MLC Election Result 2026 : आपण जिंकल्यापेक्षा सवत रांडकी… संजय राऊतांचा थेट मोदींवर घणाघात

महायुती असो की महाविकास आघाडी... दोन्हीकडे आघाडी धर्म पाळला गेला नाही. अमरावतीची जागा आमच्या वाट्याला यायला हवी होती. इतर दोन ठिकाणी त्यांचे सीटिंग आमदार होते. पण अमरावतीत नव्हता. अमरावतीची जागा आम्हाला मिळायला हवी होती, पण मिळाली नाही. त्याची नोंद केली जाईल, असं खासदार संजय राऊत म्हणाले.

MLC Election Result 2026 : आपण जिंकल्यापेक्षा सवत रांडकी... संजय राऊतांचा थेट मोदींवर घणाघात
sanjay raut
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 29, 2026 | 10:14 AM

देशभरात झालेल्या विधान परिषदेच्या 28 जागांचे निकाल आले आहेत. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक ट्विट केलं आहे. यात तुम्हाला काँग्रेस कुठे दिसते का? असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता. त्यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हर्षवायू झाला आहे. त्याला वात झाला म्हणतात. आपण जिंकल्यापेक्षा सवत रांडकी झाली यातच त्यांना आनंद आहे, असा घणाघाती हल्ला करतानाच नागपूर आणि मोदींच्या मतदारसंघ असलेल्या वाराणासीत भाजपचा पराभव झाला आहे. त्याचं काय? असा सवालच संजय राऊत यांनी केला आहे. राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खोचक टीका केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल एक मिश्किलपणे ट्विट केलं. 28 जागांमध्ये काँग्रेस कुठे आहे का? असं त्यांनी विचारलं. पंतप्रधानपदावरील व्यक्तीने समाजमाध्यमांवर येऊन प्रमुख विरोधी पक्षाची अशा पद्धतीने खिल्ली उडवणं याला थिल्लरपणा म्हणतात. पण पुढल्या दोन तासात नागपूरला भाजपचा पराभव झाल्याचं वृत्त आलं. मोदी आणि फडणवीस यांना आधीचं ट्विट डिलीट करावं लागलं. वाराणसीत भाजपचा पराभव झाला. नागपूरलाही पराभव झाला. राज्यातील पदवीधरांनी महायुतीचा पूर्ण पराभव केला आहे. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात सुशिक्षित पदवीधरांनी महायुतीला नाकारलं आहे. मोदींनी जे ट्विट केलं त्याला थिल्लरपणा म्हणतात. याला हर्षवायू म्हणतात. आपण जिंकल्यापेक्षा सवत रांडकी झाली अशी म्हण आहे. तोच हा प्रकार आहे. हर्षवायू मोदींना होणं हे चांगल्या मानसिकतेचं लक्षण नाही, असा हल्लाच संजय राऊत यांनी चढवला.

Loading...

मोदींच्या मतदारसंघात भाजप हरला

मोदींचा रोख काँग्रेस बॅलेट पेपरवर हरल्याविषयीचा होता, असं विचारताच मग भाजप महाराष्ट्रात बॅलेट पेपरवर हरला. मोदींच्या वाराणासी मतदारसंघात भाजप बॅलेट पेपवरवर हरला. लखनऊमध्ये भाजप बॅलेट पेपरवर हरला. काँग्रेस जिंकली नसेल पण तुम्हाला मतदारांनी नाकारलं आहे, अशी टीका राऊत यांनी केली.

शिक्षक कुठे जिंकतात?

महाराष्ट्रात पदवीधरांनी सर्वत्र भाजप आणि महायुतीला नाकारलं आहे. मोदी म्हणतात, बॅलेट पेपर… बॅलेट पेपर… तिथे तुम्हाला मतदारांनी नाकारलं आहे. शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका संस्था चालक जिंकले आहेत. तिथे शिक्षक कुठे जिंकत असतात? संस्था चालकांचं कोंडाळं निर्माण होतात. पैशाचा प्रचंड वापर होतो. त्यातून या निवडणुका जिंकल्या जातात, असा दावा त्यांनी केला.

फडणवीसांच्या दु:खात सहभागी

देवेंद्र फडणवीस यांनी काल निकालावर ट्विट करून नंतर ते डीलिट केलं. त्यावरूनही राऊत यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली. मी फडणवीसांच्या दु:खात सहभागी आहे. त्यांच्या वेदनेत सहभागी आहे. त्यांनी घाईत ट्विट करायला नको होतं. मोदींच्याही दु:खात आम्ही सहभागी आहोत. त्यांनी हर्षवायूतून ट्विट केलं. असा हर्षवायू भाजपला झाला असेल तर त्यांनी फुल बॉडी चेक अप केलं पाहिजे. त्याला वात म्हणतात, असा टोला त्यांनी लगावला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us