
मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारी सातही धरणे आता ९९ टक्के किंवा त्याहून अधिक भरलेली आहेत. ज्यामुळे पुढील वर्षभरासाठी मुंबईकरांची पाण्याची चिंता पूर्णपणे मिटली आहे. या धरणांतील मुबलक पाण्यामुळे मुंबईची जून २०२६ पर्यंतची पाण्याची गरज सहज पूर्ण होणार आहे.. त्यामुळे लाखो मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.
सद्यस्थितीत मुंबईला सात धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो. या सात धरणांपैकी दोन धरण ही मुंबईच्या आत आणि पाच मुंबईच्या बाहेर आहेत. यात अप्पर वैतरणा, तानसा, मध्य वैतरणा आणि मोडक सागर या धरणांचा समावेश आहे. जी पूर्ण क्षमतेने भरली आहेत. तर दुसरीकडे इतर धरणांमधील पाणीसाठा हा ९९ टक्क्यांहून अधिक असल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांपैकी अप्पर वैतरणा, तानसा, मिडल वैतरणा आणि मोडक सागर ही चार प्रमुख धरणे पूर्ण क्षमतेने भरली असल्याने मुंबईकरांच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.
या चार धरणांमधून गुरुत्वाकर्षणाच्या मदतीने पाणी थेट भांडुप पंपिंग स्टेशनला पोहोचते. तिथे पाण्यावर प्रक्रिया करून ते मुंबईच्या घराघरात पाठवले जाते. या धरणांतून मुंबईच्या एकूण पाणीपुरवठ्याच्या ५० टक्के पाणी येते, तर उर्वरित ५० टक्के पाणी भातसा धरणातून येते.
भांडुप पंपिंग स्टेशनपासून सुमारे ६० किलोमीटर दूर असलेल्या तानसा धरणातून पाणी गुरुत्वाकर्षणाने मिडल वैतरणा आणि त्यानंतर मोडक सागर धरणात येते. तिथून ते थेट भांडुप पंपिंग स्टेशनला पोहोचते. या स्टेशनमध्ये पाण्यावर शुद्धीकरण प्रक्रिया केली जाते. त्यानंतर ते अगदी मलबार हिलपासून मुंबईच्या विविध भागांत घराघरात पोहोचवले जाते. हे खरंच एक आश्चर्यकारक तंत्रज्ञान आहे, ज्यामुळे मुंबईची वर्षभराची तहान भागते.
मुंबईला दररोज सुमारे ४००० दशलक्ष लिटर (MLD) पाण्याची गरज असते. त्यापैकी ५० टक्के पाणी या धरणांमधून येते, तर उर्वरित ५०% पाणी भातसा धरणातून येते. सध्या धरणे ९९ टक्क्यांपेक्षा जास्त भरलेली असल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.
मुंबई महानगरपालिकेचे जल अभियंता पुरुषोत्तम माळवदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाणी व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी काही उपाययोजना सुरू आहेत. पाण्याची गळती रोखण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे, कारण जमिनीखालील गळती शोधणे आणि दुरुस्त करणे आव्हानात्मक असते. रस्त्यांसाठी सिमेंट काँक्रिटचा वापर केल्यास पाण्याची गळती कमी होण्यास मदत होते.
तसेच भविष्यात मुंबईच्या वाढत्या लोकसंख्येची पाण्याची मागणी पूर्ण करण्यासाठी गारगाई धरण लवकरच बांधले जाणार आहे. या धरणाच्या काही परवानग्या अद्याप मिळाल्या नाहीत, पण ते पूर्ण झाल्यावर मुंबईला दररोज अतिरिक्त ४४० MLD पाणी मिळेल. तसेच, आतापर्यंत २२,००० जलजोडण्या अधिकृत करण्यात आल्या आहेत, ज्यामुळे पाण्याची चोरी कमी झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांनी पाण्याची चिंता करु नये, असे पुरुषोत्तम माळवदे यांनी सांगितले.