मुख्यमंत्र्यांची नेमकी भेट का घेतली? अखेर शरद पवार यांच्याकडून स्पष्टीकरण

| Updated on: Jun 01, 2023 | 10:01 PM

मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर शरद पवार जेव्हा वर्षा निवासस्थानाबाहेर आले तेव्हा त्यांनी माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. ते माध्यमांना प्रतिक्रिया न देताच वर्षा निवासस्थानाहून निघून आले. त्यामुळे वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात होते. अखेर पवारांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

मुख्यमंत्र्यांची नेमकी भेट का घेतली? अखेर शरद पवार यांच्याकडून स्पष्टीकरण
Follow us on

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी दाखल होत त्यांची भेट घेतली. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. या भेटीनंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं होतं. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर शरद पवार जेव्हा वर्षा निवासस्थानाबाहेर आले तेव्हा त्यांनी माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. ते माध्यमांना प्रतिक्रिया न देताच वर्षा निवासस्थानाहून निघून आले. त्यामुळे वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात होते. अखेर शरद पवार यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

“मराठा मंदिर, मुंबई संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त वर्धापन सोहळ्याचे आयोजन संस्थेतर्फे करण्यात येणार आहे. संस्थेचा अध्यक्ष या नात्याने आज महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या कार्यक्रमाला आमंत्रित करण्यासाठी वर्षा या त्यांच्या शासकीय निवासस्थानी त्यांची भेट घेतली”, असं शरद पवार यांनी ट्विटरवर सांगितलं.

हे सुद्धा वाचा

“यासोबतच महाराष्ट्रातील मराठी चित्रपट, नाट्य व कला क्षेत्रातील कलावंत, कारागीर यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी बैठक आयोजित करण्याबाबत व सदर बैठकीस चित्रपट, नाट्य, लोककला, वाहिन्या व इतर मनोरंजन माध्यमांतील संघटनांना निमंत्रित करण्याबाबत मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा केली”, अशी माहिती शरद पवार यांनी दिली.

एकनाथ शिंदे यांनीही दिलीय प्रतिक्रिया

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्या भेटीबद्दल माहिती दिली. “शरद पवार यांची ही सदिच्छा भेट होती. मराठा मंदिर संस्था आहे. या संस्थेचे अध्यक्ष शरद पवार हे आहेत. या संस्थेचा अमृत महोत्सव कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी शरद पवार आले होते”, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

“ही सदिच्छा भेट होती. या बैठकीत काही चर्चा झाली नाही. या भेटीत निमंत्रण होतं. याशिवाय काही एक-दोन छोटे विषय होते. यामध्ये शाळांचा विषय होता, कलावंतांचा विषय होता. मुख्य म्हणजे त्यांचं निमंत्रण होतं. अमृत महोत्सवी कार्यक्रम आहे. त्याचे ते अध्यक्ष आहेत. बाकी काही नाही”, असं शरद पवार ‘टीव्ही 9 मराठी’सोबत बोलताना म्हणाले.