आजच्या ‘भारत बंद’ला पाठिंबा आहे का? प्रकाश आंबेडकर म्हणतात…

| Updated on: Jan 29, 2020 | 2:46 PM

बहुजन क्रांती मोर्चाकडून आज भारत बंदची हाक देण्यात आली आहे. मात्र, याबाबत आपल्याला काहीच कल्पना नसल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे.

आजच्या भारत बंदला पाठिंबा आहे का? प्रकाश आंबेडकर म्हणतात...
Follow us on

मुंबई : बहुजन क्रांती मोर्चाकडून आज भारत बंदची हाक देण्यात आली आहे. मात्र, याबाबत आपल्याला काहीच कल्पना नसल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. “भारत बंदबाबत कोणत्याही प्रकारची माहिती पत्रामार्फत कार्यालयात आलेली नाही. त्यामुळे भारत बंद आहे की नाही? याची जाणीवही आम्हाला नाही”, असं स्पष्टीकरण प्रकाश आंबेडकर यांनी दिलं आहे.

दरम्यान, बहुजन क्रांती मोर्चाच्या ‘भारत बंद’चे काहीसे पडसाद महाराष्ट्रात पडताना दिसत आहेत. मुंबईत आज सकाळी कांजूरमार्ग रेल्वे स्थानकाजवळ काही आंदोलकांनीनी ‘रेल रोको’ आंदोलन केले. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती. मात्र, रेल्वे पोलीस घटनास्थळी दाखल झाल्याने 15 ते 20 मनिटांनंतर मध्य रेल्वेची वाहतूक सुरु झाली.

बहुजन क्रांती मोर्चाकडून भारत बंदच्या पार्श्वभूमीवर देशातील व्यापारी, दुकानदार आणि सर्वसामान्य नागरिकांना बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आलं होतं. मात्र, राज्यातील काही व्यापारी संघटनांनी बंद पाळण्यास नकार दिला आहे. व्यापारी संघटनांनी स्थानिक पोलीस ठाणे आणि जिल्हाधिकारी कार्यालयांना निवेदन पाठवून सुरक्षेची जबाबदारी घेण्याची विनंती केली होती. दरम्यान, राज्यात बंदच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला असून संवेदनशील भागात अधिक लक्ष देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी कायद्याविरोधात वंचित बहुजन आघाडीकडून 24 जानेवारी रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांना शांततेत बंद पाळण्याचे आदेश दिले होते. याशिवाय संध्याकाळी 4 वाजता प्रकाश आंबेडकर यांनी बंद मागे घेतला होता. त्यानंतर आज बहुजन विकास आघाडीकडून नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी कायद्याविरोधात बंद पुकारण्यात आला आहे. यावर प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.