प्रताप सरनाईकांनी लेटर लिहून ‘लहान तोंडी मोठा घास’ घेतला आहे का?; वाचा 5 मोठे मुद्दे

| Updated on: Jun 20, 2021 | 2:59 PM

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कालच 'शिवसेना कुणाच्याही पालख्या उचलणार नाही' असं जाहीर केलं आणि चोवीस तासाच्या आत त्यांच्याच एका मोठ्या आमदारानं भाजपशी जुळवून घ्या म्हणत लेटरबाँब टाकला. (pratap sarnaik)

प्रताप सरनाईकांनी लेटर लिहून लहान तोंडी मोठा घास घेतला आहे का?; वाचा 5 मोठे मुद्दे
pratap sarnaik
Follow us on

मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कालच ‘शिवसेना कुणाच्याही पालख्या उचलणार नाही’ असं जाहीर केलं आणि चोवीस तासाच्या आत त्यांच्याच एका मोठ्या आमदारानं भाजपशी जुळवून घ्या म्हणत लेटरबाँब टाकला. एका अर्थानं ‘खूप त्रास होतोय आता, प्रसंगी दुसऱ्याच्या पालख्या उचलू पण हे थांबवा’ असं कळकळीचं आवाहनच प्रताप सरनाईक यांनी पत्र लिहून मुख्यमंत्र्यांना केलं आहे. पत्रं दीर्घ स्वरुपाचं आहे. सुरुवातीला सरनाईकांनी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर स्तुतीसुमनं वाहिली आहेत तर नंतर मुळ ‘कळ’ मांडण्याचा प्रयत्न केला आहे. समजून घेऊयात 5 मुद्यांच्या आधारे. (pratap sarnaik wrote to cm uddhav thackeray, read 5 majore point)

1. ही तर सरळ सरळ शरणागती?

प्रताप सरनाईक यांचं पूर्ण पत्रं वाचलं तर एक गोष्ट स्पष्ट होते. ते मुख्यमंत्र्यांना सरळ सरळ भाजपा आणि त्यातल्या त्यात मोदी सरकारसमोर ‘आपण शरणागती पत्कारलेली बरी’ असं सांगण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. कार्यकर्त्यांच्या माथी भावना मारत सरनाईक लिहितात- ‘पण या परिस्थितीतही जे राजकारण सुरु आहे, त्यात सत्तेत एकत्र राहून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आपलेच कार्यकर्ते फोडत असेल, आपला पक्ष कमकुवत करत असेल तर या स्थितीत पुन्हा एकदा आपण पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्र मोदीजी यांच्याशी जुळवून घेतलेले बरे, असे वैयक्तिक मत आहे. निदान यामुळे प्रताप सरनाईक, अनिल परब, रवींद्र वायकर या आपल्या सहकाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना होणारा नाहक त्रास तरी थांबेल अशी अनेक कार्यकर्त्यांची भावना आहे’.

2. भाजपावर गंभीर आरोप

प्रताप सरनाईकांनी भाजपशी जुळवून घेण्याची जरी मागणी केली असली तरी त्याची कारणं मात्र सकारात्मक नाहीत. ती नेगेटीव्ह आहेत. म्हणजे सरनाईक असं म्हणत नाहीत की, भाजपसोबत गेल्यावर शिवसेनेचा कसा फायदा होईल किंवा एकूणच पक्षाचा. तर भाजपचं केंद्रीय सरकार, तसच मुंबईतला भाजपचा एक माजी खासदार (सरनाईक बहुतेक किरिट सोमय्यांबद्दल बोलत असावेत) कसा त्रास देतोय, त्याचा दाखला देत जुळवून घ्या असं नाईकांचं म्हणणं आहे. एका अर्थानं सरनाईकांचे भाजपवरचे आरोप गंभीर आहेत. सरनाईक पत्रात लिहितात- कोणताही गुन्हा किंवा चूक नसताना केंद्रीय तपास यंत्रणांकडून आम्हाला नाहक त्रास सुरु आहे. केंद्रीय तपास यंत्रणेचा दलाल व शिवसेनेमुळे “माजी खासदार” झालेल्या नेत्याकडून जी बदनामी सुरु आहे त्यालाही कुठे तरी आळा बसेल. आम्हाला टार्गेट करीत असताना आमच्या कुटुंबियांवर सुध्दा सतत आघात होत आहेत, खोटे आरोप होत आहेत. एका केसमधून जामीन मिळाला की तात्काळ जाणीवपूर्वक दुसऱ्या केसमध्ये गुंतवणे, त्यातून बाहेर आलो की तिसऱ्या केसमध्ये गुंतवणे अशा प्रकारचे जाणीवपूर्वक काम या तपास यंत्रणा करीत आहेत. आपल्या एका निर्णयामुळे हे कुठेतरी थांबेल.

