आजोबांनी आयपीएल आणून चिअरलीडर्स नाचवल्या, आता नातू कोविड सेंटरमध्ये नाचतोय; निलेश राणेंची जहरी टीका

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या कोविड सेंटरमधील नृत्यावरून सुरू झालेला राजकीय थयथयाट अजून सुरूच आहे. (nilesh rane taunt rohit pawar over Zingaat Song Dance in covid center)

आजोबांनी आयपीएल आणून चिअरलीडर्स नाचवल्या, आता नातू कोविड सेंटरमध्ये नाचतोय; निलेश राणेंची जहरी टीका
nilesh rane
| Updated on: May 26, 2021 | 8:07 PM

मुंबई: राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या कोविड सेंटरमधील नृत्यावरून सुरू झालेला राजकीय थयथयाट अजून सुरूच आहे. आता भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांनी कोविड सेंटरमधील नृत्यावरून रोहित पवारांवर टीकास्त्र सोडलं आहे. (nilesh rane taunt rohit pawar over Zingaat Song Dance in covid center)

निलेश राणे यांनी ट्विट करून ही टीका केली आहे. ‘आजोबांनी आयपीएल आणून चिअरलीडर्स नाचवल्या. नातू कोविड सेंटरमध्ये नाचतोय. वर स्वतःची बाजू घेण्यासाठी सांगतो की, मी नेहमी सेंटरमध्ये जाऊन नाचतो. नाचा, जेवढं नाचायचं तेवढं 2024 पर्यंत नाचून घ्या’, अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे. त्यामुळे निलेश राणे यांच्या या टीकेला रोहित पवार काय उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

प्रोटोकॉलचा भंग: दरेकर

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही रोहित पवारांवर टीका केली आहे. “रोहित पवार यांनी एका कोव्हिड सेंटरवर जाऊन कोव्हिड प्रोटोकॉलचा भंग केला, तो निषेधार्ह आहे. कोणतंही पीपीई किट न घालता ते गेले, त्यामुळे ते सुपर स्प्रेडर ठरू शकतात. सर्व सामान्य नागरिकांना एक न्याय आणि रोहित पवार हे शरद पवार यांचे नातू आहेत म्हणून त्यांना दुसरा न्याय का, असा प्रश्न निर्माण होतो. कुणीही लोक प्रतिनिधी असो, त्यांनी गांभीर्याने या गोष्टींचं भान ठेवलं पाहिजे, अशी आमची अपेक्षा आहे” असं प्रवीण दरेकर म्हणाले होते.

रोहित पवारांचं उत्तर

दरेकरांच्या या टीकेला रोहित पवार यांनी उत्तर दिलं आहे. “सन्माननीय प्रवीण दरेकर साहेब, कोविड सेंटरमधली माणसं माझ्या कुटुंबातली असून त्यांच्यासाठी कितीही केलं तरी ते कमी आहे. त्यामुळं शक्य ते सगळं करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असतो. अगदी पहिल्या दिवसापासून मी त्यांची काळजी घेतो. त्यांना काल एकच दिवस भेटलो असं नाही तर नेहमीच भेटतो. माझ्या मतदारसंघातले अधिकारी आणि नागरिकही या रुग्णांची जमेल तशी सेवा करतात. कोविडमुळं खचलेल्या रुग्णांना माझ्या भेटीमुळं धीर येत असेल, त्यांच्या आनंदात दोन मिनिटं सहभागी झाल्याने तो द्विगुणित होत असेल तर त्यात गैर काय? त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हाच माझ्यासाठी आनंद आहे,” असं रोहित पवार यांनी म्हटलं होतं.

असं का?

त्याचबरोबर “5 वी नापास झालेल्या गुजरातमधल्या एका आमदारासारखं रुग्णाला इंजेक्शन दिलं नाही. तसंच आपल्याही पक्षाचे अनेक नेते पीपीई किटशिवाय रुग्णांना भेटले, तेव्हा त्यांच्या निदर्शनास आपण ही गोष्ट आणून दिल्याचंही काही दिसलं नाही! असं का?”, असा सवालही रोहित यांनी केला आहे. (nilesh rane taunt rohit pawar over Zingaat Song Dance in covid center)

 

संबंधित बातम्या:

कोविड सेंटरमधील ‘झिंगाट’ डान्सवरुन रोहित पवार आणि दरेकरांमध्ये ट्विटर वॉर!

कोविड सेंटरमधील ‘झिंगाट’ डान्सवरुन दरेकरांच्या टीकेला रोहित पवारांचं जोरदार प्रत्युत्तर

कोरोनाग्रस्तांसोबत रोहित पवारांचा डान्स, दरेकर म्हणतात पवारांचा नातू म्हणून दुसरा न्याय का?

(nilesh rane taunt rohit pawar over Zingaat Song Dance in covid center)