अभी तो असली लढाई मुंबई में होगी, देवेंद्र फडणवीस यांनी फुंकलं महापालिका निवडणुकीचं रणशिंग

| Updated on: Mar 11, 2022 | 11:03 AM

उत्तर प्रदेशसह चार राज्यात विराट विजय मिळाल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचं रणशिंग फुंकलं. कोणत्याही लढाईने होरपळून जाऊ नका. विजयाने हुरळून जायचं नाही, विजयाने नम्र व्हायचं आहे.

अभी तो असली लढाई मुंबई में होगी, देवेंद्र फडणवीस यांनी फुंकलं महापालिका निवडणुकीचं रणशिंग
अभी तो असली लढाई मुंबई में होगी, देवेंद्र फडणवीस यांनी फुंकलं महापालिका निवडणुकीचं रणशिंग
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: उत्तर प्रदेशसह चार राज्यात विराट विजय मिळाल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी मुंबई महापालिकेच्या (bmc) निवडणुकीचं रणशिंग फुंकलं. कोणत्याही लढाईने होरपळून जाऊ नका. विजयाने हुरळून जायचं नाही, विजयाने नम्र व्हायचं आहे. विजयाने अधिक मेहनत करायची आहे. अभी तो असली लढाई मुंबई में होगी. आम्हाला मुंबईला कोणत्याही पक्षापासून मुक्त करायचे नाही. आम्हाला मुंबईला (mumbai) भ्रष्टाचारापासून मुक्त करायचे आहे. आम्ही कोणत्याही पक्षाच्या विरोधात नाही आम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधात मैदानात उतरलो आहोत. जोपर्यंत भ्रष्टाचाराच्या विळख्यातून या मुंबईला बाहेर काढत नाही तोपर्यंत दम घेता येणार नाही. म्हणून हा विजय आज साजरा करा. उद्यापासून कामाला लागा. पुन्हा एकदा मुंबईत प्रचंड विजय आणि भाजपचं महाराष्ट्रात पूर्ण बहुमताचं सरकार बनविण्यासाठी सज्ज व्हा, असे आदेशच देवेंद्र फडणवीस यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिले.

गोव्यातील विजयाच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या नेत्यांनी मुंबईत सेलिब्रेशनचं आयोजन केलं होतं. ढोल ताशाच्या गजरात भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यावेळी चंद्रकांत पाटील यांच्यापासून ते आशिष शेलारांपर्यंत सर्वच नेत्यांनी ढोलाच्या तालावर ठेका धरला. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं घटनास्थळी आगमन झालं. तेव्हा जोरदार घोषणा देत त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिका जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले. तसेच मोदी है तो मुमकीन है, असं सूचक विधानही त्यांनी केलं.

मोदी है तो मुमकीन है

चार राज्यातील निवडणुकानंतर संपूर्ण देशाने मोदींची जादू अनुभवली. मोदी है तो मुमकीन है पाहायला मिळालं. मोदींनी सामान्य माणसाच्या मनात जो विश्वास निर्माण केला. मोदी आपल्यासाठी कधीही आहे. मोदी मरू देणार नाहीत, उपाशी राहू देणार नाहीत, बेरोजगार राहू देणार नाहीत, हा लोकांना वाटणारा विश्वास मतांमध्ये परिवर्तीत झाला, असं फडणवीस यांनी सांगितलं. गोव्यात काँग्रेसने राज्यपालांना आधीच सरकार स्थापनेसाठीचं पत्रं दिलं होतं. पण दुसऱ्या दिवशी चिटपाखरूही राजभवनावर गेलं नाही. इतकी वाईट अवस्था काँग्रेसची झाली आहे, असा हल्लाही त्यांनी चढवला.

दुसऱ्या सेनेचं काय झालं ते पाहिलं

महाराष्ट्रातील आमदार, खासदार कार्यकर्त्यांचं आभार. चंद्रकांतदादा तुम्ही महाराष्ट्रातून सेना पाठवली, त्या सेनेचा गोव्याच्या विजयात हात आहे. सेना म्हणजे भाजपची सेना. दुसऱ्या सेनेचं काय झालं ते पाहिलं असेल. त्यांनी भाजपला हरवणार अशी गर्जना त्यांनी केली होती. त्यांची लढाई आमच्याशी नाही नोटाशी होती हे मी सांगत होतो. राष्ट्रवादी आणि सेनेची मते एकत्र केली तरी नोटांची मते जास्त आहेत, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.

शिवसेनेला फक्त 97 मते

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतांच्या मतदारसंघात जाऊन शिवसेनेने गर्जना केली होती. सावंतंना हरवणार असल्याच्या वल्गना केल्या होत्या. सेनेचे सर्व नेते तिथे गेले. प्रचार केला. पण शिवसेनेच्या उमेदवाराला फक्त 97 मते मिळाली. हा कौल भाजपचा आहे. मोदींचा आहे. विश्वासाचा आहे. सामान्य जनतेचा आहे. मी केवळ प्रतिनिधी म्हणून गेलो. विजय तर मोदी मिळवून देणार होते, असं त्यांनी स्पष्ट केलं.

संबंधित बातम्या:

यूपीतील काँग्रेस, शिवसेनेच्या पराभवापेक्षा पंजाबमधील भाजपची हार सर्वात वाईट, संजय राऊतांचा खोचक टोला

Election Results 2022 | पाचही राज्यांमध्ये ‘हात’ रिकामे, काँग्रेस नेत्यांची तातडीची बैठक, अध्यक्ष निवडीच्या हालचाली

Maharashtra Budget 2022 LIVE Updates : आज राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार; सामान्य माणसाच्या वाट्याला काय?