
मुंबई : विधवा स्त्रियांना मानसन्मान मिळावा, त्यांना विधवा म्हणून कुणीही हिणवू नये म्हणून राज्य सरकारने एक पाऊल पुढे टाकलं आहे. या विधवांना नवी ओळख देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी एक प्रस्ताव तयार केला आहे. समाजातील विविध महिलांच्या सूचना आणि महिला आयोगाच्या सूचनांचा विचार करून राज्य सरकारने एक प्रस्ताव तयार केला आहे. विधवांना आता गंगा भागिरथी म्हणण्यात यावं याबाबतचा हा प्रस्ताव आहे. मात्र, सर्वांशी विचार करूनच विधावांना नवं संबोधन देण्यात येणार असल्याचं राज्याचे महिला आणि बालकल्याण मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी स्पष्ट केलं आहे. तर, बाईच्या कपाळाच्या उठाठेवी करण्याशिवाय यांना काही काम उरले नसल्याची टीका प्रसिद्ध लेखिका संध्या नरे-पवार यांनी केली आहे.
महिला आणि बालकल्याण मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मीडियाशी संवाद साधताना ही माहिती दिली. हा विषय माझा एकट्याचा नाही. महिला आयोग आणि सामाजिक संस्थांनी विधवा महिला यांच्या संदर्भात काहीतरी नामकरण करा असा आग्रह धरला होता. त्यानुसार विधवा महिलांना गंगा भागिरथी हा पर्यायी शब्द पुढे आला आहे. त्या सर्व सूचना संबंधित विभागाला पाठवल्या आहेत. जोपर्यंत हा पूर्णपणे निर्णय होत नाही, सर्वांशी चर्चा होत नाही तोपर्यंत आम्ही याबाबत निर्णय घेणार नाही, असं मंगलप्रभात लोढा यांनी म्हटलं आहे.
“विधवा” नव्हे “गंगा भागिरथी” म्हणण्याबाबतचा प्रस्ताव महिला आणि बाल विकास विभागाने तयार केला आहे. विधवा स्त्रियांना समाजात मानाचे स्थान मिळावे म्हणून “गंगा भागिरथी” शब्द वापरण्यात येणार आहे. विधवा महिला या गंगा आणि भागिरथी प्रमाणेच पवित्र आहेत. अपंग ऐवजी दिव्यांग शब्दाप्रमाणेच आता विधवा ऐवजी “गंगा भागिरथी” शब्द वापरण्याचा प्रस्ताव करण्यात आला आहे. परिपूर्ण प्रस्ताव तयार करून चर्चा करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. त्यामुळे आता प्रधान सचिवांच्या अहवालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, प्रसिद्ध लेखिका संजय नरे-पवार यांनी आपल्या फेसबुक पेजवरून या संदर्भात पोस्ट केली आहे. संध्या नरे-पवार यांनी आपल्या फेसबुक पोस्टमधून सरकारवर टीका केली आहे.
“मी श्रीमती संध्या नरे-पवार. केवळ आजच (जोडीदाराच्या निधनानंतर) नाही तर लग्न झाल्यापासून गेली तीस वर्ष मी माझ्या नावाआधी श्रीमतीच लावत आहे. सौ. या उपाधीला मी लग्न झाल्यापासून कायम विरोध केला आहे. आधी सौभाग्यवती हे बिरुद गेलं पाहिजे. म्हणजे मग पुढचे विधवा, गंगा भागीरथी, अर्धांगिनी, पूर्णांगिनी हे खेळ संपतील. एक पुरुष आयुष्यात आहे म्हणून स्री सौभाग्यवती नाही किंवा पुरुष आयुष्यात नाही म्हणून ती दुर्भाग्यवती नाही. सौ. ही उपाधी विषमतावादी आहे. शासनामध्ये हिंमत असेल तर सौ ही उपाधी काढण्याचा आणि सगळ्याच स्त्रियांसाठी श्रीमती ही उपाधी लावण्याचा जीआर काढावा. यांना काही कामं राहिलेली नाहीत बाईच्या कपाळाच्या उठाठेवी करण्याशिवाय”, अशी टीका संध्या नरे-पवार यांनी केली आहे.