शिवसेना बांगलादेशी घुसखोरांना पाठीशी घालत आहे का? : प्रवीण दरेकर

| Updated on: Feb 09, 2020 | 2:47 PM

भारतात लपलेल्या बांगलादेशी घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मोर्चा आहे, असं प्रवीण दरेकर म्हणाले

शिवसेना बांगलादेशी घुसखोरांना पाठीशी घालत आहे का? : प्रवीण दरेकर
Follow us on

मुंबई : देशहितासाठी असलेल्या मनसेच्या मोर्चाला भाजप पुरस्कृत म्हणू नये. शिवसेनेने भूमिका स्पष्ट न केल्यास तेही बांगलादेशींना पाठिशी घालत असल्याचं चित्र निर्माण होईल’ असं प्रत्युत्तर विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar on Shivsena) यांनी शिवसेनेला दिलं. मनसेचा मोर्चा भाजप पुरस्कृत असल्याची टीका शिवसेनेने केली होती.

राज ठाकरे देशहितासाठी चांगली भूमिका घेत आहेत. त्यांच्या मोर्चाबाबत प्रचंड उत्साह आहे. भारतात लपलेल्या बांगलादेशी घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मोर्चा आहे, असं म्हणत प्रवीण दरेकरांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदूत्वाचाही उल्लेख केला.

‘या मोर्चामुळे शिवसेनेला पोटदुखी होण्याचं काही कारणच नाही. मनसेच्या रॅलीचा उद्देश देशभक्तीने प्रेरित आहे. देशात लपून बसलेल्या घुसखोरांच्या विरोधात आहे. घुसखोरांविरोधात भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका स्पष्ट आहे. भाजपच्या भूमिकेला राज ठाकरेंचं समर्थन असेल, तर शिवसेनेला दुःख होण्याचं कारण नाही’ असं म्हणत दरेकरांनी शिवसेनेवरही निशाणा साधला.

हेही वाचा : अजित पवार सरकार चालवत आहेत, नंतर शिवसेनाही चालवतील : अविनाश जाधव

‘शिवसेनेने मूळ हिंदुत्वाचा विचार कमी केला. सत्तेच्या लालसेपोटी काँग्रेस-राष्ट्रवादीशी हातमिळवणी केल्यानंतर जी शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता आहे, ती दिसून येते. म्हणूनच राज ठाकरेंच्या मोर्चाबाबत शिवसेना नेते टिप्पणी करत आहेत’ असं दरेकर म्हणाले.

राज ठाकरे आंदोलन करताना जनतेला सामावून घेण्याचा प्रयत्न करत असतात. पक्षाच्या पलिकडे जाऊन कोणी त्यात सहभागी होणार असेल, तर वाईट वाटायचं कारण नाही. त्यामुळे देशहितासाठी असलेल्या मोर्चाला भाजप पुरस्कृत म्हणू नये. शिवसेनेने भूमिका स्पष्ट न केल्यास तेही बांगलादेशींना पाठिशी घालत असल्याचं चित्र निर्माण होईल’ असं प्रत्युत्तर प्रवीण दरेकरांनी (Pravin Darekar on Shivsena) दिलं.

याआधी, मनसे नेते अविनाश जाधव यांनीही शिवसेनेला उत्तर दिलं होतं. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाचा गळा घोटला आहे. सध्या शिवसेना नाही, तर अजित पवार सरकार चालवत आहेत. थोड्या दिवसांनी ते शिवसेनाही चालवायला घेतील, राज्य सरकार अजित पवार पुरस्कृत आहे”, अशी टीका अविनाश जाधव यांनी केली. तसेच, “बाळासाहेब ठाकरेंचा खरा वारसदार राज ठाकरे आहेत”, असंही ते म्हणाले.