आता आडवाणींच्या हिंदुत्त्वावर शंका घ्यायची का? थेट शाळेचा उल्लेख करत राज ठाकरे यांचा जोरदार निशाणा
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याने राज्याच्या राजकारणात मोठा ट्वीस्ट येणार असल्याचं बोललं जात आहे. यावेळी राज ठाकरेंनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांचे नाव घेत भाष्य केले.

हिंदी भाषेच्या सक्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर आज मुंबईत ठाकरे बंधूंचा मेळावा पार पडला. यावेळी तब्बल २० वर्षांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र एका व्यासपीठावर आले. यावेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी जबरदस्त भाषण केले. यावेळी राज ठाकरेंनी शिक्षणाच्या माध्यमावरून भाषिक अस्मितेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत जोरदार टीका केली. तसेच यावेळी राज ठाकरेंनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांचे उदाहरण देत टीका केली.
राज ठाकरेंनी शिक्षणाच्या माध्यमावरून भाषिक अस्मितेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांवर जोरदार टीका केली. “आम्ही मराठी माध्यमात शिकलो, पण आमची मुलं इंग्रजी माध्यमात शिकली. मग त्यांना मराठीचा पुळका कसा? असा सवाल राज ठाकरेंनी केला. आम्ही मराठी मीडियममध्ये शिकलो. आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली. होय. मग यांना मराठीचा पुळका कसा, बाळासाहेब ठाकरे आणि श्रीकांत ठाकरे हे इंग्रजी मीडियममध्ये शिकली आहेत. या दोघांवर मराठीबाबत शंका घ्याल का? असेही राज ठाकरेंनी विचारले.
लालकृष्ण आडवाणींचे दिले उदाहरण
यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांचे उदाहरण देत राज ठाकरे म्हणाले “लालकृष्ण आडवाणी सेंट पॅट्रिक हायस्कूल या ख्रिश्चन मिशनरी शाळेत शिकले. मग त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का? ते कॉन्व्हेंटमध्ये शिकले. दक्षिण भारतात बघा, त्यांना कोण विचारत नाही. उद्या एखादी व्यक्ती हिब्रू भाषेत शिकेल आणि मराठीचा कडवट अभिमान बाळगेल. यात काय अडचण आहे? असेही राज ठाकरे म्हणाले.
भाषेच्या बाबतीत कधीच तडजोड केली नाही
यानंतर राज ठाकरेंनी भाषेच्या सक्तीवर आक्षेप घेतला. त्यावेळी राज ठाकरेंनी ए. आर. रहमान यांचा प्रसंग सांगितला. जिथे एका कार्यक्रमात एक बाई तमिळ बोलता बोलता अचानक हिंदी बोलू लागली आणि ए. आर. रहमान हिंदी ऐकून व्यासपीठावरून खाली उतरले. बाळासाहेब ठाकरे इंग्रजी माध्यमात शिकले आणि इंग्रजी वर्तमानपत्रात व्यंगचित्र काढले, तरीही त्यांनी भाषेच्या बाबतीत कधीच तडजोड केली नाही, असे राज ठाकरेंनी नमूद केले. यावेळी त्यांनी एक भाषा सर्वांना बांधून ठेवते या मताला विरोध केला.
भाषेचा प्रश्न कुठे येतो?
“आपल्या सैन्यात मराठा, शीख, जाट, पंजाब, पॅराशूट, गडवाल रायफल, बिहार, महार रेजिमेंट, जम्मू काश्मीर, गोरखा रायफल, लडाख स्काऊट, सिक्कीम स्काऊट अशा विविध प्रादेशिक रेजिमेंट आहेत. शत्रू दिसल्यावर ते तुटून पडतात ना? मग भाषेचा प्रश्न कुठे येतो? भाषावार प्रांतरचना त्याच कारणासाठी होती ना?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.