कोणत्याही पदापेक्षा जात, धर्म आणि… नारायण राणे यांचा सरकारला सूचक इशारा

| Updated on: Jan 29, 2024 | 3:55 PM

राज्य सरकारने मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या मराठा समाजाकडे कुणबी प्रमाणपत्र नाही, अशांना नातेवाईकांच्या प्रतिज्ञापत्रावर कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे मराठा समाज ओबीसीतील आरक्षणास पात्र ठरणार आहे. मात्र, मराठा समाजाचं झालेलं ओबीसीकरण केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पटलेलं नाही. त्यांनी सरकारच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

कोणत्याही पदापेक्षा जात, धर्म आणि... नारायण राणे यांचा सरकारला सूचक इशारा
narayan rane
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

विनायक डावरुंग, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 29 जानेवारी 2024 : मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारला घेरलं आहे. आरक्षण हा नाजूक प्रश्न आहे. त्याचा सरकारने सखोल विचार करावा. कोणत्याही पदापेक्षा जात, धर्म आणि देश महत्त्वाचे आहेत एवढंच मला सांगावेसे वाटते, असा सूचक इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिला आहे. नारायण राणे यांनी ट्विट करून हा सूचक इशारा दिला आहे. तसेच पत्रकार परिषद घेणार नसल्याचंही म्हटलं आहे.

नारायण राणे यांनी ट्विट करून प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मराठा आरक्षण या विषयावर आज पत्रकार परिषद आयोजित केली होती. ही पत्रकार परिषद रद्द करण्‍यात येत आहे. या विषयावर मला महाराष्‍ट्र शासनाला विनंती करावयाची आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या महाराष्‍ट्रात लढवय्येपणाचा वारसा आणि इतिहास असलेल्‍या मराठा समाजाचे खच्‍चीकरण होणार नाही याची काळजी घ्‍यावी. स्‍वाभिमानी मराठा कुणबी समाजामध्‍ये समाविष्‍ट होऊन आरक्षण घेणार नाही. याशिवाय तसे केल्‍याने इतर मागास वर्ग (ओबीसी) समाजावर अतिक्रमण होणार आहे, असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

सरकारने सखोल विचार करावा

या सगळया नाजूक प्रश्‍नाचा महाराष्‍ट्र सरकारने सखोल विचार करावा. महाराष्‍ट्रामध्‍ये मराठा समाजाची संख्‍या 32 टक्‍के म्‍हणजे 4 कोटी एवढी आहे. कोणत्‍याही पदापेक्षा जात, धर्म आणि देश महत्त्वाचे आहेत एवढंच मला सांगावेसे वाटते, असं सूचक विधानही नारायण राणे यांनी केलं आहे.

सत्तेतून बाहेर पडून

दरम्यान, ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी राणे यांच्यावर टीका केली आहे. नारायण राणे आणि छगन भुजबळ हे दोन्ही नेते सरकारमध्ये राहून सरकारच्या निर्णयाला विरोध करत आहेत. हे फक्त मतासाठी विरोध करत आहेत. नारायण राणे आणि छगन भुजबळ या दोघांनी सत्तेतून बाहेर येऊन भूमिका मांडली पाहिजे, अशी प्रतिक्रिया आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केली.

 

त्यांच्या पचनी पडत नाही

शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनीही राणे यांच्या भूमिकेवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. नारायण राणे यांच्या कोकण विभागात वेगळे समीकरण आहे. त्यामुळे त्यांच्या राजकारणासाठी त्यांनी ती वेगळी भूमिका घेतली आहे. मात्र कुणबी नोंदी इतरत्र सर्वांना आवश्यक होत्या. या आंदोलनात सर्व लोक उपस्थित होते. नेत्यांना बाजूला काढून हे आंदोलन झालं. न्याय मिळाला. त्यामुळे त्यांच्या पचनी पडत नाही, असा चिमटा संजय शिरसाट यांनी लगावला.