स्वप्नील लोणकरच्या कुटुंबियांना तातडीने 50 लाखांची मदत द्या; प्रविण दरेकरांचीही मागणी

| Updated on: Jul 05, 2021 | 4:00 PM

स्वप्नील लोणकरच्या आत्महत्येला राज्य सरकारचा नाकर्तेपणा जबाबदार असून ही आत्महत्या नव्हे तर सरकारने केलेली हत्या असल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला आहे.

स्वप्नील लोणकरच्या कुटुंबियांना तातडीने 50 लाखांची मदत द्या; प्रविण दरेकरांचीही मागणी
प्रविण दरेकर, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते
Follow us on

मुंबई : पुण्यामधील स्वप्नील लोणकर या एमबीएससी उत्तीर्ण तरुणाच्या आत्महत्येला राज्य सरकारचा नाकर्तेपणा जबाबदार असून ही आत्महत्या नव्हे तर सरकारने केलेली हत्या असल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला आहे. तसेच दरेकर यांनी लोणकर कुटुंबियांना तात्काळ राज्य सरकारने 50 लाख रुपयांची मदत देण्याची आग्रही मागणीदेखील आज केली. दरम्यान, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनीदेखील अशीच मागणी केली आहे. (Provide assistance of Rs 50 lakh to the family of Swapnil Lonkar; Pravin Darekar demands)

विधिमंडळाच्या कामकाजाला सुरुवात होताच, विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी स्वप्नील लोणकर यांच्या आत्महत्येचा मुद्दा उपस्थित केला. आपला मुद्दा मांडताना दरेकर यांनी सरकाराच्या बेफिकिरपणाचा पर्दाफाश केला. एमपीएससीची परीक्षा झाली नाही, ते त्यामध्ये उत्तीर्ण झाले, पण मुलाखत न घेतल्यामुळे, नोकरी मिळू शकली नाही. अखेर स्वप्नील लोणकर यांनी आत्महत्या केली. आम्ही या विषयावर कोणतेही राजकारण करित नाही. पण लोणकर यांची आई व बहिणीने स्वप्नीलच्या आत्महत्येवर आक्रोश केला आहे. त्याच्या आत्महत्येला सरकारला दोषी ठरविले आहे, असेही दरेकर यांनी सभागृहाच्या निर्दशनास आणून दिले.

सरकार एमपीएससीवर काय पावलं उचलणार आहे, हे जाहीर करण्याची मागणी करतानाच दरेकर यांनी स्वप्नील लोणकरची सुसाईड नोट सभागृहात वाचून दाखवली. ही सुसाईट नोट अतिशय संवेदनशील आहे. कोणाच्याही हृदयाला पाझर फुटेल असं हे पत्र आहे. सरकारकडे विद्यार्थ्यांच्या व्यथा ऐकायला वेळ नाही. सरकार कधी जागे होणार? किती स्वप्नीलच्या आत्महत्येची सरकार वाट बघत आहे? असा सवालही दरेकर यांनी विधानपरिषदेत उपस्थित केला.

मुख्य परिक्षा झाली नाही. यामुळे स्वप्नील हळूहळू नैराश्यात गेला. घरची बेताची परिस्थिती आणि परीक्षेनंतर नोकरी लागेल या आशेवर घेतलेलं कर्ज यांसारख्या कारणांमुळेही स्वप्नीलवरील तणाव वाढत गेला. कोरोना नसता तर सगळं काही ठीक असतं व परिस्थिती वेगळी असती. माझ्याकडे वेळ नव्हता नकारात्मक वादळ मनात घोंगावत होतं, परंतु काहीतरी चांगलं होईल असं वाटत होतं. परंतु आता खुश राहण्यासाठी काही उरलं नाही. मला माफ करा, अशी भावना व्यक्त करतानाच त्यातून स्वप्नीलने जीवन संपवण्याचा निर्णय घेतल्याचे दरकेर यांना सांगितले.

दीड वर्ष ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा झाल्या, परंतु मुलाखतीसाठी विद्यार्थ्यांना नेमले गेले नाही, त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला आहे. राज्य सरकारकडून यासंदर्भात कोणतीही ठोस पावले उचलली गेली नसून ठाकरे सरकार याप्रकरणी अपयशी ठरले आहे, असेही दरेकर यांनी सांगितले.

स्वप्नीलच्या कुटुंबीयांना सरकारनं 50 लाख द्यावेत, मुनगंटीवार विधानसभेत आक्रमक

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करणारा विद्यार्थी स्वप्नील लोणकर याच्या आत्महत्येचा मुद्दा विधानसभेत गाजला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे विधानसभेत आक्रमक झालेले पाहायला मिळाले आहेत. सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत स्वप्नील लोणकर याच्या आईचा व्हिडीओ स्क्रीनवर दाखवा. स्वप्नीलच्या आईचा आक्रोश प्रशासनातील निगरगट्ट अधिकाऱ्यांना आणि महाविकास आघाडी सरकारला पाहूद्या, अशी मागणी केली. सुधीर मुनंगटीवार यांनी विधानसभेत बोलताना टीव्ही 9 मराठीनं दाखवेल्या वृत्ताची दखल घेतली. स्वप्नील लोणकर याच्या कुटुंबीयांना 50 लाखांची मदत जाहीर करा, अशीही मागणी त्यांनी केली.

संबंधित बातम्या

कर्जाचा डोंगर, वाढत्या अपेक्षा… मला माफ करा; MPSC उत्तीर्ण स्वप्नील लोणकरची सुसाईड नोट जशीच्या तशी…

‘दिरंगाई’ हा एमपीएससीचा आवडता ‘उद्योग’, ‘दिरंगाईचा खेळ’ कायमचा थांबवा; अमित ठाकरेंचा संताप

स्वप्नीलच्या आईचा व्हिडीओ स्क्रीनवर लावा, त्याच्या कुटुंबीयांना सरकारनं 50 लाख द्यावेत, सुधीर मुनगंटीवार विधानसभेत आक्रमक

(Provide assistance of Rs 50 lakh to the family of Swapnil Lonkar; Pravin Darekar demands)