ना ठाणे, ना दादर, ‘या’ ठिकाणी होणार शिंदे गटाचं पहिलं मध्यवर्ती कार्यालय; अखेर जागा मिळालीच

| Updated on: Nov 25, 2022 | 11:25 AM

शिंदे गटाच्या या कार्यालयामध्ये भव्य सभागृह असणार आहे. त्याचसोबत नागरिकांसाठी विविध सुविधा देखील असणार आहेत. पत्रकार परिषद, बैठका आणि मेळाव्यासाठी या हॉलचा उपयोग होणार आहे.

ना ठाणे, ना दादर, या ठिकाणी होणार शिंदे गटाचं पहिलं मध्यवर्ती कार्यालय; अखेर जागा मिळालीच
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: ठाकरे गटाची शिवसेना खरी की शिंदे गटाची शिवसेना खरी हा वाद अजूनही सुटलेला नाही. मात्र, दोन्ही गटाकडून एकमेकांना शह काटशह देण्याचं काम सुरू आहे. इकडे ठाकरे गटाने शिवाजी पार्कात दसरा मेळाव्याचं आयोजन करताच दुसरीकडे शिंदे गटाने बीकेसी मैदानावर तोडीस तोड दसरा मेळावा घेतला. एवढंच नव्हे तर ठाकरे गटाकडून होणाऱ्या प्रत्येक हल्ल्याला शिंदे गटाकडून जशास तसे आणि रोखठोक उत्तर दिलं जात आहे. आता तर दोन्ही गटाचे कार्यालयही समोरासमोरच असणार आहेत. शिंदे गट ठाकरे गटाच्या कार्यालयासमोरच आपलं कार्यालय थाटणार आहे.

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचं मध्यवर्ती कार्यालय काही दिवसातच सुरू होणार आहे. मुंबईतील ठाकरे गटाच्या शिवालयाच्या बाजूला हे कार्यालय असणार आहे. मंत्रालयाजवळील सी-2 या बंगल्यामध्ये शिंदे गटाचं पहिलं कार्यालय असणार आहे. मंत्रालयाच्या समोरील असलेल्या मंत्र्यांच्या निवासस्थानीच हे कार्यालय सुरू होणार असल्याने दोन्ही गटाचे नेते, पदाधिकारी सातत्याने आमनेसामने येणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.

हे सुद्धा वाचा

शिंदे गटाच्या या कार्यालयामध्ये भव्य सभागृह असणार आहे. त्याचसोबत नागरिकांसाठी विविध सुविधा देखील असणार आहेत. पत्रकार परिषद, बैठका आणि मेळाव्यासाठी या हॉलचा उपयोग होणार आहे. शिंदे गटाच्या प्रमुखांसह प्रवक्ते आणि विविध पदाधिकाऱ्यांसाठी या कार्यालयात वेगळी केबिन असणार आहे. या कार्यालयात कर्मचारी वर्गही तैनात करण्यात येणार आहे.

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिंदे गटाचं मध्यवर्ती कार्यालय ठाण्यात असेल असं सांगितलं जात होतं. शिंदे हे ठाण्यात राहतात. त्यांची राजकीय आणि सामाजिक कारकिर्द ठाण्यातूनच घडली. त्यामुळे ठाण्यात शिंदे गटाचं कार्यालय असेल असं सांगितलं जात होतं.

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्याने आणि मुंबईतूनच सर्व माहिती जगभर पोहोचत असल्याने मुंबईतच मध्यवर्ती कार्यालय असावं असा एक मतप्रवाह शिंदे गटात होता. त्यामुळे मुंबईत जागेची शोधाशोधही सुरू झाली होती.

दादर येथे शिवसेना भवनासमोरच हे कार्यालय असावं असंही सांगितलं जात होतं. त्यादृष्टीने हालचालीही सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र, अखेर मंत्रालयासमोरील ठाकरे गटाच्या शिवालयासमोरच हे कार्यालय घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.