Raj-Uddhav Thackeray Vijay Sabha : अन् मराठीसाठी बाळासाहेबांनी सत्तेवर लाथ मारली… राज ठाकरे यांनी सांगितलेला किस्सा काय?
Raj Thackeray-Uddhav Thackeray Alliance : आजच्या विजय मेळाव्याने मनसे आणि उद्धव ठाकरे सेनेत उत्साह संचारला आहे. राज ठाकरे यांच्या शाब्दिक टोलेबाजीने आज राज्य सरकार बऱ्याच दिवसानंतर घायाळ झाले असेल. आज मराठी बाण्यातून हिंदी सक्तीला उत्तर दिले.

Raj-Uddhav Thackeray Joint Victory Rally : हिंदी सक्तीच्या आदेशाला आज मराठी बाण्यातून मनसे-उद्धवसेनेने उत्तर दिले. आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर आले आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला. यावेळी दोन्ही बंधुनी तुफान बॅटिंग केली. राज्य सरकारवर तोफ गोळे डागले. राज ठाकरे यांच्या शाब्दिक टोलेबाजीने आज राज्य सरकार बऱ्याच दिवसानंतर घायाळ झाले असेल. हिंदी भाषा सक्ती केल्यानंतर दोन्ही पक्षांनी शक्ती दाखवली. यावेळी राज ठाकरे यांनी बाळासाहेबांचा तो एक किस्सा सांगितला. मराठीसाठी बाळासाहेबांनी कशी लाथ मारली याचे त्यांनी उदाहरण दिले.
उठसूट मारू नका
येथे जे राहतील त्यांना मराठी आली पाहिजे. यात वाद नाही. उठसूट मारायची गरज नाही. पण जास्ती नाटकं केली तर कानाखाली आवाज काढला पाहिजे. पण चूक त्यांची असली पाहिजे. अशी कधी गोष्ट कराल तर त्याचे व्हिडीओ काढू नका. आपल्या आपल्यातच त्यांना कळलं पाहिजे. कळलं का? मारणारा कधी सांगणारा नसतो. मार खाणारा सांगतो. मला मारलं. त्यांना सांगू देत. पण उठसूट कुणाला मारू नका, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले.
अनेक लोक आहेत. माझ्या परिचयाचे आहे. माझा मित्र आहे, नयन शाह. मी त्याला गुजराठी म्हणतो. तो अप्रितम मराठी बोलतो. पण विनोदाचं अंग आहे. शिवाजी पार्कात हेडफोन लावून पुलं देशपांडे ऐकणारा गुजराती आहे. मराठीचं हे बाळकडू आमच्यासाठी बाळकडूच होतं, असे राज ठाकरे म्हणाले.
काय होता तो किस्सा
हा कडवटपणा आला कुठून. आमच्या धमन्यात आला कुठून. बाळासाहेबांसोबतचे अनेक प्रसंग आहेत. १९९९चा एक प्रसंग आहे. युतीचं सरकार येणार की नाही अशी स्थिती होती. पवार साहेबांना राष्ट्रवादी स्थापन केला होता. भाजप शिवसेनेच्या वादात काहीच होईना. दिवसा मागून दिवस चालले. काही होईना. एके दिवशी मातोश्रीत बसलो होतो. दुपारची वेळ होती. अचानक गाड्या लागल्या. साडेतीन वाजले असतील. प्रकाश जावडेकर आणि काही मंडळी आली. म्हणाले, बाळासाहेबांना अर्जंट भेटायचं. मी म्हटलं त्यांची झोपेची वेळ आहे. म्हणाले, नाही भेटायचं आहे. ते म्हणाले, मुख्यमंत्री पदाचा विषय झाला असं त्यांना सांगा. मी म्हटलं काय झालं. ते म्हणाले, सुरेश दादा जैन यांना मुख्यमंत्री करायचं. एवढं बाळासाहेबांना सांगायचं.
मी बाळासाहेबांच्या रुमममध्ये गेलो. आम्ही अरेतुरे करायचो. म्हटलं ऐ काका उठ. म्हणाले, काय रे. म्हटलं जावडेकर आले. मुख्यमंत्री पदाचा विषय झाला. बाळसाहेब म्हणाले, काय झालं. म्हटलं, ते म्हणाले सुरेशदादांना करायंच. बाळासाहेब म्हणाले, त्यांना सांग महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठीच होईल हे त्यांना सांग, मराठी या विषयासाठी या माणसाने सत्तेवर लाथ मारली. हे संस्कार ज्याच्यावर झाले असेल तो मराठीसाठी तडजोड करेल का, असा किस्सा सांगत त्यांनी खणखणीत सवाल केला.
युत्या-आघाड्या होत राहतील. महाराष्ट्र, मराठी माणूस , मराठी भाषा यावर तडजोड होणार नाही. यावर सावध राहा. सतर्क राहा. पुढे काही गोष्टी घडतील माहीत नाही. पण मराठीसाठीची एकजूट कायम राहावी. महाराष्ट्रात बाळासाहेबांचं स्वप्न साकार व्हावं ही अपेक्षा व्यक्त करतो, असे मोठे संकेत राज ठाकरे यांनी दिले.