पुणे हिट अँड रन प्रकरण : ससून रुग्णालयात नेमका गैरप्रकार काय घडला? तपासासाठी चौकशी समिती गठीत

अल्पवयीन आरोपीच्या केलेल्या वैद्यकीय तपासणी आणि उपचारासंदर्भात झालेल्या गैरप्रकाराची चौकशी करणेसंदर्भात चौकशी समितीचे गठन करण्यात आलं आहे. तीन वरिष्ठ डॉक्टरांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे.

पुणे हिट अँड रन प्रकरण : ससून रुग्णालयात नेमका गैरप्रकार काय घडला? तपासासाठी चौकशी समिती गठीत
पुणे हिट अँड रन प्रकरणी सर्वात मोठी अपडेट
| Edited By: | Updated on: May 27, 2024 | 10:39 PM

पुण्याच्या कल्याणी नगर येथील पौर्शे कार अपघात प्रकरणी आता मोठी बातमी समोर आली आहे. या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे ब्लड सॅम्पल ससून रुग्णालयात घेण्यात आले होते. यावेळी ससून रुग्णालयात डॉक्टरांकडून आरोपीच्या ब्लड सॅम्पलमध्ये फेरफार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी ससून रुग्णालयातील तीन जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये दोन डॉक्टरांचा समावेश आहे. याप्रकरणी ससून रुग्णालयाचे फॉरेन्सिक लॅब प्रमुख अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळनोर या दोघांना अटक करण्यात आली आहे. याच प्रकरणी आता ससून रुग्णालयात या गैरप्रकाराबाबत सखोल तपास करण्यासाठी राज्य शासनाकडून समितीचं गठन करण्यात आलं आहे.

अल्पवयीन आरोपीच्या केलेल्या वैद्यकीय तपासणी आणि उपचारासंदर्भात झालेल्या गैरप्रकाराची चौकशी करणेसंदर्भात चौकशी समितीचे गठन करण्यात आलं आहे. तीन वरिष्ठ डॉक्टरांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. या समितीचं अध्यक्षपद जे. जे. हॉस्पिटलच्या डीन डॉक्टर पल्लवी सापळे यांच्याकडे देण्यात आलं आहे. डॉ. पल्लवी सापळे आणि त्यांची टीम उद्या सकाळी ससूनला जाऊन चौकशी करणार आहे. डॉ. गजानन चव्हाण, डॉ. सुधीर चौधरी यांचादेखील या समितीत समावेश करण्यात आला आहे.

डॉक्टराने आरोपीचं ब्लड सॅम्पल कचऱ्याचा डब्ब्यात फेकलं

अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल याच्या सांगण्यावरुन डॉक्टरांनी आरोपीच्या ब्लडमध्ये फेरफार केल्याची माहिती आता उघड झाली आहे. डॉक्टरांनी आरोपीचं ब्लड सॅम्पल कचऱ्याच्या डब्ब्यात फेकलं आणि दुसऱ्याच व्यक्तीचं ब्लड सॅम्पल घेत पोलिसांना पाठवले. हेच ब्लड रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचं कोर्टात सादर करण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार झाल्याचं उघड झालंय. या दोघांना पोलिसांनी आज अटक केली.

रक्त चाचणी विभागातील कर्मचाऱ्यांची चौकशी होणार

पुणे पोलीस ससून रुग्णालयातील रक्त चाचणी विभागातील कर्मचाऱ्यांची चौकशी करणार आहे. ससूनमधील त्या दिवसाचं रेकॉर्ड पुणे पोलिसांकडून तपासायला सुरुवात झाली आहे. रक्त चाचणी विभागातील कर्मचाऱ्यांनाही चौकशीसाठी बोलवलं जाणार आहे. त्या दिवशी काम केलेल्या कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी बोलवलं जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.