Ajit Pawar : राष्ट्रवादीला मोठा झटका, 7 आमदारांनी सोडली अजितदादांची साथ; या पक्षाची धरली कास

NCP Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा भूकंप झाला आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठा झटका बसला. सात आमदारांनी या पक्षाला अचानक रामराम ठोकल्याने एकच खळबळ उडाली आहे. काय आहे ही घडामोड?

Ajit Pawar : राष्ट्रवादीला मोठा झटका, 7 आमदारांनी सोडली अजितदादांची साथ; या पक्षाची धरली कास
अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 7 आमदारांचा रामराम
Image Credit source: गुगल
| Updated on: Jun 01, 2025 | 11:25 AM

7 MLA Left NCP : नागालँडमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा झटका बसला आहे. राष्ट्रवादीच्या 7 आमदारांनी अधिकृतपणे मुख्यमंत्री नेफ्यू रिओ यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोगेसिव्ह पार्टीत (NDPP) प्रवेश केला. अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी ही नागालँडमध्ये मुख्य आणि मोठा विरोधी पक्ष होता. आता हे आमदार सत्ताधारी पक्षात गेल्याने या सरकारला कुठलाही धोका उरलेला नाही.

नेफ्यू सरकार पूर्ण बहुमतात

या नवीन राजकीय घडामोडींमुळे नागालँडमधील नेफ्यू रिओ सरकार पूर्ण बहुमतात आले आहे. 60 सदस्यीय विधानसभेत आता पक्ष मजबूत झाला आहे. या सरकारला आता धोका नाही. राष्ट्रवादीच्या विभाजनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नागालँडमधील आमदारांनी अजित पवार यांची बाजू घेतली होती. त्यानंतर आता या सात जणांनी टुणकन सत्ताधारी पक्षात प्रवेश केला.

निवडणुकीत मिळवले मोठे यश

2023 मध्ये विधानसभा निवडणुका झाल्या. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसने घवघवीत यश मिळवले होते. एनसीपी राज्यातील तिसरी सर्वात मोठी पार्टी ठरली होती. एनडीपीपी, भाजपानंतर या पक्षाने राज्यात 12 जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे महाराष्ट्राबाहेर एनसीपीचे अस्तित्व दिसून आले होते.

विलिनीकरणास विधानसभा अध्यक्षांची मंजूरी

राष्ट्रवादीच्या 7 आमदारांचा गट सत्ताधारी एनडीपीपीत सहभागी होण्यासाठी विधानसभा अध्यक्षांनी मंजूरी दिली. यामध्ये नामरी नचांग, के. ए. पोंगशी फोम, पिक्टो शोहे, वाई म्होनबेमो हम्त्सो, वाई मनखाओ कोन्याक, के. एस. तोइहो येप्थो यांनी आता सत्ताधारी एनडीपीपी पक्षात प्रवेश केला आहे. हे विलीनीकरण दहाव्या अनुसूची अंतर्गत संवैधानिक गरज पूर्ण करत असल्याचे सभापती म्हणाले. विधानसभा अध्यक्षांनी या विलीनीकरणास मंजूरी दिली आहे. विधानसभा सचिवालयाला पक्ष संलग्नतेविषयीचे रेकॉर्ड अद्ययावत करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

NDPP 25 हून आता 32 वर

काल संध्याकाळी राष्ट्रवादीच्या 7 आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे विलीनीकरणाचे पत्र दिले होते. त्याला अध्यक्षांनी मंजूरी दिली. त्यानंतर 14 व्या नागालँड विधानसभेत एनडीपीपी सदस्यांची संख्या 25 वरून 32 इतकी झाली. या नवीन राजकीय समीकरणामुळे मुख्यमंत्री आणि सरकार मजबूत झाल्याचे पक्ष प्रवक्ते केन्ये म्हणाले.

राष्ट्रवादीचा तीव्र आक्षेप

या घडामोडीवर आता राष्ट्रवादी पक्षातून तीव्र प्रतिक्रिया आली आहे. एनसीपीचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि राष्ट्रीय महासचिव बृजमोहन श्रीवास्तव यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. विधानसभा निवडणुकीत नागालँडच्या मतदारांनी एनसीपीवर विश्वास दाखवला होता. जनादेश आमच्या बाजूने होता. आता पक्ष बदलाविरोधात कायद्यातील तरतुदींनुसार आणि इतर कायदेशीर प्रक्रियेतंर्गत चौकशी करण्यात येईल आणि पुढील कारवाई करण्यात येईल असे श्रीवास्तव म्हणाले. बाहेर पडलेल्या आमदारांशी संपर्क साधून त्यांची बाजू ऐकणार असल्याचे ते म्हणाले. या आमदारांनी त्यांच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे श्रीवास्तव म्हणाले.