
प्रदीप कापसे, मुंबई, पुणे | 14 सप्टेंबर 2023 : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी घडामोड गुरुवारपासून सुरु होत आहे. शिवसेनेच्या 16 अपात्र आमदारांच्या यचिकेवर विधानसभा अध्यक्षांसमोर प्रत्यक्ष सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेच्या 16 अपात्र आमदारांच्या प्रकरणावर सुनावणी घेण्याचा अधिकार विधासभा अध्यक्षांना दिले होते. त्यानंतर आता 14 सप्टेंबरपासून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे सुनावणी सुरु करणार आहे. राहुल नार्वेकर शिवसेनेच्या दोन्ही गटांची बाजू समजून घेणार आहे. त्यानंतर या प्रकरणावर निर्णय दिले आहे.
एकनाथ शिंदे गटाकडून दोन वकील विधानसभा अध्यक्षांसमोर भूमिका मांडणार आहेत. या दोन वकिलांना प्रसिद्ध विधिज्ज्ञ हरीश साळवे यांच्या टीमने मार्गदर्शन केले. सर्वोच्च न्यायालयात एकनाथ शिंदे गटाची बाजू हरीश साळवे यांनी मांडली होती. यापूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचा निकाल एकनाथ शिंदे यांच्या बाजूने दिला होता. निवडणूक आयोगाने पक्ष आणि पक्षाचे चिन्ह हे शिंदे गटाला दिले आहे. त्यामुळे शिंदे गटाचे आमदार अपात्र होऊ शकत नाहीत, अशी भूमिका मांडण्याची रणनीती शिंदे गटाने केली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने निकाल दिल्यामुळ शिवसेना आम्हीच आहोत, अशी भूमिका विधानसभा अध्यक्षांकडे मांडण्यात येणार आहे. त्या संदर्भातील कागदपत्रे दिली जाणार आहे. तसेच ज्यावेळी आमदारांवर अपात्रेसंदर्भात नोटीस आली, त्यावेळी विधानसभा उपाध्यक्षांवर अविश्वास प्रस्ताव होता, अशी भूमिकाही मांडण्यात येणार आहे. त्यामुळे उपाध्यक्षांनी दिलेली नोटीस ग्राह्य धरु नये, अशी भूमिका शिंदे गट मांडणार आहे.
ज्येष्ठ घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी या सुनावणीसंदर्भात मत व्यक्त केले. ते म्हणाले की, विधानसभा अध्यक्षांना यासंदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार आहे. परंतु अध्यक्षांनी घटनेच्या विरोधात निर्णय दिला तर पुन्हा न्यायालयात जाता येतणार आहे. आमदार अपात्र ठरले तर सरकार पडणार आहे. कारण १६ आमदार अपात्र प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. ही सुनावणी दोन, तीन महिन्यांत संपण्याची शक्यता बापट यांनी व्यक्त केली.