
न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँकमधील गैरव्यवहारप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने बँकेचा जनरल मॅनेजर हितेश मेहताला अटक केली आहे. हितेश मेहतांवर न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँकेच्या दादर व गोरेगाव येथील शाखेतन 122 कोटींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. आता नुकतंच या घोटळ्यातील एका तक्रारदाराच्या जबाबाची विशेष प्रत समोर आली आहे. यात त्यांनी बँकेचा जनरल मॅनेजर हितेश मेहता यांनी बँकेच्या तिजोरीतून मोठी रक्कम लुटल्याचे उघड झाले आहे.
हितेश मेहता याच्यावर 122 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी दादर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी हितेश मेहताला अटक केली आहे. हितेशवर दादर आणि गोरेगाव येथील बँकेच्या शाखेतून गैरव्यवहार करत तब्बल 122 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे.
हितेश हा बँकेचा अकाउंट हेड होता. त्याच्याकडे बँकेची रोख रक्कम सांभाळण्याची जबाबदारी होती. तसेच जीएसटी, टीडीएस आणि पूर्ण अकाउंट सांभाळण्याची जबाबदारीही त्याला देण्यात आली होती. चार दिवसांपूर्वी 12 फेब्रुवारी रोजी आरबीआयच्या अधिकाऱ्यांनी न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँकेचे ऑडिट केले. त्यावेळी त्यांना बँकेतील रोख रक्कमेबद्दल मोठी अनियमितता आढळली. आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, बँकेच्या एका वरिष्ठ कर्मचाऱ्याने याबद्दलची तक्रार नोंदवली. तो सकाळी ९ वाजल्यापासून मुंबईतील प्रभादेवी येथील बँकेच्या कॉर्पोरेट कार्यालयात उपस्थित होता.
त्याचवेळी, आरबीआयचे डेप्युटी जीएम रवींद्रन आणि आणखी एक अधिकारी संजय कुमार ऑडिटसाठी आले. यावेळी बँकेचे इतर वरिष्ठ अधिकारी – महाव्यवस्थापक, सहाय्यक महाव्यवस्थापक (एजीएम) आणि इतर वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते. या बँकेच्या मुख्य तिजोरीचे लॉकर इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर होते. आरबीआय अधिकाऱ्यांनी न्यू इंडिया बँकेचे कर्मचारी अतुल म्हात्रे यांच्याकडून लॉकरच्या चाव्या घेतल्या. त्यानंतर त्यांनी तिजोरीतील रक्कम मोजण्यास सुरुवात केली.
याचदरम्यान आरबीआय अधिकाऱ्यांचे एक पथक न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या गोरेगाव शाखेत गेले होते. त्यांनी तिथे ठेवलेल्या तिजोरीतील रोख रक्कम मोजली. यानंतर काही तासांनी आरबीआय अधिकाऱ्यांनी बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना वरच्या मजल्यावर बोलावून घेतले. त्यावेळी त्यांनी सांगितले की बँक लॉकरमध्ये ठेवलेली रक्कम आणि रजिस्टरमध्ये नोंदवलेली रक्कम यात खूप फरक आहे. बँकेच्या लॉकरमधून 112 कोटी रुपयांची रोकड गायब झाली आहे. तसेच गोरेगाव शाखेतूनही 10 कोटी रुपये गायब झाले आहेत.
यामुळे आम्हाला सर्वांना धक्का बसला. आम्ही काय बोलावे, हे कळत नव्हते. आरबीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितले की जर तुम्हाला रक्कम कुठे आहे, याची माहिती असेल, तर तुम्ही आम्हाला सांगू शकता किंवा आम्हाला ईमेलही करु शकता. याच दरम्यान हितेश मेहता यांनी आरबीआय अधिकाऱ्यांची खाजगीत भेट घेतली आणि त्यांनी ही रोख रक्कम गायब केल्याची कबुली दिली. यानतंर आरबीयच्या अधिकाऱ्यांकडून ही रक्कम कुठे गेली, असे विचारण्यात आले. त्यावर मेहताने सांगितले की मी हे पैसे काही ओळखीच्या लोकांना दिले आहेत. कोविडच्या काळापासून मी बँक लॉकरमधून पैसे काढत आहे, असा खुलासा त्यांनी केला.
दरम्यान न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँकेच्या प्रभादेवी शाखेतून 112 कोटी तर गोरेगाव शाखेतून 10 कोटी रुपये गायब केल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत बँकेच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्थिक गुन्हे शाखेने बँकेचा जनरल मॅनेजर हितेश मेहताला अटक केली आहे. ईओडब्ल्यू टीमने दहिसर येथील हितेश मेहताच्या घरावर छापा टाकलात आणि त्याला अटक केली. सध्या पोलीस या घोटाळ्याचा सखोल तपास करत आहेत. तसेच 122 कोटी रुपये कुठे गेले आणि यात आणखी कोण कोण सहभागी आहेत, याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.