मोहन भागवत अमेरिकेत जाण्यापूर्वीच राऊत यांचा काय सल्ला? नेमकं काय म्हणाले?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या अमेरिका दौऱ्याआधी संजय राऊत यांनी त्यांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे. अमेरिकेत जाऊन भारतातील मोदी-शाह यांच्या 'हुकूमशाही', तरुणांचा उद्रेक आणि राजकीय परिस्थितीवर भाष्य करावे, असे राऊत यांनी आवाहन केले. भारतात बोलू शकत नसले तरी अमेरिकेत तरी त्यांनी सत्य बोलावे, असे राऊत म्हणाले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्ये एका परिसंवादात भाग घेणार आहेत. भागवत यांनी न्यूयॉर्कमध्ये जरूर जावं. तिथे जाऊन भारतातील हुकूमशाहीविरोधात बोलावं. जंतरमंतरवरील आंदोलन, तरुणांचा उद्रेक आणि मोदी आणि शाहांनी सुरू केलेली हुकूमशाही यावर भाष्य करावं, असं आवाहन ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोहन भागवत यांना केलं आहे. मीडियाशी संवाद साधताना राऊत यांनी हे आवाहन केलं आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघा ही सरकारी संस्था नाही किंवा सरकारी उपक्रम नाही. आता कोणी म्हणत असेल एनजीओ आहे, अमूक आहे तमूक आहे. पण देशातील जुनी संघटना आहे हे मात्र खरं. त्यांची एक विचारधारा आहे. भारतात जशी लोकशाही आहे. तशी अमेरिकेत मजबूत लोकशाही आहे. भारतात नसलं तरी अमेरिकेतील विचार स्वातंत्र्य कायम आहे. विविध देशातील लोकं अमेरिकेत जाऊन आपली भूमिका मांडत असतात. मोहन भागवत यांना कोणी निमंत्रित केलं असेल आणि सरकारी कार्यक्रम नसेल, ट्रम्प तर काही बोलवणार नाही, तिकडचे जे संघाचे लोक आहेत. त्यांनी निमंत्रित केलं असेल तर भागवत भारतातील हुकूमशाहीवर काय भूमिका मांडतात, भारतात जे राजकारण सुरू आहे. मोदी आणि शाह यांनी या देशात सांस्कृतिक दहशतवाद केला आहे, त्यावर भागवत यांनी परदेशात जाऊन आपली भूमिका मांडावी, असं संजय राऊत म्हणाले.
अमेरिकेत तरी बोलतील
न्यूयॉर्कचे महापौर हे भारतीय वंशाचे आहेत. त्यांनी भागवतांच्या भाषणाकडे लक्ष ठेवलं पाहिजे. भागवतांनी भारतातील परिस्थिती, तरुणांचा उद्रेक, तरुणांवरील पॅलेट गनचा हल्ला आणि देशातील तरुणांचा विद्रोह यावर बोलावं. या विषयावर भागवत भारतात जरी बोलले नाही, पण अमेरिकेत ते बोलतील असं वाटतं, असा टोलाही राऊत यांनी लगावला.
भाजपला पाच जागाही मिळणार नाही
अकाली दल पंजाबमध्ये भाजपसोबत युती करणार आहे. त्यावरही राऊत यांनी भाष्य केलं. हा त्यांचा प्रश्न आहे. भाजपला पंजाबच्या निवडणुकीत कुणी तरी सहकारी हवा आहे. भाजपला पंजाबमध्ये विधानसभेच्या पाच जागाही मिळणार नाही. त्यामुळेच जर त्यांनी अकाली दलाच्या साथीने जायचं ठरवलं असेल तर त्यांचा प्रश्न आहे. पण अकाली दल भाजपसोबत जाणार असेल तर अकाली दलाला फायदा होणार नाही. किंबहुना अकाली दलाची उरलीसुरली पत आणि प्रतिष्ठा रसातळाला जाईल. आपण एनडीएतून का बाहेर पडलो? याचा विचार अकाली दलाने केला पाहिजे, असंही ते म्हणाले.
स्वत: उपमुख्याध्यापक नापास
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिंदे गटाच्या मंत्र्यांचं प्रगतीपुस्तक तपासालया सुरुवात केली आहे. त्यावरही राऊत यांनी टीका केली. शिंदेंचं स्वत:चं प्रगती पुस्तक कोण तपासणार? उपमुख्याध्यापकच कामात नापास असतील तर ते विद्यार्थ्यांचं प्रगती पुस्तक काय तपासणार आहे? मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण मंत्रिमंडळ नापास आहे. स्वत:चं प्रगती पुस्तक शिंदेंनी आधी पाहावं, नंतर मंत्र्यांचं. शिंदेंचे मंत्री एटीकेटीनेही पास होऊ शकत नाही, असा टोला त्यांनी लगावला.