मुंबईकरांनी कमालच केली! गणेशोत्सवात मोदकांच्या ऑर्डरने मोडले रेकॉर्ड; एकाच ग्राहकाने खर्च केले तब्बल इतके रुपये
गणेशोत्सवात मुंबईकरांनी कमालच केली. मोदकांच्या ऑर्डरने सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. एकाच ग्राहकाने तब्बल लाखो रुपये खर्च केले आहेत. फक्त मिठाईच नाही तर सोन्या-चांदीच्या नाण्यांचीही मोठी खरेदी केली.

मुंबईकरांचा उत्साह, त्यांची खरेदीची पद्धत आणि सण साजरा करण्याची अनोखी स्टाइल पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यंदाच्या गणेशोत्सवात बाप्पाच्या स्वागतासाठी मुंबईकरांनी मोठ्या प्रमाणावर खरेदी केली. मोदक, मिठाई, फुलं आणि पूजासाहित्याला विशेष मागणी होती. विशेष म्हणजे, एका ग्राहकाने सोने-चांदीची नाणी आणि मिठाईच्या खरेदीवर तब्बल 3.88 लाख रुपये खर्च केले आहेत. क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म इन्स्टामार्टच्या 14 ते 23 सप्टेंबरदरम्यानच्या ऑर्डर विश्लेषणातून ही माहिती समोर आली आहे. गणेशोत्सव म्हटलं की मोदक आलेच. यंदाही मुंबईकरांच्या खरेदीमध्ये मोदकांनी अव्वल स्थान पटकावलं. मोदकांनंतर लाडू आणि काजू कतलीला मोठी मागणी होती. गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी मोदकांच्या ऑर्डर्समध्ये मोठी वाढ झाली. मागणी इतकी वाढली की, प्रति मिनिट जवळपास 100 मोदकांच्या ऑर्डर्स नोंदवल्या गेल्या.
पूजासाहित्याचीही प्रचंड मागणी
मुंबईकरांचं मोदकांवरील प्रेम मोठ्या खरेदीतही पाहायला मिळालं. शहरातील एका ग्राहकाने केवळ मोदक खरेदी करण्यासाठी तब्बल 8,277 रुपये खर्च केले. गणेशोत्सवाच्या काळात मुंबईकरांच्या ऑर्डर्सचा ट्रेंडही त्यांच्या धार्मिक विधींशी जोडलेला दिसला. 13 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजून 12 मिनिटांनी मोदकांच्या ऑर्डर्सचा उच्चांक नोंदवला गेला. त्याच दिवशी दुपारी 2 वाजून 27 मिनिटांनी मिठाईच्या मागणीत मोठी वाढ झाली. गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी 7 वाजून 45 मिनिटांनी फुलांच्या ऑर्डर्स सर्वाधिक होत्या. त्यानंतर सकाळी 8 वाजून 47 मिनिटांनी पूजासाहित्याच्या मागणीने उच्चांक गाठला. 19 सप्टेंबरला पाहुण्यांच्या स्वागतासाठी आणि घराच्या तयारीसाठी साफसफाईच्या साहित्याच्या मागणीतही वाढ झाली.
सोने-चांदीच्या नाण्यांची मोठी खरेदी
गणेशोत्सवात मुंबईकरांनी केवळ मिठाई किंवा पूजासाहित्यावरच खर्च केला नाही, तर पारंपरिक सोने-चांदीच्या नाण्यांची खरेदीही मोठ्या प्रमाणात केली. यातील सर्वाधिक चर्चेत असलेली खरेदी भायखळा इथल्या एका ग्राहकाची आहे. या ग्राहकाने विविध ऑर्डर्समधून तब्बल 3.88 लाख रुपयांची सोने-चांदीची नाणी आणि मिठाई खरेदी केली. मोठ्या ऑर्डर्समध्ये 24 कॅरेट सोन्याचं नाणं, मोतीचूर लाडू, काजू कतली, फुलांच्या माळा आणि पूजासाहित्य यांचा समावेश होता.
याशिवाय जुहू आणि कासारवडवली परिसरातील ग्राहकांनीही मोठ्या प्रमाणावर खरेदी केली. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात मुंबईकरांनी परंपरा, भक्ती आणि आधुनिक ऑनलाइन खरेदीचा अनोखा मेळ घडवून आणल्याचं या ऑर्डर डेटावरून दिसून आलं.
