चक्रीवादळाचा फटका ही अफवा, बीकेसीतील कोव्हिड 19 रुग्णालय दणक्यात उभं : महापालिका

| Updated on: Jun 04, 2020 | 1:41 PM

वांद्रे-कुर्ला संकुलाच्या (बीकेसी) मैदानावरील कोव्हिड 19 हे हजार बेडचं जम्बो रुग्णालय पुन्हा सुरु होत आहे. (No damage to BKC covid center )

चक्रीवादळाचा फटका ही अफवा, बीकेसीतील कोव्हिड 19 रुग्णालय दणक्यात उभं : महापालिका
Follow us on

मुंबई : निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर रुग्णांना अन्यत्र हलवल्यानंतर, आता वांद्रे-कुर्ला संकुलाच्या (बीकेसी) मैदानावरील कोव्हिड 19 हे हजार बेडचं जम्बो रुग्णालय पुन्हा सुरु होत आहे. (No damage to BKC covid center ) चक्रीवादळाने या रुग्णालयाचं प्रचंड नुकसान झाल्याचा दावा भाजप आमदार नितेश राणे यांनी केला होता. मात्र मुंबई महापालिकेने हा दावा खोडून काढत, हे रुग्णालय आज संध्याकाळपर्यंत पूर्ववत होईल, असं म्हटलं आहे. याशिवाय बीकेसीतील रुग्णालयाचं प्रचंड नुकसान झाल्याची माहिती सोशल मीडियातून पसरवण्यात आली, ती खोटी आहे, असंही महापालिकेने म्हटलं आहे.

मुंबई महापालिकेनं ट्विटर हॅण्डलवर रुग्णालयाचे फोटो शेअर करुन खुलासा केला आहे. “निसर्ग चक्रीवादळामुळे बीकेसीत उभारण्यात आलेल्या जम्बो कोविड रुग्णालयाला मोठा फटका बसल्याचा दावा करत अफवा पसरवल्या जात आहे. त्या खोट्या आहेत. वादळामुळे रुग्णालयाच्या कुंपणाचं फक्त थोडं नुकसान झालं आहे. रुग्णालय व्यवस्थित असून, सायंकाळपासून पुन्हा सुरु करता येऊ शकते,” असं बीएमसीनं म्हटलं आहे.

वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत एक हजार बेडची सुविधा असलेलं जम्बो कोविड रुग्णालय वांद्रे-कुर्ला संकुलाच्या (बीकेसी) मैदानावर उभारण्यात आलं आहे. या रुग्णालयात काही रुग्णही दाखल झाले होते. मात्र, बुधवारी मुंबईत निसर्ग चक्रीवादळ धडकणार असल्यानं तेथील रुग्णांना दुसरीकडे हलवण्यात आलं होतं. दरम्यान, बुधवारी निसर्ग चक्रीवादळानं कोकण किनारपट्टीसह इतर काही भागात प्रचंड विध्वंस केला.

सुदैवानं मुंबईत हे वादळ आलं नाही. मात्र, या वादळामुळे बीकेसीतील रुग्णालयाचं प्रचंड नुकसान झाल्याची माहिती सोशल मीडियातून पसरवण्यात आली होती. त्यावर बीएमसीने स्पष्टीकरण देऊन, हा दावा खोडून काढला आहे.

(No damage to BKC covid center )