Shivsena: दिल्लीत सस्पेन्स वाढला! बहुमताचा जादुई आकडा कुणाकडे? उद्धव सेनेचा खासदारांसाठी व्हिप, बंडखोर घेणार ओम बिर्ला यांची भेट?
Uddhav Thackeray: ताज्या दाव्यानुसार, ऑपरेशन टायगरमध्ये उद्धव सेनेच्या 6 पैकी 2 खासदारांनी स्वाक्षरीच केलेली नाही. दरम्यान ठाकरे सेनेने खासदारांसाठी दिल्लीत आज व्हिप जारी करत आज बैठक बोलावली आहे. या बैठकीला कोण कोण खासदार हजेरी लावणार हे लवकरच समोर येईल.

Anti-Defection Law: राज्याच्या राजकारणात ऑपरेशन टायगरने कालपासून धुमाकूळ घातला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने दावा केला आहे की हे ऑपरेशन फत्ते झाले आहे. केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे सेनेने एक मोठा दावा केल्याने शिंदे सेनेच्या गोटात खळबळ उडाली आहे. बंडखोर खासदारांना कायद्याच्या कचाट्यात अडकवण्याची भीती समोर येत आहे. तर या खासदारांच्या मतदारसंघात कार्यकर्त्यांचा संतापही समोर येत आहे. त्यामुळे आजच्या खासदारांच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर स्वतंत्र गटाच्या मान्यतेसाठी जे पत्र लोकसभा अध्यक्षांना पाठवण्यात आले. त्यावर बंडखोर 6 पैकी 2 खासदारांची स्वाक्षरी नसल्याची बाब समोर आल्याने 2/3 बहुमताचा जादुई आकडा कुणाकडे आहे? हे अवघ्या काही तासात समोर येईल.
ठाकरे सेनेचा कायदेशीर डावपेच
जर स्वतंत्र गटाच्या मान्यतेसाठी दाखल पत्रावर केवळ चार खासदारांच्या स्वाक्षरी असेल तर मग मोठा पेच वाढणार आहे. शिंदे गटाला पक्षांतर कायदा आणि हा गट विलिनीकरणास मोठा कायदेशीर अडथळा येऊ शकतो. तर या खासदारांवर पक्ष थेट कारवाई करण्याची शक्यता आहे. या खेळीत या खासदारांचा राजकीय बळी जातो का? की ठाकरे सेनेला फटका बसतो हे समोर येईल.
त्या दोन खासदारांची स्वाक्षरी नाही
उद्धव सेनेनुसार, स्वतंत्र गट स्थापन करण्याच्या पत्रावर धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि मुंबई उत्तर पूर्वचे खासदार संजय दिना पाटील यांची स्वाक्षरी नाही. सदर पत्रावर या दोन्ही खासदारांची स्वाक्षरी नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, अरविंद सावंत आणि अनिल देसाई, नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे हे सोडून इतर खासदारांनी बंडाचा झेंडा फडकावला होता. पण दोन खासदारांनी या बंडातील हवाच काढून घेतली आहे. त्यांनी गेम पलटवला आहे. तर संजय दिना पाटील यांनी आपण मुंबईतच आहोत आणि या अफवांनी वैतागल्याचे म्हटले आहे. शिंदे गटाने आपल्याला कोणती ऑफर दिली नसल्याचे ते म्हणाले. तर धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर हे 20 जूननंतर भूमिका स्पष्ट करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
व्हिप विरुद्ध बहुमत, आज होणार काय?
उद्धव सेनेने खासदारांची एकी दाखवण्यासाठी आज 11 वाजता दिल्लीतील संसदेच्या कार्यालयात बैठक बोलावली आहे. त्यासाठी पक्षाच्या सर्व खासदारांना व्हिप जारी करण्यात आला आहे. या बैठकीला जास्तीत जास्त खासदार हजेरी लावतील असा उद्धव सेनेचा दावा आहे. त्यात स्वाक्षरी न केलेल्या दोन खासदारांचाही समावेश असण्याची शक्यता आहे. जर या बैठकीला अपेक्षेपेक्षा अधिक खासदार पोहचले तर शिंदे गटाचा डाव फसण्याची शक्यता आहे. तर ज्या खासदारांनी स्वतंत्र गटासाठी लोकसभा अध्यक्षांकडे पत्र व्यवहार केला, त्यांच्यावर उद्धव सेना काय कारवाई करणार हे सुद्धा या बैठकीनंतर समोर येईल.