फोटो ऑफ द डे ! महाराष्ट्राने पहिल्यांदाच पाहिलं असं चित्र… या फोटोची देशभर चर्चा!
काल दादरमध्ये 'हास्यरेषा' पुस्तक प्रकाशन सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे एकत्र आले. महाराष्ट्राच्या राजकारणात हे तिन्ही नेते एका मंचावर येण्याची ही दुर्मिळ घटना होती. विधान परिषदेच्या निकालानंतर झालेल्या या भेटीमुळे देशभरात मोठी राजकीय चर्चा सुरू झाली आहे, भविष्यातील राजकारणाचे संकेत यामुळे मिळाले का, यावर तर्कवितर्क सुरू आहेत.

महाराष्ट्रातील राजकारणात काल गुरुवारी एक आशादायक चित्र दिसलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे एकाच मंचावर एकत्र आले. बऱ्याच वर्षानंतर हे तिन्ही नेते एकाच मंचावर आल्याने कॅमेऱ्यांच्या क्लिकचा पाऊस पडला नसता तर नवलच! राज्याला आश्वासक ठरणारं हे चित्र कॅमेऱ्यात भराभर कैद झालं आणि या तीन नेत्यांचे फोटो देशभराच्या मीडियात व्हायरल झाले. मीडियापासून सोशल मीडियापर्यंत या फोटोची चर्चा सुरू आहे. खासकरून विधान परिषदेच्या निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे शिंदेसेना आणि भाजपचं दिवसभर वाजलेलं असतानाच संध्याकाळी दोन ठाकरे आणि फडणवीस एकत्र आल्याने या फोटोला विशेष महत्त्व प्राप्त झालं.
निमित्त होतं प्रशांत कुलकर्णी यांच्या ‘हास्यरेषा’ या पुस्तकाच्या प्रकाशनाचं. या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने हे तिन्ही नेते दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात एकत्र आले. त्यामुळे या कार्यक्रमाकडे देशाचं लक्ष लागलं होतं. एकमेकांवर आगपाखड करणारे हे तीन नेते एकत्र आल्यावर काय बोलतात? कोण कुणाची विकेट घेतं? कोण कुणाला फटकारे लगावतं आणि कोण हास्याचे तुषार उडवतं? याकडे महाराष्ट्र लक्ष ठेवून होता.
विशेष म्हणजे दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये दिलजमाई झाल्यानंतर पहिल्यांदाच हे तिन्ही नेते एकत्र एका मंचावर आले. दुसरं म्हणजे मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधातील आंदोलन, एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना पाठिंबा, धर्मेंद्र प्रधान यांच्या विरोधातील आंदोलन आणि कर्जतमधील झाडांच्या कत्तलीविरोधात दोन्ही ठाकरे बंधूंनी रान उठवून दिलं आहे. दोन्ही ठाकरे बंधूंनी या मुद्द्यांवर फडणवीस सरकारची पिसे काढली आहेत. तसेच, विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने शिंदे सेना आणि भाजपमध्ये सकाळपासून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच हे तिन्ही नेते एकत्र आल्याने चर्चांना उधाण आलं होतं. त्यातच कार्यक्रमापूर्वी या तिन्ही नेत्यांनी बंद दाराआड चर्चा केल्याने चर्चेचं माहोळ उठलं नसतं तर नवलंच!
काही लोकांना पोटशूळ…
पहिल्यांदाच तिघे एकत्र आल्याचा धागा पकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुफान टोलेबाजी केली. आम्हा तिघांना एकत्र पाहून काही लोकांना पोटशूळ का उठला माहीत नाही. पण आम्हाला मात्र एकाच मंचावर आल्याचं आश्चर्य वाटत नाही. ही महाराष्ट्राची परंपरा आहे. वेगवेगळ्या पक्षाचे नेते आणि वेगवेगळी विचारधारा असलेले नेते एकत्र एकाच मंचावर येत असतात. आम्ही एकत्र हास्यविनोद करू शकतो. एकत्र चहाही पिऊ शकतो, असं फडणवीस म्हणाले.
मी वाट पाहत होतो, पण…
यावेळी फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना चिमटा काढला. 2019पर्यंत जेव्हा कधी उद्धवजी मला बोलवायचे तेव्हा मी जायचो. 2019नंतर त्यांनी फोन केला नाही. मी वाट पाहत होतो, असं फडणवीस म्हणाले.
लोकं विचार करत असतील…
यावेळी राज ठाकरे यांनीही एकत्र येण्यामागचं कारण सांगितलं. आम्ही तिघे लोक एका मंचावर एकत्र कसे आलो? याचा काही लोक विचार करत असतील. पण काही व्यासपीठं अशी असतात की जिथे सर्व एकत्र येत असतात. राजकारण बाजूला ठेवून एकत्र येत असतात. अशा कार्यक्रमात राजकारणाऐवजी कला आणि संस्कृतीची चर्चा होते. अशा तऱ्हेच्या व्यासपीठावर वेगवेगळ्या विचारधारेचे लोक एकत्र येणं स्वाभाविक आहे, असं राज ठाकरे म्हणाले.