
Ram Sutar Passes Away: शिल्पकलेतील भीष्माचार्य राम सुतार यांनी वयाच्या 101 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने शिल्पकला पोरकी झाली आहे. वृद्धपकाळाने त्यांचे निधन झाले आहे. या वर्षाच्या सुरुवातीला सिद्धहस्त शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. 20 मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत याविषयीची घोषणा केली होती. महापुरुषांच्या अजरामर शिल्पकृती साकारणाऱ्या हातांचा नुकताच सन्मान करण्यात आला होता.
धुळे जिल्ह्यातील गोंदूर हे मूळ गाव
धुळे जिल्ह्यातील गोंदूर हे राम सुतार यांचे मूळ गाव आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात 19 फेब्रुवारी 1925 मध्ये त्यांचा जन्म झाला होता. त्यांनी देशभरात अनेक ख्यातनाम शिल्प उभारली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट स्टॅच्यू ऑफ युनिटी हे सरदार वल्लभभाई पटेल यांचा सर्वात उंच पुतळा उभारणीचे काम त्यांनी केले.
सुतार यांची गाजलेली शिल्प
राम सुतार हे जागतिक ख्यातीचे शिल्पकार होते. त्यांच्या कलाकृतीमध्ये मुख्यत: इतिहास आणि संस्कृतीचे दर्शन दिसते. त्यांना वर्ष 2016 मध्ये पद्मभूषण आणि 1999 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार सुद्धा मिळाले आहेत. त्यांच्या शिल्पकलेत भारतीय संस्कृती, इतिहासाचा आणि भावनेचा अनोखा मिलाफ दिसून येतो.
छत्रपती शिवरायांचा पुतळा: मालवण -राजकोट येथील समुद्र किनाऱ्यालगतचा छत्रपती शिवरायांचा पुतळा राम सुतार आणि त्यांचे पुत्र अनिल सुतार यांनी तयार केला.
महात्मा गांधींचे पुतळे : देशभरातच नाही तर जगभरात त्यांनी महात्मा गांधी यांचे शिल्प साकारले आहेत.
स्टॅच्यू ऑफ युनिटी : राम सुतार यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातील सर्वात उंच 182 मीटर पुतळा उभारला. गुजरात राज्यातील केवडिया येथे हा पुतळा दिमाखात उभा आहे.
बुद्ध आणि महावीर : भगवान बुद्ध, महावीर आणि विवेकानंद यांच्यासह इतर महान विभूतींच्या मूर्ती अत्यंत सुबक आणि चित्तवेधक आहे. त्या पाहताना मनुष्य त्या कलाकृतीत हरवून, हरखून जाते.
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पुतळा: काही दिवसांपूर्वी अंदमान येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. हा पुतळाही राम सुतार यांनी साकारला होता.