BREAKING : उद्योगपती गौतम अदानींच्या भेटीनंतर राज ठाकरे थेट देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. देशातील प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर राज ठाकरे थेट देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी निघाले.

BREAKING : उद्योगपती गौतम अदानींच्या भेटीनंतर राज ठाकरे थेट देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला
| Updated on: Jan 10, 2023 | 9:44 PM

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) सध्या अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. विशेष म्हणजे आज नवी दिल्लीत सुप्रीम कोर्ट (Supreme Court) आणि केंद्रीय निवडणूक आयोगात (Election Commission) शिवसेनेच्या (Shiv Sena) धनुष्यबाण चिन्हावरुन जोरदार युक्तीवाद झाला. दोन्ही गटाकडून अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवरुन युक्तीवाद करण्यात आला. निवडणूक आयोगाने ही सुनावणी पुढे ढकललीय. केंद्रीय निवडणूक आयोगात आता 17 जानेवारीला या प्रकरणावरील सुनावणी होईल. तर सुप्रीम कोर्टात 14 फेब्रुवारीला सुनावणी होईल. या सगळ्या घडामोडींनंतर संध्याकाळी देखील महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. सत्तासंघर्षावरील सुनावणी संपल्यानंतर मुंबईत दिग्गज व्यक्तींच्या भेटीगाठी झाल्या. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

देशातील प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. गौतम अदानी स्वत: राज ठाकरे यांच्या शिवतिर्थ निवासस्थानी गेले. तिथे त्यांनी राज ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. या भेटीत धारावी पुनर्विकासविषयी चर्चा झाली, अशी माहिती समोर येतेय.

विशेष म्हणजे या भेटीनंतर आणखी महत्त्वाची घडामोड घडली. गौतम अदानी यांच्या भेटीनंतर अवघ्या तासाभरात राज ठाकरे हे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी घरातून बाहेर पडले.

राज ठाकरे हे देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ या शासकीय निवासस्थानी दाखल झाले. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. या दोन बड्या नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा सुरु झाली, या विषयी अनेकांच्या मनात प्रश्न उपस्थित होत आहेत.

दुसरीकडे आणखी महत्त्वाची बातमी समोर आलीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांची भेट घेतलीय.

धनंजय मुंडे यांचा तीन दिवसांपूर्वी परळीत अपघात झाला होता. त्यांना उपचारासाठी मुंबईत आणण्यात आलंय. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.