राजकारणातील मोठी बातमी! राज ठाकरे आणि राहुल गांधी एकमेकांच्या संपर्कात? राऊतांच्या दाव्याने मोठी खळबळ
ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी राज ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यात संवाद सुरू असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या या विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. विरोधकांनी एकमेकांशी संवाद साधणे स्वाभाविक असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. तसेच शरद पवार इंडिया आघाडीचे आधारस्तंभ असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

राज ठाकरे आणि राहुल गांधी यांच्या संवाद आहे. दोघांमध्ये का संवाद असू नये? असा सवाल ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. राऊत यांनी राज ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यात संवाद असल्याचं सांगून राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. राऊत यांच्या या विधानाचे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क काढले जात आहेत. संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हा दावा केला आहे.
राज ठाकरे हे विरोधकांचा आवाज बनून काम करत आहेत. त्यांना इंडिया आघाडीत घेणार का? आजच्या इंडिया आघाडीच्या बैठकीत तसा काही निर्णय होणार आहे का? असा सवाल संजय राऊत यांना करण्यात आला. त्यावेळी राऊत यांनी हा दावा केला. आजच्या इंडिया आघाडीच्या बैठकीचा अजेंडा सेट आहे. तो म्हणजे ज्ञानेश कुमार. राज ठाकरेंना सोबत घेण्याबाबत भविष्यात केव्हा तरी हा मुद्दा स्वतंत्रपणे चर्चेला येईल. राज ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यात संवाद आहे. संवाद का असू नये? सर्व विरोधी पक्ष एकमेकांशी संवाद साधतात. आजचं आंदोलन हे राहुल गांधींनी सुरू केलेल्या आंदोलनाचा भाग आहे. हा संवादच आहे. कालपर्यंत ममता बॅनर्जी आंदोलनात नव्हत्या. त्याही बैठकीला येत आहेत. हा संवाद आहे, असं संजय राऊत म्हणाले.
पवार इंडिया आघाडीतच
शरद पवार यांनी मी कुठेच जाणार नाही. कुणाला आमच्यासोबत यायचं तर यावं, असं म्हटलं आहे. त्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. मी अनेक वर्ष तेच सांगतोय. शरद पवार कुठे जाणार नाहीत. ते इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीचे पिल्लर आहेत. त्यांच्याबाबतच्या बातम्या कल्पित आहेत. चर्चा होत असतात. निर्णय होत असतात. सहकार क्षेत्र, बँकिंग क्षेत्र किंवा काही कौटुंबिक गोष्टी असतात. पण त्यात आम्ही राजकारण आणत नाही. पवारांचा मूळ पक्ष कुठे जाणार नाही. तो केंद्रात इंडिया आघाडी आणि राज्यात महाविकास आघाडीसोबत राहील, असं राऊत यांनी स्पष्ट केलं.
तटकरेंच्या पक्षांचं भवितव्य काय?
यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावरही टीका केली. तटकरेंचा पक्ष हा काही अजित पवारांचा पक्ष नाही. तो अमित शाह यांचा पक्ष आहे. अमित शाह हेच भविष्यात दिल्लीत राहणार नसतील तर तटकरेंच्या पक्षाचं भवितव्य काय? याबाबत तटकरेंनी संघ कार्यालयाच्या आसपास चिंतन बैठक घेतली पाहिजे, असा टोला त्यांनी लगावला.