Bandra: 15 वर्षांनी घरात पाळणा हलला, पण एका चुकीने हिरावला एकुलता एक मुलगा; आईला अजूनही विश्वास बसेना

मुंबईतील वांद्रे परिसरात फोनवर बोलत भरधाव कार चालवणाऱ्या महिलेनं आठ वर्षांच्या अंश गुप्ताचा जीव घेतला आहे. लग्नाच्या पंधरा वर्षांनंतर अंशचा जन्म झाला होता. एकुलता एक मुलगा गमावल्यानंतर अंशचे आईवडील न्यायाची मागणी करत आहेत.

Bandra: 15 वर्षांनी घरात पाळणा हलला, पण एका चुकीने हिरावला एकुलता एक मुलगा; आईला अजूनही विश्वास बसेना
आरोपी महिला मेघा रावल, अंश गुप्ताचे वडील
Image Credit source: ANI
| Updated on: Aug 31, 2026 | 1:01 PM

मुंबईतील वांद्रे परिसरात घडलेल्या एका भीषण अपघाताने एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आठ वर्षांचा अंश रविंद्र गुप्ता रविवारी दुपारी रस्ता ओलांडत असताना भरधाव इनोव्हा क्रिस्टाने त्याला धडक दिली. या अपघातात अंशचा मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे, कार चालवणारी महिला त्या वेळी फोनवर बोलत असल्याचा प्रत्यक्षदर्शींचा दावा आहे. पोलिसांनी मेघा रावल या 44 वर्षीय महिलेला अटक केली असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. तिसरीत शिकणारा अंश रविवारी घराबाहेर खेळण्यासाठी गेला होता. वांद्रे इथल्या सेंट अँड्र्यू चर्चजवळील बागेच्या परिसरातून तो जात असताना हा दुर्दैवी अपघात झाला. महबूब स्टुडिओजवळील जॉन बॅप्टिस्ट रोडवर तो रस्ता ओलांडत असताना इनोव्हा क्रिस्टाने त्याला धडक दिली. धडकेनंतर अंश गंभीर जखमी झाला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी तातडीने त्याला त्याच कारमधून होली फॅमिली रुग्णालयात नेलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

फोनवर बोलत होती आरोपी महिला

या अपघातानंतर कारचालक महिला फोनवर बोलत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रत्यक्षदर्शी कुणाल म्हाबडी यांनी सांगितलं की, त्यांना मोठा आवाज ऐकू आला आणि रस्त्यावर मुलगा पडलेला दिसला. कारचालक त्यावेळी फोनवर होती, असा दावा त्यांनी केला आहे. या दाव्याची पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. पोलिसांनी मेघा रावल यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 105, 281 आणि 125, तसंच मोटार वाहन कायद्याच्या कलम 184 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये सदोष मनुष्यवध, बेदरकारपणे वाहन चालवणं आणि धोकादायक ड्राइव्हिंगशी संबंधित कलमांचा समावेश आहे.

अंशच्या वडिलांची प्रतिक्रिया-

15 वर्षांनंतर घरात पाळणा हलला

या घटनेमुळे अंशच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तब्बल 15 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर त्यांच्या घरात पाळणा हलला होता आणि अंश हा त्यांचा एकुलता एक मुलगा होता, अशी माहिती अंशचे काका अजय गुप्ता यांनी ‘मुंबई मिरर’शी बोलताना दिली. कुटुंबासाठी तो केवळ मुलगा नव्हता, तर अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मिळालेला आनंद होता. मात्र काही क्षणांतच एका भीषण अपघाताने त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं.

अंशच्या अपघाताबद्दल शेजाऱ्याचा फोन आल्यानंतर अजय गुप्ता पोलीस ठाण्यात धावून गेले. याविषयी ते पुढे म्हणाले, “अंश सेंट अँड्र्यूज चर्चच्या मागच्या बागेत खेळायला गेला होता. गाडी चालवणारी महिला फोनवर बोलत असल्यामुळे तिच्या लक्षात आलं नाही की तो मुलगा तिथे चालत आहे. तो त्यांचा एकुलता एक मुलगा होता. लग्नाच्या 15 वर्षांनंतर त्यांना तो झाला होता. पुढच्या आठवड्यात त्याचा वाढदिवस होता. त्याच्या आईची अवस्था खूप वाईट आहे. अंश गेला आहे, यावर त्याच्या आईला विश्वासच बसत नाहीये.”

अंशचे वडील फेरावाला म्हणून काम करतात तर त्याची आई गृहिणी आहे. आम्ही आमचा एकुलता एक मुलगा गमावला आहे, आम्हाला न्याय हवा आहे, अशी मागणी त्याचे वडील करत आहेत.

Follow Us