‘मी मुख्यमंत्र्याना भेटलो तर खळबळ माजेल’, संजय राऊत यांचं मोठं वक्तव्य

| Updated on: Jun 02, 2023 | 4:12 PM

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीवर मोठं वक्तव्य केलं आहे. मी मुख्यमंत्र्याना भेटलो तर खळबळ माजेल, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.

मी मुख्यमंत्र्याना भेटलो तर खळबळ माजेल, संजय राऊत यांचं मोठं वक्तव्य
Follow us on

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल? याचा काहीच भरोसा नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी (1 जून) संध्याकाळी अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. या भेटीमागे वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात होते. अखेर भेटीनंतर काही वेळाने शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांनी भेटीचं कारण सांगितलं. शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या या भेटीवर संजय राऊत यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना भेटणं म्हणजे खळबळ माजवणारं नाही. मी आणि एकनाथ शिंदेंना भेटलो तर खळबळ माजेल, असं मोठं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं.

“यामध्ये आश्चर्य वाटावं असं काय आहे? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर भलेही बेकायदेशीरपणे एखादी व्यक्ती बसली असेल, सरकार बेकायदेशीर आहे, मुख्यमंत्री बेकायदेशीर आहेत, हे सरकार सर्वोच्च न्यायालयाने डिसमिस केलं आहे. तरी ते बसले आहेत. निकाल लागेल. पण जोपर्यंत ते बसले आहेत तोपर्यंत मुख्यमंत्री म्हणून निर्णय घेत आहेत”, असं संजय राऊत म्हणाले.

‘मी भेटलो तर खळबळ माजेल’

“शरद पवार अनेक क्षेत्रात काम करतात. राजकारण हा वेगळा विषय, सहकार क्षेत्र, सामाजिक, शैक्षणिक आणि इतर क्षेत्राशी संबंधित कामांसाठी कुणी मुख्यमंत्र्यांना भेटत असेल तर त्यामध्ये इतकी खळबळ माजण्याची गरज नाही. मी भेटलो तर खळबळ माजेल. आमच्या सारखे लोकं भेटली तर कदाचित प्रश्न निर्माण होईल की का भेटलात? आम्ही लपून भेटणारी लोकं नाहीत. शरद पवार मुख्यमंत्र्यांना भेटले असतील. त्यात मला वाटत नाही की त्यामध्ये राजकारण आहे. त्यांनी या संदर्भात स्पष्ट खुलासा देखील केलेले आहे”, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.

हे सुद्धा वाचा

“विरोधी पक्षनेते अजित पवार, अंबादास दानवे यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी, सभागृहातील कामकाजांसाठी अनेकदा मुख्यमंत्र्यांना भेटावच लागतं. शेवटी ते त्या खुर्चीवर बसलेले आहेत. ते नक्कीच त्या खुर्चीवरुन जातील. त्यांना जावं लागेल. पण ते जोपर्यंत त्या खुर्चीवर बसले आहेत तोपर्यंत त्या खुर्चीपुढे जावून उभं राहावंच लागतं. खुर्चीपुढे उभं राहावं लागतं, व्यक्तीपुढे नाही”, अशी भूमिका राऊतांनी मांडली.

भविष्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटाल का?

भविष्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटाल का? असा प्रश्न संजय राऊत यांना विचारण्यात आला. त्यावर राऊतांनी “मी कशाकरता भेटू? माझं काहीच काम नाही. मी गेल्या काही वर्षांपासून एकमेव असा माणूस आहे, ज्याचं सरकारकडे काहीच काम नसतं. माझ्या कामासाठी जी अनेक प्रश्न आहेत त्यासाठी सामना वृत्तपत्र आहे. मी समर्थ आहे. मी गेली 30 वर्षे मंत्रालयात गेलो नाही. माझं काही आडत नाही”, अशी प्रतिक्रिया दिली.

“मंत्रालय ही आता काम होण्याची आणि काम करण्याची जागा राहिलेली नाही. ती जागा कुणाची आणि काय कामं चालतात ते सगळ्यांना माहिती आहे. सामान्य माणसाला तिथे स्थान नाही. शेतकऱ्याला, कष्टकऱ्याला मंत्रालयाच्या पायरीवर जागा नाहीय. शेतकरी तिथे जावून आत्महत्या करतोय. तिथे जावून महिला आत्महत्या करत आहेत. लोकांचे कोणते प्रश्न सुटत आहेत?”, असा सवाल संजय राऊतांनी केला.

“या सरकारकडून लोकांचे प्रश्न सुटण्याची अजिबात अपेक्षा नाहीत. तरी शरद पवार भेटले असतील. ते इतके वर्ष राजकारणात आहेत. त्यांना वाटलं असेल की मुख्यमंत्र्यांची ताकद मोठी असते. भेटल्यावर काही प्रश्न सुटू शकतात”, असं मत त्यांनी मांडलं.