Mumbai Police Suspended : विद्यार्थ्याला पावडरची धमकी देणाऱ्या पोलिसाचं निलंबन; गृहखात्याचा दणका
Mumbai Police Suspended : राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत व्हायरल व्हिडिओची माहिती दिली. एक पोलीसाने आंदोलक विद्यार्थ्याला पुन्हा दिसलास तर 50 ग्रॅमची पावडर टाकेन अशी धमकी दिली. मुलांना अशी धमकी देणाऱ्या पोलीसावर आता कारवाई झाली आहे.

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय. त्यात एक पोलीस तरुणाला धमकावताना दिसतोय. पुन्हा दिसलास तर 50 ग्रॅमची पावडर टाकेन अशी धमकी देतोय. आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. त्यात राज ठाकरे यांनी हाच किस्सा सांगितला. “ते म्हणाले माझ्याकडे एक व्हिडिओ आला. मुलं टॅक्सीने चालली होती. पोलीस म्हणतात 50 ग्रॅम पावडर टाकेन. हा पोलीस ड्रग्स सप्लायर आहे का? पोलिसांकडे पावडर मिळायला लागली का? हे काय चाललं ते कळतंच नाही” असं राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरे यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर काही वेळातच गृहखात्याकडून या पोलिसाविरोधात कारवाई करण्यात आली.
पवन सांगळे असं या पोलीसाचं नाव आहे. सायन पोलीस स्टेशनला तो ड्रायव्हर म्हणून काम करतो. या व्हिडिओमुळे मुंबई पोलिसांवर अनेक प्रश्न निर्माण झाले होते. सोशल मीडियावर उलट-सुलट चर्चा सुरु आहे. त्यामुळे आता मुंबई पोलिसांनी धमकी देणाऱ्या पवन सांगळेला निलंबित केलं आहे.
कांडला बंदरातून हे ड्रग्स येतात का?
आज महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांनी सुद्धा याच व्हिडिओवरुन पोलीस महासंचालकांची भेट घेतली. “अशा प्रकारे धमकावणाऱ्या पोलिसाला निलंबित करावं अशी आमची मागणी होती. पोलिसांनी ती मान्य केली. पोलीस 50 ग्रॅम पुडीची भाषा करतो. पोलीसच अंमली पदार्थांचं रॅकेट चालवत आहेत का?. कांडला बंदरातून हे ड्रग्स येतात का?. हा मोठा विषय आहे. हायकोर्टाच्या न्यायाधीशांच्या देखरेखीखाली याची चौकशी झाली पाहिजे” अशी मागणी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
कॉकरोच पळतानाचा व्हिडिओ व्हायरल
त्या शिवाय अजून एक व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय. सीजेपीच्या समर्थनासाठी आंदोलन करणाऱ्या काही विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं व त्यांना वॅनमध्ये भरुन घेऊन जात होते. या दरम्यान रस्त्यावर असलेल्या दुसऱ्या आंदोलकांनी वॅनचा दरवाजा उघडला व सर्व आंदोलक एक-एक करुन खाली उतरले. कॉकरोच अशा प्रकारे पळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. यावरुन सोशल मीडियावर दोन गट पडले आहेत. विद्यार्थ्यांचा एक गट या कृतीच कौतुक करतोय, समर्थन करतोय. दुसरागट याला अराजकता ठरवत आहे.
