मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, 15 मे पासून तुमच्या नळाला पाणी कमी येणार, किती टक्के कपात?

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील पाणीसाठा घटल्याने १५ मे २०२६ पासून मुंबई आणि उपनगरात १० टक्के पाणी कपात लागू करण्यात आली आहे. पालिकेने नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले असून राखीव साठ्यातून पाण्याचे नियोजन केले जाणार आहे.

मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, 15 मे पासून तुमच्या नळाला पाणी कमी येणार, किती टक्के कपात?
BMC Water issue
| Updated on: May 12, 2026 | 9:33 AM

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांमधील पाणीसाठ्याने तळ गाठला आहे. याच पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेने संपूर्ण शहर तसेच उपनगरात १० टक्के पाणी कपात जाहीर केली आहे. वाढते तापमान, बाष्पीभवनाचा वेग आणि आगामी मान्सूनबाबत हवामान खात्याने वर्तवलेला अंदाज लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शुक्रवार १५ मे २०२६ पासून मुंबईसह उपनगरात ही पाणी कपात लागू होणार आहे. जोपर्यंत पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ होत नाही, तोपर्यंत ही कपात कायम राहणार आहे.

महानगरपालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये सध्या केवळ ३ लाख ४० हजार ३९९ दशलक्ष लीटर पाणीसाठा उपलब्ध आहे. वार्षिक गरजेच्या तुलनेत हा साठा केवळ २३.५२ टक्के इतकाच शिल्लक आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून तापमान सातत्याने वाढत असून यामुळे बाष्पीभवन होत आहे. तसेच अल निनोच्या प्रभावामुळे आगामी मान्सूनबाबत अनिश्चितता पाहायला मिळत आहे. त्यामुळे उपलब्ध पाणीसाठा जास्तीत जास्त काळ टिकवून ठेवणे आवश्यक आहे. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून जलसंपदा विभागाच्या सूचनेनुसार ही कपात लागू करण्यात आली आहे.

प्रशासनाचे मुंबईकरांना धीर देण्याचे आवाहन

मुंबईकरांनी या कपातीमुळे घाबरून जाण्याचे कारण नाही, असे आश्वासन पालिकेने दिले आहे. भातसा आणि अप्पर वैतरणा या धरणांच्या राखीव साठ्यातून मुंबईसाठी अतिरिक्त पाणीसाठा उपलब्ध करून घेण्यात येणार आहे. मात्र, भविष्यात उद्भवू शकणारी टंचाई टाळण्यासाठी आतापासूनच नियोजन करणे गरजेचे आहे. ही कपात केवळ मुंबईच नव्हे, तर ठाणे आणि भिवंडी-निजामपूर यांसारख्या ज्या भागांना मुंबईतून पाणीपुरवठा होतो, तिथेही लागू असेल.

पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी पालिकेच्या खास टिप्स

प्रशासनाने नागरिकांना खालीलप्रमाणे पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले आहे.

  • अंघोळीसाठी शॉवर न वापरता बादलीत पाणी घेतल्यास मोठी बचत होऊ शकते.
  • घरातील किंवा सोसायटीतील नळ गळत असल्यास त्याची त्वरित दुरुस्ती करा. नळांना पाण्याचा प्रवाह मर्यादित करणारे नोझल बसवल्यास ६० टक्क्यांपर्यंत पाणी वाचवता येते.
  • दाढी करताना किंवा दात घासताना नळ विनाकारण सुरू ठेवू नका. लादी धुण्याऐवजी ओल्या कापडाने पुसून घ्या.
  • गाड्या पाईप लावून धुण्याऐवजी बादलीत पाणी घेऊन कापडाने पुसून काढाव्यात.
  • उपहारगृहांनी ग्राहकांना विचारल्याशिवाय पाणी देऊ नये, जेणेकरून न वापरलेले पाणी वाया जाणार नाही.
  • महानगरपालिका प्रशासनाच्या या प्रयत्नांना सहकार्य करून मुंबईकरांनी पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Follow Us