लोकलमधील गर्दी कमी होणार? कल्याण-डोंबिवलीच्या प्रवाशांच्या समस्या अखेर सुटणार? CSMT मुख्यालयात नेमकं काय ठरलं? वाचा सविस्तर
लोकलमधील गर्दी कमी होण्याची शक्यता आहे. कारण CSMT मुख्यालयात कल्याण-डोंबिवलीच्या प्रवाशांच्या समस्या सोडवण्यासाठी महत्वाची बैठक झाली.

लोकल ट्रेनच्या प्रवाशांच्या अडचणीत दिवसेंदिवस भर पडत आहे. लोकल डब्यातील जीवघेणी गर्दी, उशिराने धावणाऱ्या ट्रेनमुळे कर्मचारी दररोज लेटमार्कने त्रस्त झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी मध्य रेल्वेवरील लोकल ट्रेन तब्बल 1 तास उशिराने धावल्याने बदलापूर, अंबरनाथ स्टेशन मास्तरच्या कार्यालयात प्रवाशांचा संताप पाहायला मिळाला. लोकल गर्दीने त्रस्त झालेल्या प्रवाशांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. रेल्वे प्रवाशांच्या समस्या सोडवण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री रविंद्र चव्हाण अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. लोकल ट्रेनच्या प्रवाशांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी गुरुवारी मध्य रेल्वेच्या सीएसएमटी मुख्यालयात मध्य रेल्वेच्या विभागीय रेल्वे प्रबंधक हिरेश मीना आणि आमदार चव्हाणांमध्ये महत्त्वाची बैठक झाली.
काही दिवसांपूर्वी 48 रेल्वे प्रवासी संघटनांनी आमदार रविंद्र चव्हाण यांची भेट घेतली होती. या संघटनेच्या प्रतिनिधींनी डोंबिवली, दिवा आणि निळजे परिसरातील प्रवाशांच्या दैनंदिन समस्या व मागण्या त्यांच्यासमोर मांडल्या होत्या. या संघटनांच्या प्रतिनिधींची मागण्यांची दखल घेत चव्हाण यांनी CSMT मुख्यालयात रेल्वे प्रबंधकाची भेट घेतली. त्यानंतर झालेल्या बैठकीत महत्वपूर्ण चर्चा झाली. या बैठकीत प्रवाशांच्या समस्याचे अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडण्यात आले.
दररोज गर्दीच्या वेळी निळजे स्थानकातून मुंबईच्या दिशेने दर तासाला रेल्वे सुरू करण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली. या निर्णयाने ऐन गर्दीच्या वेळी होणारी प्रवाशांची होणारी गर्दी कमी करण्यासाठी डोंबिवली आणि दिवा स्थानकातूनही मुंबईकडे लोकल फेऱ्या सुरू करण्याची मागणी चव्हाण यांनी केली. या नव्या लोकल फेऱ्यांच्या मागणीसोबत प्रवाशांची सुरक्षा, स्थानकांवरील गर्दीचे योग्य व्यवस्थापन आणि सातत्याने उशिराने धावणाऱ्या लोकल ट्रेनच्या समस्येवरही या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. प्रवाशांना दररोज भेडसावणाऱ्या सर्व प्रश्नांवर आणि होणाऱ्या गैरसोयीवर तातडीने योग्य मार्ग काढावा, असेही चव्हाण यांनी मध्य रेल्वे प्रशासनाला सांगितले.
मध्ये रेल्वेवर विशेष पॉवर ब्लॉक
मध्य रेल्वेवर 12 दिवसांचा विशेष पॉवर ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. या पॉवर ब्लॉकचा कसारा-आसनगाव दरम्यान लोकल सेवेवर परिणाम होणार आहे. तिसऱ्या रेल्वे मार्गिकेच्या कामासाठी कसारा-आसनगाव दरम्यान विशेष ट्रॅफिक-पॉवर ब्लॉक घोषणा केली आहे. त्यामुळे 7 ऑक्टोबर ते 18 ऑक्टोबरदरम्यान दररोज दुपारी 3.35 ते रात्री 8.35 वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. या ब्लॉकच्या काळात N-24, N-26, N-28 आणि N-30 या लोकल रद्द राहणार आहेत. ब्लॉकपूर्वी कसारा येथून CSMTकडे जाणारी शेवटची लोकल दुपारी 2.42 वाजता सुटणार आहे. ब्लॉकनंतर कसारा येथून CSMTकडे जाणारी पहिली लोकल रात्री 8.15 ऐवजी 8.35 वाजता सुटणार आहे.