Manoj Jarange Protest : मनोज जरांगे यांच्या आंदोलनावरून रोहित पवार यांची दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका, म्हणाले, एक गावाला…

Rohit Pawar on Manoj Jarange Protest : शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आंदोलकांना सल्ला दिला आहे. तसेच सरकारवर खोचक टीका केली आहे.

Manoj Jarange Protest : मनोज जरांगे यांच्या आंदोलनावरून रोहित पवार यांची दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका, म्हणाले, एक गावाला...
Rohit pawar and Jarange
Image Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Sep 02, 2025 | 10:31 AM

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे यांचे मुंबईत आमरण उपोषण चालू आहे. त्यांच्या उपोषणाला काही नेत्यांनी पाठिंबा दिला आहे, तर काही नेते मात्र त्यांच्यावर सडकून टीका करताना दिसत आहेत. तसेच राज्यभरातून मुंबईत हजर झालेले लाखो मराठा आंदोलक जीवाची मुंबई करताना दिसत आहेत. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे सतत आंदोलकांची गैरसोय होत असल्याचे म्हणत आहेत. नुकताच त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ‘हे गेंड्याच्या कातडीचं सरकार केवळ संधी शोधत आहे’ असे म्हटले आहे. तसेच आंदोलकांना सल्ला देखील दिला आहे.

काय आहे रोहित पवार यांची पोस्ट?

रोहित पवार यांनी त्यांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवर, ‘मराठा आंदोलनाचा आज पाचवा दिवस असूनही आंदोलकांशी संवाद साधण्यास चर्चा करण्यास सरकारकडून एकही प्रतिनिधी येत नसेल किंवा तोडगा काढण्याचा प्रयत्न होत नसेल तर सरकारची ही भूमिका योग्य आहे का? गेल्या वेळेस निवडणुका होत्या तर १०-१० मंत्री यायचे आणि आता मात्र आंदोलकांना वाऱ्यावर सोडताय?’

Viral Video: आता हटायचंच नाही! रस्त्यावर आंघोळ, रेल्वे स्थानकात डान्स… मराठा आंदोलक हट्टाला पेटले

पुढे ते म्हणाले, ‘एकीकडे आंदोलकांशी चर्चा करायची नाही आणि दुसरीकडे मात्र जाणूनबुजून आंदोलन बदनाम करून आंदोलनाची सहानुभूती कमी करण्यासाठी कटकारस्थाने रचायची, नेरेटिव्ह सेट करायचा हे सरकारमधील काही नेत्यांना शोभतं का?’

आंदोलकांना सल्ला

सरकारवर टीका करत रोहित पवार म्हणाले, आंदोलक युवांना विनंती आहे ‘चुकुनही चूक करू नका’ कारण हे गेंड्याच्या कातडीचं सरकार केवळ संधी शोधत आहे. सर्वांनी शांतता ठेवत नियम पाळायलाच हवेत. सरकारनेही केवळ बघ्याची भूमिका न घेता चर्चा करत तत्काळ तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. मुख्यमंत्री गणपती दर्शनात व्यस्त आहेत, एक उपमुख्यमंत्री गावाला जाऊन बसलेत तर दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांचा पत्ताच नाही. एवढा संवेदनशील प्रश्न असताना हे सरकार अजूनही झोपेचं सोंग का घेत आहे?