठाकरे गटाचा स्वभाव आरोप करण्याचा आहे. निवडणूक आयोगावर पण आरोप केले आहेत. सुप्रीम कोर्टावर पण आरोप केले आहेत. कोण कुणाला भेटलं हे महत्वाचे नाही. कायदा काय म्हणतो याला अर्थ आहे, असं संजय शिरसाट म्हणाले.
आपण हरणार आहोत हे त्यांनी मान्य केलं आहे. म्हणून काल त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि बिनबुडाचे आरोप आहेत. कोण कोणाला भेटलं तर निर्णय बदलत नसतो. कायद्याच्या चौकटीत आहे तोच निकाल देणार आहे. कोणाच्याही विरोधात निकाल लागला तर सुप्रीम कोर्टात चॅलेंज होणार हे ठरलेलं आहे. आम्ही देखील हरलो तरी चॅलेंज करु, कोणीही हरलं तरी चॅलेंज होणार आहे, असंही शिरसाट यांनी म्हटलं आहे.