Rohit Pawar : आता सुट्टी नाहीच! गच्छंतीची वेळ येताच…रोहित पवारांचा संजय शिरसाटांना जबरी टोला, काय दिला इशारा

Rohit Pawar warn Sanjay Shirsat : मंत्री संजय शिरसाट यांनी काल निवृत्तीचे संकेत दिल्याने एकच खळबळ उडाली. गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरमधील एमआयडीसीसह इतर जमीन प्रकरणात त्यांच्यावर आरोप करण्यात आले होते. आता रोहित पवार यांनी त्यांना टोला लगावला आहे.

Rohit Pawar : आता सुट्टी नाहीच! गच्छंतीची वेळ येताच...रोहित पवारांचा संजय शिरसाटांना जबरी टोला, काय दिला इशारा
रोहित पवार, संजय शिरसाट
Updated on: Oct 26, 2025 | 9:36 AM

मंत्री संजय शिरसाट यांनी राजकीय निवृत्तीचे संकेत दिल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यांच्या या नवीन वक्तव्याचा विरोधकांनी चांगलाच समाचार घेतला. त्यांच्यावर जमीन घोटाळ्यासह इतर आरोप करण्यात आले. पण शिरसाट डगमगले नाही. त्यांनी या आरोपांवर थेट उत्तर दिले. पण सध्या काहीच घाडमोड नसताना त्यांनी केलेले वक्तव्य चर्चेचा विषय ठरले आहे. त्यांच्या या वक्तव्यावर रोहित पवार यांनी जबरदस्त टोला लगावला आहे.

शिरसाटांचे निवृत्तीचे संकेत?

मंत्री संजय शिरसाट यांनी काल राजकीय निवृत्तीचे संकेत दिले. 4 टर्म आपण आमदार राहिलो आता पुढे राहिल की नाही हे माहिती नाही. राजकारणात कधी थांबलं पाहिजे हे माणसाने ठरवलं पाहिजे. राजकारणात कोणीही अमृत पिऊन आलेला नसतो असे वक्तव्य शिरसाटांनी काल केले होते. त्यांचे हे वक्तव्य निवृत्तीचे संकेत मानल्या जात होते. त्यावर आता रोहित पवारांनी ट्विट करून निशाणा साधला.

गच्छंतीची वेळ येताच निवृत्तीचे वेध

“संजय शिरसाट, सिडकोत मलिदा खाताना कुठंतरी थांबावं असा विचार का आला नाही? आता मंत्रीपदावरून गच्छंतीची वेळ येताच राजकीय निवृत्तीचे वेध लागले. भूमिपुत्रांचा हक्क डावलून सिडकोची हजारो कोटी रुपयांची जमीन बिवलकर कुटुंबाच्या आणि खासगी बिल्डरांच्या घशात घालणारी आपल्यासारखी व्यक्ती जेवढे दिवस राजकारणात राहील तेवढे दिवस लोकांचं नुकसानच होणार आहे. पण आता वय पुढं करून पळ काढू नका. सरकारची ५-६ हजार कोटी रुपयांची जमीन खासगी लोकांच्या घशात घातल्याचा इंच इंच हिशोब तुम्हाला द्यावाच लागेल.आता सुट्टी नाही.” असा इशारा रोहित पवारांनी त्यांच्या एक्सवरील पोस्टमधून दिला.

शिरसाटांना मोठे आव्हान

राहिला प्रश्न माझ्याबाबत तुम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नांचा, तर वेळ आणि ठिकाण तुम्ही सांगा. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी समोरासमोर देतो माझ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही द्या, असे आव्हान आमदार रोहित पवार यांनी शिरसाट यांना दिले. त्यामुळे याप्रकरणात आता विरोधक सक्रीय झाल्याचे समोर येत आहे. शिरसाट यांच्या प्रकरणात काही मोठे घडणार आहे का, अशी दबकी चर्चा सुद्धा सुरू आहे. यावर अर्थात संजय शिरसाट हे सडेतोड उत्तर देतीलच. पण विरोधकांना अजून एका मंत्र्याची विकेट पाडण्याचे श्रेय घेता येईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.