मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिकवणी घेण्यास आपण तयार, संजय राऊत असे का म्हणाले?

उज्ज्वल निकम यांच्या अनुभवाचा फायदा भाजप आणि मोदी यांना होईल. पण देशाला आणि समाजाला किती फायदा होईल? हे मला माहीत नाही. त्यांनी आता भाजपचा टीळा लावला आहे. अजूनही ते भाजपचे सदस्य आहेत, असे राऊत यांनी म्हटले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिकवणी घेण्यास आपण तयार, संजय राऊत असे का म्हणाले?
| Updated on: Jul 14, 2025 | 10:34 AM

बिल न वाचताच काही लोक जनसुरक्षा विधेयकाला विरोध करीत आहेत. या माध्यमातून ते कडव्या डाव्या विचारांनाच नकळत पुढे नेत आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. त्यांच्या या विधानाचा शिवसेना उबाठा नेते संजय राऊत यांनी जोरदार समाचार घेतला. त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना डाव्या विचारसरणीचा इतिहास सांगत स्वातंत्र्यलढ्यातील त्यांच्या योगदानाची माहिती दिली. तसेच देवेंद्र फडणवीस यांना हे माहीत नसेल तर आपण त्यांची शिकवणी घेण्यास तयार आहोत, असे राऊत यांनी म्हटले.

सुभाषचंद्र बोस डाव्या विचारसणीचे

संजय राऊत यांनी सांगितले की, महाराष्ट्रात डाव्या विचारसणीला दोष देत तुम्ही जनसुरक्षा कायदा आणला. पण डाव्या विचारसरणीच्या लोकांनी देशात मोठी कामे केली आहेत. डाव्या विचारसणीचे लोकांनी पश्चिम बंगाल, त्रिपुरा, केरळमध्ये राज्य केले आहे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात डावे विचारांचे लोक होते. सुभाषचंद्र बोस डाव्या विचारसणीचे होते. भगतसिंग डाव्या विचारसरणीचे होते. सेनापती बापट डाव्या विचारसणीचे होते. कॉम्रेड श्रीपाद डांगे कम्युनिस्ट होते. ज्या वीरप्पन यांच्या मुलीला भाजपमध्ये प्रवेश दिला, तो वीरप्पन डाव्या विचारसणीचा होता आणि नक्षलवादी होता.

राऊत पुढे म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात भाजप आणि संघ नव्हता, पण कम्युनिस्ट होते. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात डावे विचारसणीचे लोक होते. हे फडणवीस यांना माहीत नसले तर मी त्यांची शिकवणी घेण्यास तयार आहे. जनसुरक्षा कायदा बनवणारे खाकी वर्दीतील लोक आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी जनसुरक्षा कायदा पुन्हा वाचवा, असा सल्ला राऊत यांनी दिला.

निकम यांचा फायदा भाजप अन् मोदींना

उज्ज्वल निकम यांचे राज्यसभेसाठी राष्ट्रपतींनी नामांकन केले. त्यावर उपरोधिकपणे बोलताना संजय राऊत म्हणाले, निकम यांच्या अनुभवाचा फायदा भाजप आणि मोदी यांना होईल. पण देशाला आणि समाजाला किती फायदा होईल? हे मला माहीत नाही. त्यांनी आता भाजपचा टीळा लावला आहे. अजूनही ते भाजपचे सदस्य आहेत. लोकसभेला ते पराभूत झाले म्हणून राज्यसभेत पाठवले. आता त्यांनी अधिकृतपणे भाजपचा प्रचार करावा, आम्ही त्याची वाट पाहत आहोत.

निवडणूक आयोगावर टीका

निवडणूक आयोग अमित शाह चालवतात. अमित शाह महाराष्ट्राचा चौकीदार असलेल्या शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न करत आहे. आमचे पक्ष आणि चिन्ह एका चोराला निवडणूक आयोगाने दिले आहे. त्यामुळे आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलो आहे. धनुष्यबाणावर शिवसेना शिंदे गटाचा काहीच अधिकार नाही. न्याय आणि सत्य यांचा विजय होईल, ही आम्हाला अपेक्षा आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले.