Raj Thackeray : उलट असल्या राजकारण्यांना त्यांची लायकी दाखवावी..साहिलच्या मृत्यूनंतर राज ठाकरेंची जळजळीत पोस्ट

Raj Thackeray on Sahil Wakode : आयआयटी पवई येथील विद्यार्थी साहिल वाकोडे प्रकरणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याप्रकरणी जाती-पातीचे राजकारण होत असल्यावरून भाष्य करतानाच मुळ मुद्याला हात घातला. त्यांनी एक मोठा भावनिक प्रश्न उपस्थित केला.

Raj Thackeray : उलट असल्या राजकारण्यांना त्यांची लायकी दाखवावी..साहिलच्या मृत्यूनंतर राज ठाकरेंची जळजळीत पोस्ट
राज ठाकरे, साहिल वाकोडे
| Updated on: Sep 23, 2026 | 10:49 AM

आयआयटी पवई येथील विद्यार्थी साहिल वाकोडे याने टोकाचे पाऊल टाकले. त्याचा मानसिक छळ केल्याने आणि जातीवाचक शिवीगाळ केल्यानेच त्याने हे टोकाचे पाऊल टाकल्याचा आरोप पालकांसह नातेवाईकांनी केला. प्राध्यापक सूर्यनारायण डुल्ला यांचा आज गु्न्हे शाखा जबाब नोंदवणार आहे. त्याचवेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक मोठी पोस्ट लिहित याप्रकरणी काही महत्त्वाचे सवाल उपस्थित केले आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना जाती-पातीच्या राजकारणात न गुरफटण्याचे आवाहन केले आहे.

राज ठाकरे यांचा भावनिक सवाल

“आयआयटी मुंबईमध्ये साहिल वाकोडे या वीस वर्षांच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली. परीक्षेदरम्यान त्याने मोबाईल आणि चॅटजीपीटीचा वापर केल्याचा आरोप आयआयटी प्रशासनाने सुरुवातीला केला. हा आरोप तपास पूर्ण होण्याआधी जाहीर करणं अयोग्य होतं, हे मान्य करत प्रशासनाने नंतर माफीही मागितली. दुसरीकडे साहिलच्या कुटुंबीयांनी जातीय छळाचे आरोप केले आहेत. त्या आरोपांवर गुन्हा दाखल झाला असून तपास सुरू आहे. प्राध्यापकांनीही आपली बाजू मांडली आहे. या सगळ्या प्रकरणात एक तरुण मुलगा आपल्यातून गेला, त्याला थेट आत्महत्येचा मार्गच का स्वीकारावासा वाटला यावर कोणीच बोलताना दिसत नाहीये.” असा भावनिक सवाल राज ठाकरे यांनी या पोस्टमधून विचारला आहे.

विद्यार्थ्याला गुन्हेगार ठरवणं योग्य नाही

एखादा विद्यार्थी परीक्षेत गैरप्रकार करत असेल, तर त्याला रोखणं आणि त्याच्यावर नियमानुसार कारवाई करणं हे प्राध्यापकांचं कर्तव्यच आहे. पण आरोप सिद्ध होण्याआधी मृत विद्यार्थ्याला गुन्हेगार ठरवणं योग्य नाही. त्याचप्रमाणे जातीय छळाचा आरोप झाला म्हणून चौकशी पूर्ण होण्याआधी प्राध्यापकांना दोषी ठरवणंही योग्य नाही. पण या सगळ्याचा कुठेच विचार होत नाही. कारण या विषयांत आता ‘जात’ हा मुद्दा पुढे आणून, एका वीस वर्षांच्या मुलाला एका प्रसंगानंतर आपल्या आयुष्याचे सगळे मार्ग संपले आहेत, असं का वाटलं असेल? यावर बोलायचं नाहीये. विचार करायचा नाहीये, असे राज ठाकरे म्हणाले.

जाती-पातीची विषारी वल्ली

मी अनेकदा माझ्या भाषणांमध्ये सांगितलं आहे की २००० सालानंतर महाराष्ट्रात जात इतकी फोफावली आहे की आपल्या शेजारी शाळेत बसणारा विद्यार्थी कुठल्या जातीचा आहे हे सांगू लागलेत, वर्षानुवर्षे एकत्र डबा खाणारे ऑफिसमधले कर्मचारी जातीच्या नजरेतून एक दुसऱ्यांकडे पहायला लागलेत. आणि हे इतकं विषारी होत चाललं आहे की हे आता आयआयटीपर्यंत पोहचलं आहे. पंडित नेहरूंनी आयआयटीचं वर्णन आधुनिक भारताची मंदिरं असं केलं होतं त्या आयआयटीत विद्यार्थ्यांची आत्महत्या झाली, एक सहकारी आपल्यातून गेला यापेक्षा हे सगळं जातीतून घडलं हा पैलू पुढे यावा, यासारखं दुर्दैव नाही, असे मोठे भाष्य राज ठाकरे यांनी केले.

स्पर्धा परीक्षा जीव घेण्या होत आहेत

मुळात आयआयटी असो की त्याच्या आधीच्या कुठल्याही स्पर्धा परीक्षा असोत या जीवघेण्या होत चालल्या आहेत. काही शे सीट्ससाठी लाखो विद्यार्थी बसतात, त्यातून निवड झाली की अभ्यासाचं ओझं, मग कॅम्पस सिलेक्शनमध्ये काय होईल याचा ताण. त्यात आयआयटी असो की आयआयएम असो पूर्वीसारखे कॅम्पस निवडीत उत्तम पगार मिळत नाही. बरं हे नैराश्य फक्त आयआयटी विद्यार्थ्यांनाच आहे असं नाही तर ते सर्वत्र आहे, असे मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले. अगदी कॉमर्स, आर्टस् शाखेच्या विद्यार्थ्यांपासून ते डॉक्टर्स, इंजिनिअर्सपर्यंत सगळ्यांना याचा ताण आहे. या नैराश्यातून साहिलने आत्महत्या केली. त्यामुळे या एकूणच पूर्णपणे मोडकळीस आलेल्या शिक्षण व्यवस्थेला प्रश्न विचारून ते बदलायचं? का आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याची आणि त्याला जाब विचारणाऱ्याची जात काढत बसायची, असे ते म्हणाले.

असल्या भानगडीत पडू नका

प्रश्न हे सरकार का ते सरकार नाहीच आहे. गेल्या ३०,४० वर्षांत शिक्षणाचं बाजारीकरण करण्याच्या नादात आपण पूर्ण भारतीय शिक्षण व्यवस्थेचं अपरिमित नुकसान केलं आहे. त्यात आमूलाग्र बदल आणले पाहिजेत. याची सुरुवात नुकत्याच झालेल्या जेन झी आंदोलनातून होत आहे असं वाटत असताना हा प्रकार पुढे आला. माझी विद्यार्थ्यांना विनंती आहे की तुमच्या आंदोलनाला देशभरातून प्रतिसाद मिळाला कारण तुमचा मुद्दा हा व्यवस्थेतील दोषांवर उपाय हवा यासाठी होता. तुमचं आंदोलन हे याच मार्गाने पुढे चालू राहायला हवं. कारण तसं राहिलं तर सरकारला अनेक प्रश्नांना उत्तरं द्यावी लागतील, काही कृती पण करावी लागेल. आणि सरकारला हे करायचं आहे का ? असेल तर आनंदच आहे आणि नसेल तर जात धर्म ही अमोघ अस्त्र त्यांच्याकडे आहेतच. एकदा जात धर्म आणला की विषय भरकटवायला सोपा होतो. असल्या भानगडीत कोणीच पडू नका, असे राज ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us