प्रवाशांनो गरज असेल तरच प्रवास करा, CSMTतून ब्लॉक काळात एकही लोकल सुटणार नाही

मध्य रेल्वेचा तीन दिवसांचा जम्बो ब्लॉक सुरु झाला आहे. ठाण्यातील ब्लॉकला गुरुवार रात्रीपासून सुरुवात झाली तर सीएसएमटीचा ब्लॉक आज शुक्रवार रात्रीपासून सुरु झाला आहे. याकाळात सीएसएमटीतून एकही लोकल सुटणार नसल्याने प्रवाशांचे वांदे होणार आहेत.

प्रवाशांनो गरज असेल तरच प्रवास करा, CSMTतून ब्लॉक काळात एकही लोकल सुटणार नाही
csmt block alert
Image Credit source: TV9MARATHI
| Updated on: May 31, 2024 | 10:16 PM

मध्य रेल्वेच्या तीन दिवसांच्या जम्बो ब्लॉक पैकी 63 तासांच्या मेगा ब्लॉकला गुरुवारी रात्री ठाणे स्थानकातून सुरुवात झाली आहे. त्यामुळे शुक्रवारी मध्य रेल्वेवर अत्यंत कमी लोकल फेऱ्या चालविण्यात आल्या. त्यातचे बेस्ट आणि एसटी महामंडळाने जादा फेऱ्या चालविल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. परंतू प्रवाशांची खरी कसोटी उद्या शनिवारी लागणार आहे. कारण शुक्रवारी रात्री सीएसएमटी स्थानकातील 36 तासांच्या ब्लॉकला सुरुवात झाली आहे. त्यामुळे सीएसएमटी स्थानकातून एक लोकल सोडण्यात येणार नसल्याने ज्यांना सीएसएमटीतून पुढे प्रवास करायचा आहे त्यांचे वांदे होणार आहेत. त्यांना पश्चिम रेल्वेने चर्चगेटहून दादरपर्यंत प्रवास करावा लागणार आहे. त्यानंतर दादरहून पुन्हा मध्य रेल्वेने प्रवास करावा लागणार आहे. सीएसएमटीतील मेगाब्लॉकमुळे मध्य रेल्वेवर सीएसएमटी ते दादर एकही लोकल धावणार नसल्याचे म्हटले आहे.

ठाणे स्थानकातील फलाट क्र. 5 आणि 6 चे रुंदीकरणाच्या कामाचा ड्रोन व्हिडीओ –

मध्य रेल्वेवर ठाणे स्थानकात 63 तासांच्या ब्लॉकला गुरुवारी रात्रीपासून सुरुवात झाली आहे. तीन दिवसांचा हा ब्लॉक रविवारी दुपारी संपणार आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या प्रवाशांचे प्रचंड हाल होणार आहेत. अगदी गरज असेल तरच प्रवास करा अशा सूचना मध्य रेल्वेने केल्या आहेत. मध्य रेल्वेच्या मुंबई सीएसएमटी स्थानकात फलाट क्रमांक 10 आणि 11 ची लांबी वाढवून ती 24 डब्यांच्या लांबपल्ल्यांच्या गाड्यांसाठी करण्यात येत आहे. यासाठी शुक्रवारी रात्रीपासून 36 तासांचा मेगा ब्लॉक सुरु झाला आहे. हा मेगाब्लॉक रविवार 2 जूनच्या दुपारपर्यंत सुरु राहणार आहे. यामुळे अनेक लोकल रद्द केल्या जाणार आहेत. मेगाब्लॉक दरम्यान सीएसएमटी स्थानकातून एकही गाडी सुटणार नाही. सीएसएमटी ते वडाळा आणि सीएसएमटी ते भायखळा मार्गावरील लोकल सेवा बंद राहणार आहेत. दादरवरुन लोकल पुढे कल्याणच्या दिशेने सोडल्या जातील परंतू त्यांचे प्रमाण खूपच कमी असणार आहे. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होणार आहेत.

परेचा रविवारचा ब्लॉक रद्द, खाजगी बसेस प्रवासी वाहतूकीची मूभा

पश्चिम रेल्वेने रविवारी 2 जून रोजी चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान मेगाब्लॉक जाहीर केला होता. नंतर मध्य रेल्वेच्या विनंतीनंतर हा रविवारचा ब्लॉक रद्द केला आहे. त्यामुळे सीएसएमटी ते दादर लोकल नसल्याने ज्यांना दादरला जायचे असेल त्यांना चर्चगेट ते दादर असा प्रवास करता येणार आहे. तसेच मुंबईतील खाजगी बस सेवांना मेगा ब्लॉक काळात प्रवासी टप्पा वाहतूकीची परवानगी देखील देण्यात आली आहे. बेस्ट आणि एसटी महामंडळाने देखील जादा बसेस सोडल्याने प्रवाशांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.