हिंदी सक्तीच्या अध्यादेशाची आज होळी करणार…,संजय राऊत

मनसे आणि शिवसेना उबाठा मराठीच्या प्रेमातून एकत्र येत आहेत. परंतु सत्ताधारी महाराष्ट्र द्वेषातून एकवटले आहेत. महाराष्ट्रात सर्वच बाबतीत आणीबाणी लादली जात आहेत, असा आरोप शिवसेना उबाठा नेते संजय राऊत यांनी केला आहे.

हिंदी सक्तीच्या अध्यादेशाची आज होळी करणार...,संजय राऊत
संजय राऊत
| Updated on: Jun 29, 2025 | 2:40 PM

हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात मुंबईत मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चासाठी शिवसेना उबाठाकडून जोरदार तयारी सुरु आहे. त्यासाठी आजही बैठक घेण्यात येणार आहे. तसेच हिंदी सक्तीच्या राज्य शासनाच्या अध्यादेशाची आज होळी करण्यात येणार आहे. राज्यात सर्वत्र हा कार्यक्रम होणार आहे. मुंबईत होणाऱ्या कार्यक्रमात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. दुपारी ३ वाजता आझाद मैदानावर हा कार्यक्रम होणार आहे. आम्ही या आंदोलनासाठी सगळ्यांना आमंत्रित केले आहे. हा आंदोलनाचा पहिला टप्पा आहे. त्यानंतर पाच जुलै रोजी मनसे आणि शिवसेना उबाठा यांचा एकत्रिक मोर्चा काढण्यात येणार आहे, असे शिवसेना उबाठा नेते आणि खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

आमच्यामधील सुसंवाद हा काहींना चिंता वाटते

पहिला आदेश होता तर नवीन आदेश काढण्याची काय गरज होती? त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे का? असे प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केले. ते म्हणाले, मनसे आणि शिवसेना उबाठा मराठीच्या प्रेमातून एकत्र येत आहेत. परंतु सत्ताधारी महाराष्ट्र द्वेषातून एकवटले आहेत. महाराष्ट्रात सर्वच बाबतीत आणीबाणी लादली जात आहेत. आमच्यामधील सुसंवाद हा काहींना चिंता वाटत आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत असल्यामुळे मराठी माणूस एकत्र येत असतील तर त्याचे स्वागत सर्वांनी करायला हवे, असे शिवसेना उबाठा नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे.

सरकारने निर्णय घेतला तर स्वागत

शिवसेना उबाठा हिंदी सक्तीचा विषय अधिवेशनातही मांडणार आहे. या सरकारने त्यावर चर्चेची तयारी दर्शवयाला हवी, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. नशिकचे शिवसेना उबाठाचे पदाधिकारी विलास शिंदे पक्ष सोडत आहे? हा प्रश्न विचारल्यावर संजय राऊत म्हणाले, कोण विलास शिंदे, मी त्यांना ओळखत नाही, असे सांगत उत्तर देण्याचे टाळले. अजित पवार यांनी विरोधकांना मोर्चा काढण्याची गरज पडणार नाही, असे वक्तव्य केले. त्यावर राऊत म्हणाले, सरकार जर निर्णय घेणार असेल तर आम्ही नक्कीच त्यांचा स्वागत करू.