मुंबई पोलिसांचं हळवं मन! डोळ्यांच्या कडा पाणावल्या, सेवानिवृत्तीच्या दिवशी ‘साहेब’च बनले ड्रायव्हर

| Updated on: Apr 01, 2023 | 12:12 AM

आपण जिथे काम करतो, दिवस-रात्र एक करुन मेहनत करतो, संघर्ष करतो तिथल्या वरिष्ठांनी आपल्याला अशा पद्धतीने आपला सत्कार करणं, यापेक्षा मोठा सन्मान काय असेल! आपल्या पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून इतर सर्व सहकाऱ्यांनी सेवानिवृत्तीच्या दिवशी अशाप्रकारे केलेल्या सन्मानाने सुनील मोरे हे अत्यंत भारावून गेले.

मुंबई पोलिसांचं हळवं मन! डोळ्यांच्या कडा पाणावल्या, सेवानिवृत्तीच्या दिवशी साहेबच बनले ड्रायव्हर
Follow us on

मुंबई : मुंबई पोलीस (Mumbai Police) म्हणजे कित्येक मुंबईकरांचं काळीज! याच मुंबई पोलिसांनी अनेक सकंटांपासून मुंबईकरांना वाचवलं. मुंबईत मुसळधार पाऊस पडू दे, चक्रीवादळ येऊ दे, समुद्राला मोठी भरती-ओहटी येऊ दे, त्सुनामी येऊ दे, महापूर येऊ दे, किंवा दहशतवादी हल्ले असतील, मुंबई पोलीस मुंबईकरांना वाचवण्यासाठी सदैव पुढे आले. त्यामुळे मुंबई पोलिसांचा जगात गाजावाजा आहे. मुंबई पोलिसांमधील अनेक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी या मुंबईसाठी जीवाची बाजी लावलीय. त्यामुळे या मुंबई पोलिसांचा प्रत्येक मुंबईकराला अभिमान आहे. मुंबई पोलीस हे गुन्हेगारांसाठी कर्दनकाळ ठरत असले तरी त्यांच्या हृदयाच्या आतही एक कोमल मन आहे. त्यांच्या या हळव्या मनाचं दर्शन घडवणारा एक प्रसंग आज समोर आलाय.

मुंबईच्या गावदेवी पोलीस ठाण्यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून कार्यरत ASI सुनील मोरे हे आज जवळपास 36 वर्षांनंतर पोलीस खात्यातून सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्ताने त्यांचं आज गावदेवी पोलीस ठाण्यामध्ये अत्यंत आगळंवेगळं स्वागत झालं. एवढंच नव्हे तर गावदेवी पोलीस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत यादव यांनी सेवानिवृत्त झालेल्या सुनील मोरे यांना आपल्या गाडीत बसविलं. त्यानंतर प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक यादव यांनी स्वतः गाडी चालवत मोरे यांना वरळी स्थित पोलीस कॉलनीत त्यांच्या घरी सोडलं.

हे सुद्धा वाचा

नोकरीवर असताना सुनील मोरे जी गाडी चालवित होते त्याच गाडीत त्यांना बसवून त्यांच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आज गाडी स्वतः चालवित त्यांनाच सन्मान केला. यापेक्षा मोठा क्षण कोणता असेल! आपण जिथे काम करतो, दिवस-रात्र एक करुन मेहनत करतो, संघर्ष करतो तिथल्या वरिष्ठांनी आपल्याला अशा पद्धतीने आपला सत्कार करणं, यापेक्षा मोठा सन्मान काय असेल! आपल्या पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून इतर सर्व सहकाऱ्यांनी सेवानिवृत्तीच्या दिवशी अशाप्रकारे केलेल्या सन्मानाने सुनील मोरे हे अत्यंत भारावून गेले. त्यांचे कुटुंबियदेखील त्यावेळी उपस्थित होते. मोरे यांचे डोळे सारं काही सांगत होते.

सुनील मोरे हे जवळपास 5 वर्षांपासून गावदेवी पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून कार्यरत होते. मात्र आज ते सेवानिवृत्त झाले. सध्या प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत गायकवाड हे देखील गावदेवी पोलीस ठाण्यात मागील 4 वर्षांपासून कार्यरत आहेत. जवळपास 2 महिन्यांपासून त्यांच्याकडे गावदेवी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदाचा प्रभार आहे.