नवी मुंबईत मशिदीच्या मौलवीला कोरोना, तीन फिलिपिनी नागरिकांनाही संसर्ग

नवी मुंबईमध्ये एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या पाचवर गेली असून त्यामध्ये फिलिपिन्सच्या तिघा नागरिकांचा समावेश आहे. (Navi Mumbai Mosque Mawlawi detected Corona)

नवी मुंबईत मशिदीच्या मौलवीला कोरोना, तीन फिलिपिनी नागरिकांनाही संसर्ग
| Updated on: Mar 25, 2020 | 9:35 AM

नवी मुंबई : वाशीमध्ये मशिदीच्या मौलवीला कोरोनाची लागण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. मौलवीसोबतच तीन फिलिपिनी नागरिकांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. मशिदीत आलेल्या नागरिकांनाही संसर्ग झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून, आकडा वाढण्याची शक्यता आहे. (Navi Mumbai Mosque Mawlawi detected Corona)

नवी मुंबईमध्ये एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या पाचवर गेली आहे. त्यामध्ये फिलिपिन्स देशाच्या तिघा नागरिकांचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वी वाशीच्या नूर मशिदीमध्ये 10 फिलिपिनी नागरिक धार्मिक कार्यक्रमासाठी आले होते. या मशिदीमध्ये ते दोन दिवस थांबले होते.

मशिदीमध्ये त्या दिवशी नमाज अदा करण्यासाठी आलेल्या 50 जणांना ‘होम क्वारंटाईन करण्यात आलं आहे. कोरोनाची लागण झालेल्या मौलवीला मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. तर आयसोलेशन वॉर्ड म्हणजेच विलगीकरण कक्षामध्ये 12 जणांना ठेवण्यात आलं आहे.

फिलिपिन्सच्या 68 वर्षीय नागरिकाचा सोमवार 23 मार्चला मुंबईत मृत्यू झाला होता. परंतु त्याचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला होता, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती.

हिरानंदानी रुग्णालयात मृत्यू झालेल्या त्या रुग्णाचा कोरोना हा आजार बरा झाला होता. त्याला असलेल्या मधुमेह आणि अस्थमा या आजारांमुळे झालेल्या गुंतागुंतीत त्याचा मृत्यू झाला. त्याचा मृत्यू कोरोनामुळे झालेला नाही, असं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं होतं.

मुंबई-दिल्ली फिरलेल्या फिलिपिन्सच्या ‘त्या’ नागरिकाचा ‘कोरोना’मुळे मृत्यू नाही

मृत्यू झालेल्या फिलिपिन्सच्या संबंधित नागरिकाने मुंबई, नवी मुंबई आणि दिल्ली अशा तीन महत्त्वाच्या शहरात प्रवास आणि धार्मिक स्थळांवर वास्तव्यही केलं होतं. हा सर्व धक्कादायक प्रकार मुंबई महापालिकेच्या सतर्कतेमुळे समोर आला होता. त्यामुळे सर्वत्र धाकधूक वाढली होती.

फिलिपिन्सच्या कोरोनाबाधित रुग्णाचा धक्कादायक प्रवास

  • 3 मार्च – फिलिपिन्समधून या बाधितासह एकूण 10 जणांचा गट मुंबईत आला. या सर्वांची राहण्याची व्यवस्था वाशीतील नूर मशिदीत करण्यात आली.
  • 5 मार्च – फिलिपिन्समधून आलेला हा गट वाशीतून मुंबई सेंट्रल स्थानक आणि तिथून रेल्वेमार्गे दिल्लीला गेला.
  • 6 मार्च – दिल्लीतील एका मशिदीत त्यांच्या राहण्याची सोय करण्यात आली
  • 7 ते 9 मार्च – दिल्लीतील मशिदीत धार्मिक कार्यक्रमात हा गट सहभागी झाला
  • 10 मार्च – रेल्वे मार्गे हा गट दिल्लीतून मुंबईला परतला आणि पुन्हा वाशीच्या मशिदीत मुक्कामाला पोहोचला
  • 10 मार्च – या 10 जणांच्या गटातील 68 वर्षीय व्यक्तीला श्वसनाचा त्रास होत असल्यानं डॉक्टरकडे नेण्यात आलं, तपासणीनंतर डॉक्टरांना त्यांना कस्तुरबा रुग्णालयात पाठवले
  • 12 मार्च – तपासणी अहवालात या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं
  • 13 मार्च – वाशी आणि दिल्लीतील या गटानं वास्तव्य केलेल्या मशिदी 14 दिवसांसाठी बंद करण्यात आल्या
  • 14 मार्च – या गटातील इतरांनाही कस्तुरबा रुग्णालयात विलगीकरणात ठेवण्यात आलं, त्यातील दोघांना कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं
  • 17 मार्च – 68 वर्षीय फिलिपिन्सच्या नागरिकाची प्रकृती खालावली, त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं
  • 23 मार्च – फिलिपिन्सच्या नागरिकाचा मृत्यू झाला

(Navi Mumbai Mosque Mawlawi detected Corona)