लेकीचा दफन केलेला मृतदेह पुन्हा बाहेर काढला अन् दीड वर्षांनी… बापाच्या एका संशयाने मुंबई पोलिसही चक्रावले

साकीनाका पोलिसांनी आपल्या पत्नीच्या हत्येचा कट रचणाऱ्या पतीला अटक केली आहे. ६.७० लाखांची सुपारी देऊन केलेला हा खून आत्महत्येचा बनाव म्हणून भासवण्यात आला होता, जो दीड वर्षानंतर उघड झाला.

लेकीचा दफन केलेला मृतदेह पुन्हा बाहेर काढला अन् दीड वर्षांनी... बापाच्या एका संशयाने मुंबई पोलिसही चक्रावले
mumbai wife murder
| Updated on: Mar 26, 2026 | 9:00 AM

मुंबईतील साकीनाका परिसरातून एक थरारक आणि तितकाच धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आपल्या प्रेयसीसोबत राहण्याच्या हव्यासापोटी एका पतीने चक्क स्वतःच्या पत्नीच्या हत्येचा कट रचल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे सुरुवातीला अनेकांना हा प्रकार आत्महत्येचा वाटत होता. मात्र वडिलांच्या जिद्दीमुळे आणि दीड वर्षांच्या पाठपुराव्यानंतर हा हत्येचा कट असल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी साकीनाका पोलिसांनी पतीसह चार जणांना बेड्या ठोकल्या आहेत.

नेमकी घटना काय?

१४ ऑक्टोबर २०२४ रोजी साकीनाका येथील संघर्ष नगरमध्ये राहणाऱ्या नारंगी उर्फ गीता चौधरी (३४) यांचा मृतदेह त्यांच्या घरातील स्वयंपाकघरातील पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला होता. सुरुवातीला पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून ही घटना आत्महत्या असल्याचे म्हटले. याप्रकरणी अपघाती मृत्यूची (ADR) नोंदही करण्यात आली. यानंतर मृतदेहाचे मुंबईतील रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. या शवविच्छेदन अहवालात मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झाले नव्हते, ज्यामुळे हे प्रकरण बंद होण्याच्या मार्गावर होते.

 राजस्थानमधील ‘री-पोस्ट मॉर्टम’

यानंतर नारंगी यांचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी त्यांच्या मूळ गावी राजस्थानला नेण्यात आला. मात्र, तिचे वडील भाना राम चौधरी (६६) यांना आपल्या मुलीने आत्महत्या केली, यावर विश्वास बसत नव्हता. त्यांनी हत्येचा संशय व्यक्त करत राजस्थानमध्ये तक्रार दाखल केली. वडिलांच्या अथक प्रयत्नांनंतर, दफन केलेला मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यानंतर राजस्थानमध्ये पुन्हा शवविच्छेदन करण्यात आले. या दुसऱ्या अहवालात नारंगी यांचा मृत्यू गळा दाबल्यामुळे झाल्याची धक्कादायक बाब समोर आली.

यानंतर मग वडिलांनी याप्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. यानंतर मुंबई पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली. आरोपी पती सकाराम चौधरी (३६) याचे डिंपल नावाच्या महिलेशी प्रेमसंबंध होते. त्याच्या प्रेमसंबंधात पत्नी अडथळा ठरत होती. पत्नीला वाटेतून दूर करण्यासाठी त्याने यापूर्वी दोनदा प्रयत्न केले होते. यासाठी त्याने एकदा बनावट रस्ते अपघात आणि दुसऱ्यांदा मारहाण करून तिला मारण्याचा प्रयत्न केला होता. मात्र हे दोन्हीही प्रयत्न फसले.

यानंतर अखेर त्याने आपल्या मित्राला शंकर डांगीला ६.७० लाख रुपयांची सुपारी दिली. यानंतर १४ ऑक्टोबर रोजी सकारामने दोन साथीदार बाबू गायरी आणि दिनेश गायरी यांच्या मदतीने पत्नीचा दोरीने गळा दाबून खून केला. यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह पंख्याला लटकवला. जेणेकरून तो आत्महत्येचा बनाव वाटेल.

चार आरोपींना अटक

यानंतर साकीनाका पोलिसांनी तांत्रिक पुरावे आणि संशयावरून सकारामची कसून चौकशी केली. तीनवेळा त्याने पोलिसांना गुंगारा दिला, मात्र चौथ्या फेरीच्या चौकशीत त्याने आपला गुन्हा कबूल केला. पोलिसांनी या प्रकरणात सकाराम चौधरी, शंकर डांगी, बाबू गायरी आणि दिनेश गायरी या चार आरोपींना अटक केली आहे.

Follow Us