3. काँग्रेस-राष्ट्रवादी निशाण्यावर

भाजपशी जुळवून घ्यावं असं सांगत असतानाच, सरनाईकांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी कशी शिवसेनेला पोखरतेय, कमकुवत करते आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे ज्या दोन पक्षांमुळे शिवसेनेचा मुख्यमंत्री आता दिसतो आहे, त्यांनाच सरनाईकांनी घेरण्याचा प्रयत्न केला आहे. सरनाईक म्हणतात-‘एकीकडे आपण राजकारण बाजूला ठेऊन फक्त आणि फक्त आपल्या मुख्यमंत्री पदाला प्रामाणिकपणे न्याय देत आहात. तर दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीमुळे शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला असे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या लोकांना वाटत आहे. त्यात काँग्रेस पक्ष “एकला चलो रे” ची भूमिका घेत आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या पक्षाचे नेते कार्यकर्ते
फोडण्यापेक्षा शिवसेनेचे नेते कार्यकर्ते फोडत असल्याचे चित्र दिसत आहे. तसेच महाविकास आघाडीतील काही मंत्री व काही सनदी अधिकारी केंद्रीय तपास यंत्रणेचा ससेमिरा आपल्या पाठीमागे लागू नये म्हणून केंद्रातील सत्ताधारी पक्षासह आपल्या नकळत छुपी हातमिळवणी करीत आहेत हेही आपल्या निदर्शनास आणून देत आहे’.

4. मुख्यमंत्री शिवसेनेचा तरीही कामं नाहीत…

ही ओरड काही पहिल्यांदा झालेली नाही. याआधीही काहींनी हा मुद्दा मांडलेला आहे. सेना नेत्यांचं म्हणणं असं की, मुख्यमंत्री भलेही उद्धव ठाकरे असतील, पण ज्याप्रमाणात राष्ट्रवादीच्या आमदारांचे कामं होतात तशी शिवसेनेच्या होत नाहीत. विशेषत: त्यांच्या टार्गेटवर अजित पवार असतात. तिच तक्रार सरनाईकांनीही पत्रात केली आहे. पण तक्रार जरी अप्रत्यक्षपणे अजित पवारांच्या विरोधात असली तरीसुद्धा, प्रत्यक्षपणे ती उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आहे. सरनाईक पत्रात म्हणतात-‘त्याचबरोबर गेल्या दीड वर्षात आपल्या पक्षाच्या अनेक आमदारांशी मी चर्चा केल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांची कामे झटपट होतात, मात्र आपला मुख्यमंत्री असूनही शिवसेना आमदारांची कामे होत नाहीत” अशी काही आमदारांची अंतर्गत नाराजी आहे. एका विशिष्ट परिस्थितीत राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाली. भाजपशी युती तोडून शिवसेना पक्षाने, काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठे करण्यासाठी महाविकास आघाडी” स्थापन केली की काय ? अशी चर्चा आहे.

5. सरनाईकांना ठाकरे सरकारची मदत नाही?

सरनाईक हे ठाण्याचे शिवसेनेचे मोठे नेते आहेत. त्यांनीच रिपब्लिक न्यूज नेटवर्कचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात आघाडी उघडली होता. नंतर दिवस पालटले आणि सरनाईक थेट केंद्राच्या म्हणजेच ईडीच्या रडारवर आले. त्यांच्या मालमत्तांवर छापे टाकले गेले. गेल्या सात महिन्यांपासून त्यांची, त्यांच्या मुलाची चौकशी सुरु आहे. ह्या सगळ्या काळात त्यांना राज्य सरकारचं किंवा इतर कुठल्याही नेत्याचं सहकार्य मिळालं नसल्याचा दावाही सरनाईकांनी केला आहे. एका अर्थानं ही पक्ष म्हणून शिवसेनेविरूद्धची तक्रारही आहे. सरनाईक म्हणतात- ‘युद्धात लढत असताना अभिमन्यूसारखे लढण्यापेक्षा किंवा कर्णासारखे बलिदान देण्यापेक्षा, धनुर्धारी अर्जुनासारखे लढावे असे मला वाटते. त्यामुळे राज्यात आपली सत्ता असताना सुध्दा व राज्य शासनाचे किंवा इतर अन्य कुठल्याही नेत्याचे सहकार्य मिळाले नसताना कुणालाही त्रास न देता मी माझी कायदेशीर लढाई माझ्या कुटुंबासह गेले 7 महिने लढत आहे’. (pratap sarnaik wrote to cm uddhav thackeray, read 5 majore point)

 

संबंधित बातम्या:

साहेब, नेत्यांचे सहकार्य नाही, कुटुंबाच्या साथीने अर्जुनासारखा लढतोय; सरनाईकांची हतबलता आणि खदखद

काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेना कमकुवत करतेय, भाजपशी जुळवून घ्या; प्रताप सरनाईक यांचा लेटरबॉम्ब

प्रताप सरनाईक यांचं थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्रं; वाचा संपूर्ण पत्रं जसच्या तसं